साधू आणि पुजाऱ्यांवर टीका करणं भोवलं! काँग्रेस आमदार आफताबुद्दीन मोल्ला यांना अटक
08-Nov-2023
Total Views |
दिसपुर : हिंदूंमध्ये द्वेष पसरवणारे काँग्रेस आमदार आफताबुद्दीन मोल्ला यांना आसाम पोलिसांनी अटक केली आहे. हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी हिंदू संत, पुजारी आणि नामघरिया यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबर रोजी आसाममधील जलेश्वर येथील आमदार आफताबुद्दीन मोल्ला यांनी गोलपारा येथे एका मेळाव्याला संबोधित करताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. “कुठेही बलात्कार झालेला असला तरी, त्यात साधू किंवा नामघरी सामील असतात," असे त्यांनी म्हटले होते.
तसेच हिंदू पुजाऱ्यांचे गुन्हे लपवण्यासाठी ते मुस्लिमांवर आरोप करत असतात," असेही त्यांनी म्हटले होते. यावेळी व्यासपीठावर मुस्लिम समाज आणि काँग्रेसशी संबंधित लोक उपस्थित असून यातील काही लोकांनी त्यांच्या या विधानाचे समर्थनही केले होते. दरम्यान, त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
त्यानंतर आता आफताबुद्दीन मोल्ला यांच्यावर आसाममधील दिसपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेसचा इतिहास हिंदूविरोधी असल्याचे सांगत भाजपकडून आफताबुद्दीन मोल्ला यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.