कागद हा झाडापासून तयार होतो व पर्यावरणाचा र्हास टाळण्यासाठी कागदाचा कमीत कमी वापर व्हावयास हवा. ‘पेपरलेस सोसायटी’ हवी व संगणकीकरणाच्या सध्याच्या काळात हे अशक्यही नाही. पण, आपल्या देशात कागद वापरात सहा ते सात टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आर्थिक वर्षे २०२६-२७ पर्यंत या क्षेत्रातील वृद्धी दर ३० दशलक्ष टनांपर्यंत अपेक्षित आहे. त्यानिमित्ताने...
सध्या भारतात एकूण ८६१ पेपर मिल्स असून त्यापैकी ५२६ कार्यरत आहेत. या मिलची एकूण स्थापित क्षमता २७.१५ दशलक्ष टन आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या उद्योग संशोधनानुसार, भारत हा जागतिक स्तरावर कागदासाठी सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे.‘पेपरेक्स २०२३’ हे कागद उद्योगाचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन दि. ६ ते ९ डिसेंबर या कालावधीत ‘इंडिया एक्स्पो सेंटर’, दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात २० देशांतील सुमारे ७०० प्रदर्शन (उत्पादक) त्यांची उत्पादने प्रदर्शित करणार आहेत. या उद्योगातील लोकांना या प्रदर्शनात अद्ययावत तंत्रज्ञान, प्रगत यंत्रसामग्री आणि उपकरणे, कच्चा माल वगैरेची माहिती मिळेल. या प्रदर्शनाचे आयोजन ‘हाईव्ह इंडिया’ने केले आहे. या प्रदर्शनात सहभागी होणार्यांना विविध कागदांची ओळख होऊ शकेल व निर्यातीच्या संधीही समजून घेता येतील.
या प्रदर्शनात विविध प्रकारचे कागद, छपाई, बांधणी, प्रकाशन यांचे स्टॉलही असणार आहेत. टिश्यूपेपर, कोलगेट बॉक्स यांच्या उत्पादनासाठी लागणारी यंत्रसामग्री, तंत्रज्ञान वगैरेंचे स्टॉलही प्रदर्शनात असतील. या ‘एक्स्पो’मध्ये ‘ग्रीन टेक्नोलॉजी’द्वारे वाढ आणि टिकाऊपणा या विषयावर तांत्रिक परिषद होणार आहे. कागद, छपाई, बांधणी आणि बदल या विषयांवर ओपन सेमिनार होणार आहे. असोसिएशनद्वारे नेटवर्किंग मिटिंग आणि नवीन प्रॉडक्ट लाँच यांचाही समावेश असणार आहे. दरवर्षी हे प्रदर्शन हजारो जागतिक खरेदीदारांना आकर्षित करते. तसे यंदाही करेल, असा आयोजकांचा आशावाद आहे. कागद आणि बोर्ड उत्पादक, कागद व्यापारी, छपाईदार प्रकाशक आणि पेपर पॅकेजिंग कंपन्यांपासून ते गुंतवणूकदार असे सर्वांना सामावून घेणारे हे प्रदर्शन असेल. ज्या परदेशी कंपन्या भारतात पेपर उद्योगातील प्लान्ट विकत घेण्याचा किंवा स्थापन करण्याच्या विचार करीत असतील, अशांसाठी हे प्रदर्शन म्हणजे पर्वणी ठरु शकते. अनेक भारतीय पेपर मिलच्या मालकांना आता नवीन गिरणी सुरू करावयाच्या आहेत. तसेच त्यांच्या व्यवसाय वाढवायचा आहे व त्यांना जर हे संयुक्त प्रकल्पात करावयाचे असेल, तर त्यांना ती संधी या प्रदर्शनातून मिळू शकते.
