देशाप्रती प्रेम, जिव्हाळा आणि आपणही या देशाचे काहीतरी देणे लागतो, ही सद्भावना कायमच प्रेरणादायी ठरत असते. चित्रपटाच्या किंवा वेब मालिकांच्या माध्यमातून देशभक्ती जागृत करण्याचे, हुतात्म्यांच्या, शूरवीरांच्या शौर्यकथा लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम दिग्दर्शक, कलाकार मंडळी अगदी अव्याहतपणे करीत असतात. असाच एक चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. देशाचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित ’सॅम बहादुर.’ या चरित्रपटात अभिनेता विकी कौशल याने सॅम माणेकशॉ यांची व्यक्तिरेखा अगदी उत्तम साकारली आहे.
चरित्रपट म्हणजे नेमकं काय? तर एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील अनेक घटना, प्रसंग, त्यांचे आचार-विचार, कर्तृत्व हे लाखोंना प्रेरणा देणारे असते. जीवनाचा एक अमूल्य संदेश देणारे असते. अशा या दिग्गज व्यक्तीचा जीवनपट चित्रपटाच्या चौकटीत गुंफून प्रेक्षकांसमोर मांडण्याचे काम दिग्दर्शक अगदी खुबीने करत असतात. हीच पूर्तता दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी ’सॅम बहादुर’ या चरित्रपटातून पुन्हा एकदा केली आहे. पुन्हा हा शब्द यासाठी की, यापूर्वी त्यांनी ’छपाक’ या चित्रपटातून अॅसिड हल्ला झालेल्या मुली आणि महिलांची व्यथा मोठ्या पडद्यावर मांडली होती, तर यंदा ’सॅम बहादुर’ या चित्रपटातून देशाचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची शौर्यगाथा गुलजार यांनी प्रेक्षकांसमोेर सादर केली आहे.
देश, सैन्य आणि देशातील प्रत्येक नागरिकाचे संरक्षण, हेच आद्यकर्तव्य मानणारे आणि आपली वर्दी आणि कौटुंबिक जीवनात समतोल साधणारे फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ. अगदी लहानपणापासूनच निडर असलेल्या सॅम यांचे एकमेव ध्येय आणि लक्ष्य होते, ते म्हणजे सैन्याची वर्दी आणि आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्याचा त्यांनी केलेला दृढ निश्चय. ’सॅम बहादुर’ या चित्रपटात माणेकशॉ यांनी त्यांच्या सैन्यातील कारकिर्दीत पाच महत्त्वाच्या युद्धांमध्ये किती महत्त्वपूर्ण भूमिका साकारली, याचे उत्तम सादरीकरण केले आहे. त्यांनी लढलेल्या अनेक यशस्वी युद्धांपैकी चित्रपटात प्रामुख्याने 1971 साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धावर (बांगलादेश मुक्ती संग्राम) दिग्दर्शकांनी अधिक भर दिल्याचे दिसून येते. या चित्रपटाची एक जमेची बाजू म्हणजे, संपूर्ण चित्रपटात जिथे जिथे युद्धाचे प्रसंग दाखवण्यात आले आहेत, तिथे तिथे दिग्दर्शकांनी जुन्या आणि अगदी खर्या युद्धांतील चित्रफितींचा खुबीने वापर केला आहे. त्याचे कारण असे की, 21व्या शतकात मोठ्या पडद्यावर सॅम यांच्या बहादुरीचे किस्से पाहताना,प्रेक्षकांना खरोखरच भूतकाळात गेल्याचा काहीसा भास होतो. तसेच युद्धाच्या समकालीन चित्रफितींमुळे प्रत्यक्ष युद्धभूमीवरील आव्हानात्मक प्रसंगांची तीव्रता अधिक चित्तवेधक ठरते.
चित्रपटाच्या प्रारंभी दिग्दर्शकांनी सॅम माणेकशाँ यांचे बालपण किंवा सैन्यात सामील होण्यामागची त्यांची प्रेरणा, तसेच सुरुवातीच्या काळातील त्यांची सैन्यातील वाटचाल ही काहीशी आवरती घेतल्यासारखे वाटते. किमान त्यांच्या बालपणातील काही ठळक आणि त्यांच्या जीवनावर दूरगामी परिणाम साधणार्या प्रसंगांचा, अनुभवांचा उल्लेख केला असता, तर चित्रपटाचे कथानक अधिक फुलले असते, असे वाटते. पण, तरीही मेघना गुलजार यांनी चित्रपटासाठी केलेले संशोधन, योग्य कलाकारांची भूमिकेसाठी निवड, कथेच्या गरजेनुरुप केलेली एकूणच चित्रपटाची मांडणी ही वाखाण्याजोगीच म्हणावी लागेल. तसेच, इंग्रजांनी देशावर दीडशे वर्षं राज्य केले आणि जाता-जाता भारत-पाकिस्तानची झालेली फाळणी, ही सैन्यातील कोणत्याही अधिकार्याला पटली नव्हतीच आणि त्याची प्रचिती पाकिस्तानचे तत्कालीन सैन्यप्रमुख याह्या खान आणि सॅम माणेकशॉ यांच्या मैत्री प्रसंगातून दिसून येते.
या चित्रपटाची सर्वात जमेची बाजू म्हणजे, अभिनेता विकी कौशल याने साकारलेली सॅम माणेकशॉ यांची व्यक्तिरेखा. विकीने या भूमिकेसाठी सॅम यांच्या कारकिर्दीसह ते व्यक्तिगत जीवनात कसे होते, त्यांचा स्वभाव, चालण्या-बोलण्याची लकब यांसारख्या तपशीलांचा अगदी बारकाईने अभ्यास केलेला दिसतो. तसेच, सानिया मल्होत्रा,मोहम्मद अय्युब यांनीदेखील त्यांच्या भूमिकेस योग्य न्याय दिला आहे.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, चित्रपटाच्या वेशभूषा आणि रंगभूषाकारांनी एक वेगळीच जादू केली आहे. या चित्रपटात मोहम्मद अय्युब यांनी पाकिस्तानचे चीफ कमांडर याह्या खान यांची भूमिका साकारली असून वेशभूषा आणि रंगभूषा इतकी समर्पक केली आहे की, अय्युब खरोखरीच याह्या खान यांच्याचसारखे दिसतात. तिच बाब विकी कौशलने साकारलेल्या सॅम यांच्या आणि फातिमी शेख हिने साकारलेली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेबद्दलही जाणवते. संपूर्ण चित्रपटात खटकलेली एक बाब म्हणजे, सॅम माणेकशॉ आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या दरम्यानचे दिग्दर्शकाने उलगडलेलेे विविध पदर. हा चित्रपट केवळ सॅम यांच्या बहादुरीवर असल्यामुळे कथानकातील हा भाग नक्कीच काहीसा खटकतो. मात्र, प्रत्येक वयोगटातील भारतीय नागरिकांनी पाहावा, असा उत्तम चित्रपट ‘सॅम बहादुर’च्या संपूर्ण टीमने दिला आहे, त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक!
चित्रपट : सॅम बहादुर
दिग्दर्शक : मेघना गुलजार
कलाकार : विकी कौशल, सानिया मल्होत्रा, फातिमा शेख
रेटिंग : तीन स्टार
रसिका शिंदे-पॉल