विविध विषयांमध्ये पदविका मिळवून, सामाजिक कार्य करण्याबरोबरच प्रशिक्षिका, शैक्षणिक साधन निर्माती ते उद्योजिका असा प्रवास करणार्या अॅड. अश्विनी देशपांडे यांच्याविषयी...
नंदुरबार जिल्ह्यात जन्मलेल्या अश्विनी देशपांडे यांचे वडील सुहास काणे हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक, तर आई गृहिणी. वडील नाशिकमधील एचपीटी, बीवायके महाविद्यालयात प्राध्यापक असल्याने अश्विनी यांचे बालपण, शालेय शिक्षण नाशिकमध्येच झाले. सेंट झेवियर्स शाळेत चौथीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले, तर पुढे रंगुबाई जुन्नरे शाळेतून त्या इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्या. वडील ’एमबीए’ हॉस्टेलचे रेक्टर(वसतिगृह प्रमुख) असल्याने व्यवस्थापनाचे धडे वडिलांकडूनच मिळाले.
दहावीनंतर एचपीटी महाविद्यालयात कला शाखेला प्रवेश घेतला. दुपारच्या वेळेत गृहशास्त्राचा अभ्यास केला. तसेच जर्मन भाषाही शिकून घेतली. बारावीपासूनच शिकविण्याची आवड असल्याने त्यांनी घरच्या घरी लहान मुलांची शिकवणी घेण्यास सुरुवात केली. पुढे इंग्रजी विषयात ’बीए’ ’एमए’ केले. लग्नानंतर पती वैजापूर येथे नोकरी करत असल्याने, त्या तिथेच एका शाळेत शिक्षिका म्हणून रूजू झाल्या. नंतर पतीची बदली पुन्हा नाशिकला झाल्यानंतर दीड वर्षांनंतर शिक्षिकेची नोकरी त्यांना सोडावी लागली. नाशिकला परतताना शाळेतील विद्यार्थी त्यांना बस स्थानकावर भेटण्यासाठी आले होते. पुढे त्यांनी पुन्हा एकदा शिकवणी घेण्यास सुरूवात केली. विधी महाविद्यालयातही त्यांनी प्रवेश घेतला. ’एमबीए’ (एचआर) आणि ’एमफील’ (इंग्रजी आणि संप्रेषण कौशल्य)देखील त्यांनी पूर्ण केले. काही काळ अध्यापनाचे कार्यही केले.
२००७ ते २००९ दरम्यान त्यांनी मुक्त विद्यापीठासाठी २२ पुस्तकांचे लेखन केले. २००९ साली वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास, २०१० साली विधी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास, इंग्रजी आणि संप्रेषण कौशल्य, २०१४ साली औषधनिर्माण शाखेतील विद्यार्थ्यांसाठी संप्रेषण कौशल्य, २०१६ साली महिलांशी निगडित कायदे, या विषयावर मुक्त विद्यापीठासाठी पुस्तक लेखन केले. विविध कंपन्यांमधील कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक, संचालक तसेच शिक्षकांसाठीही त्यांनी अभ्यासक्रमांची आणि ‘नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर’ आणि ’टाटा ट्रस्ट’ यांच्यासाठी फिनिशिंग स्कूलची निर्मिती केली. २०१3 साली कॉर्पोरेट क्षेत्रातही त्यांनी विविध प्रशिक्षण व व्याख्याने दिली. एका विद्यार्थ्यांने त्यांना वृत्तपत्रातील बातमीचा संदर्भ देऊन अनाथाश्रमांमध्ये मदतीची आवश्यकता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा समाजसेवेची आवड असल्याने, त्यांनी २०१४ साली ‘आपुलकी ग्रुप’ची स्थापना केली.
या माध्यमातून २०१४ ते २०१७ या काळात कनाशी येथील १८० अनाथ मुलांना त्यांनी भरीव मदत केली. २०१४ साली राधा-लक्ष्मी एंटरप्राईझेस आणि शिक्षण व महिला सक्षमीकरण करण्याच्या हेतूने त्यांनी २०१६ साली ’राधा-लक्ष्मी फाऊंडेशन’ची स्थापना केली. केरळ आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा, कोरोना काळात गरजूंना मदत असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. निराशेने ग्रासलेल्या व्यक्तींसाठी मोफत समुपदेशन केले. ’आर्ट हब’ची स्थापना केल्यानंतर, झोपडपट्टीतील महिलांना त्या मॉलमध्ये घेऊन गेल्या. काही महिलांच्या मागणीनंतर त्यांनी ‘राधा-लक्ष्मी फूड्स’ सुरू करून, खाद्यपदार्थ तयार करणार्या महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न सुरू केले. गेल्या पाच वर्षांपासून हे खाद्यपदार्थ मुंबई-पुण्यासह परदेशात पाठवले जात आहेत. गुळाच्या पोळ्या, पुरणपोळ्या असे विविध पदार्थ बनवून पाठवले जातात. ‘कार्यालयात होणारा स्त्रियांचा लैंगिक छळ’ याबाबत विविध संस्थांमध्ये स्थापन झालेल्या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या सदस्या म्हणूनही त्या सध्या काम पाहत आहेत. वडिलांकडून तसेच सुधा मूर्ती आणि रतन टाटा यांच्याकडून प्रेरणा मिळत गेली. किती छोट्या गोष्टींचा विचार करून जमिनीवर काम करावं लागतं,
याचा अनुभव ’टाटा ट्रस्ट’सोबत काम करताना आल्याचे त्या सांगतात. ’सृजन साधना’ नावाने कला प्रदर्शनाचे अनेक वर्षांपासून त्या आयोजन करतात. त्याद्वारे विविध कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा आणि त्यांची कला समाजापर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वर्तवणूक, सॉफ्ट स्कील्स, इंग्रजी, व्यक्तिमत्त्व विकास, भावनिक बुद्धिमत्ता, संप्रेषण कौशल्ये आणि लैंगिक छळापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, या विषयांवर आजपावेतो जवळपास १६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. स्वतः वकिलीचे शिक्षण घेतलेले असूनही अश्विनी देशपांडे यांनी वकिलीचा पेशा स्वीकारला नाही. इंग्रजीसारख्या विषयात उच्चशिक्षित असूनही नोकरीचा मार्ग निवडला नाही. नेहमीची चाकोरी सोडून, आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा समाजाला थेटपणे मिळावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून त्या निःस्वार्थी भावनेने कार्यरत आहेत. सध्या अश्विनी यांच्यामुळे ४०हून अधिक महिलांना रोजगार मिळाला आहे.त्यामुळे त्या इतर महिलांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत. विविध विषयांमध्ये पदविका मिळवून सामाजिक कार्य करण्याबरोबरच प्रशिक्षिका, शैक्षणिक साधन निर्माती आणि उद्योजिका असा प्रवास करणार्या अॅड. अश्विनी देशपांडे यांना दै. ‘मुंबई तरूण भारत’च्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा!
७०५८५८९७६७