उदयनिधींचा उद्धटपणा! न्यायालयाने फटकारल्यानंतरही सनातनविरोधी वृत्ती कायम

    07-Nov-2023
Total Views |

Udaynidhi Stalin


चेन्नई :
सत्तेत असलेल्या नेत्यांनी फूट पाडणारी वक्तव्ये करू नयेत, असे म्हणत मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना फटकारले होते. मात्र, आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले तरीही मी सनातनला विरोध करत राहीन, असे वक्तव्य स्टॅलिन यांनी केले आहे.
 
आपण काहीही चुकीचे बोललो नसून आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबद्दल बोलताना उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, "मी काहीही चुकीचे बोललो नाही. मी जे बोललो ते योग्यच आहे आणि मी त्याला कायदेशीररित्या सामोरे जाईन. मी माझे विधान बदलणार नाही." मी माझ्या विचारसरणीबद्दल बोललो असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
तसेच आंबेडकर, पेरियार किंवा थिरुमावलवन जे म्हणाले होते त्यापेक्षा जास्त काहीही मी बोललो नाही. मी एक आमदार, मंत्री किंवा युवा सेक्रेटरी होऊ शकतो आणि कदाचित उद्या नसेनही पण माणूस असणं जास्त महत्त्वाचं आहे, असे ते म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले की, “आम्ही अनेक वर्षांपासून सनातनबद्दल बोलत आहोत, तर NEET हा ६ वर्षे जुना मुद्दा आहे. हा (सनातन) शेकडो वर्षे जुना मुद्दा आहे, त्याला आमचा सदैव विरोध राहील, असेही ते म्हणाले आहेत.
 
उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरियाशी करत सनातनला नष्ट करायचे असल्याचे वक्तव्य केले होते. दरम्यान, सनातनविरोधी वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई न केल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू पोलिसांना खडसावले होते.