नागपूर : उद्धव ठाकरेंचं लहान बाळ इकडे असताना घाबरतं त्यामुळे ते सोबत येतात, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरेंवर केली आहे. तसेच राष्ट्रवादी कांग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातले ऑरी आहेत असेही ते म्हणाले आहेत.
नितेश राणे यांनी सोमवारी विधानभवनात येताच पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, "मी येताना एकटा येतो वडिलांना आणत नाही. पण आदित्य ठाकरे त्यांच्या वडिलांना सोबत घेऊन येतात. एकीकडे आदित्य ठाकरे म्हणतात की, मी ३२ वर्षाचा मुलगा आहे मला सरकार घाबरतं. मग मैदानात एकटा ये ना. वडिलांना सोबत कशाला घेऊन येतोस," असे ते म्हणाले. तसेच ३२ वर्षाच्या या तरुणाने एकदाच देशाला सांगावं की, दिशा सालियान प्रकरणी त्यांचं नाव आहे का? असेही राणे आदित्य ठाकरेंना म्हणाले आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले की, "रोहित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातला ऑरी आहे. त्यामुळे या ऑरीला किती गांभिर्याने घ्यायचं, असा प्रश्न आहे. जसे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे उबाठा गटाला संपवणार तसंच उर्वरित शरद पवार गटाला संपवण्यासाठी हा राजकारणातला ऑरी सक्षम आहे," असा घणाघातही त्यांनी केला.
मराठा समाजाची बदनामी थांबवा
गोपीचंद पडळकरांवर झालेली चप्पलफेक हे अतिशय चुकीचे आहे. जो खरा मराठा आहे तो कधीही दुसऱ्या समाजाच्या लोकांवर अशा प्रकारचा हल्ला करणार नाही. आम्ही महाराष्ट्रात ५८ मोर्चे काढले पण कुणालाच एक इंचदेखील धक्का लागला नाही. आरक्षणासाठी लढा योग्य आहे पण कधी देवेंद्र फडणवीस टीका करायची, कधी पडळकरांवंर टीका करायची, याला मराठा समाज म्हणत नाही. त्यामुळे आम्ही हे स्विकारणार नाही. समाजाची बदनामी योग्य वेळी थांबवा नाहीतर आम्हाला आमच्या समाजाच्या हितासाठी रस्त्यावर उतरावं लागेल, असेही नितेश राणे म्हणाले.