काही कागद उत्पादकांनी एक नवीन व अधिक पर्यावरणपूरक असा कागद प्लास्टिक पॅकेजिंगला पर्याय म्हणून वापरणे सुरू केले आहे. याला ‘पेपर फोम’ असे म्हणतात. या प्रकारच्या कागदाचे गुणधर्म प्लास्टिक पॅकेजिंग सारखेच असतात. हायड्रोकार्बनवर आधारित पेट्रोकेमिकलच्या वाढणार्या किमती व सिंथेटिक कोटिंगबाबच्या वापराची पर्यावरणबद्दल जागरुकता लक्षात घेऊन, झिन (एक प्रकारचे मक्याचे प्रोटीन)याचा वापर पॉपकॉर्नच्या पिशव्या तयार करण्यासाठी होत आहे. लाकडाचा लगदा, बांबू, सलाई आणि सबाई गवत, तसेच मोलॅसिस यांसारख्या कच्च्या मालापासून कागद तयार करतात. १३व्या शतकात अरब व्यापार्यांनी भारतात कागद निर्मितीची ओळख करून दिली, असे मानले जाते. कागदाचा जन्म चिनी हान राजवंशाच्या अंतर्गत इसवी सन १०५ मध्ये झाला. त्साई लुन या न्यायालयाच्या अधिकार्याने कागद निर्मिती प्रक्रियेचा शोध लावला.
ज्यामध्ये प्रामुख्याने चिंध्या कच्चा माल म्हणून वापरला गेला. प्राचीन लेखकांनी कागद अस्तित्वात असण्याआधी चित्रे आणि चिन्हांद्वारे संवाद साधला. झाडाच्या सालात, गुहेच्या भिंतींवर शब्द कोरले. पॅपिरस किंवा मातीच्या गोळ्यांवर शब्द रेखाटले. कागदाशिवाय आपण राहण्याची कल्पनाही आज करू शकत नाही. ई-मेल आणि डिजिटल युगातही कागद आपल्याला लागतोच.कागदाच्या शोधामुळे साहित्य आणि साक्षरतेचा प्रसार झाला. परिणामी, पुस्तके वापरण्यास अधिक सोयीस्कर व स्वस्त झाली. कागदनिर्मिती इस्लामिक जगातून पश्चिमेकडे युरोपमध्ये पसरली, असेही सांगितले जाते. १३व्या शतकात अरब व्यापार्यांनी कागद निर्मिती भारतात आणली. तिने पारंपरिक लेखन सामग्रीची पूर्णपणे जागा घेतली. प्राचीन काळी लेखन आणि शिलालेख सामान्यतः बांबूच्या गोळ्या किंवा रेशमाच्या तुकड्याांवर बनवले जात असे. पण, रेशीम महाग व बांबू जड असल्याने ते वापरण्यास सोयीचे नव्हते. परिणामी कार्ड लुन यांनी झाडांची साल, जुन्या चिंध्या आणि मासेमारीच्या जाळ्यांपासून कागद तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली.
भारतात कागद निर्मिती कशी होते?
लाकूड तंतू हे सेल्युलेसिक घटक आहेत, जे झाडांमधून काढले जातात आणि पेपर तयार करण्यासाठी वापरले जातात. भारतातील कागद उत्पादन उद्योगाला लाकूड फायबरपासून लगदा मिळतो. यामुळे तंतू तुटतात आणि कागदाचा लगदा तयार होतो. लगद्यावर प्रक्रिया करून त्यावर दाबून कागद तयार केला जातो. भारतात मध्ययुगीन काळापासून हस्तलिखिते लिहिण्यासाठी कागदाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. भारतात कागद उद्योग स्थापन करण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न १८६७ मध्ये कोलकाता जवळील बल्लीगंज येथे ‘रॉयल बंगाल पेपर मिल’च्या स्थापनेने झाला.लगदा आणि कागद उद्योगामध्ये लाकडाचा कच्चा माल म्हणून वापर करणार्या आणि लगदा पेपरबोर्ड आणि इतर सेल्युलोज आधारित उत्पादने तयार करणार्या कंपन्यांचा कागद निर्मितीत सामावेश होतो. जगातील कागद आणि पेपरबोर्डच्या उत्पादनात भारतीय कागद उद्योगाचा वाटा सुमारे दोन टक्के आहे. उद्योगाची अंदाजे उलाढाल रुपये ३५ हजार कोटी रुपये आणि तिजोरीत योगदान सुमारे तीन हजार कोटी रुपये आहे.
कागद तयार करण्यासाठी बांबूच्या लाकडाचा वापर केला जातो. पेपरमिल्स साधारणपणे बांबू, निलगिरी आणि सुबाभूळ या झाडांच्या लाकडापासून कागद बनवितात. हल्ली कागदनिर्मितीसाठी सुबाभूळ लाकूड फार मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. पेपरमिल्समध्ये भंगार कागदाचाही पुनर्वापर केला जातो. यासाठी वर्तमानपत्रांचा रद्दी कागद विकत घेतला जातो. एक झाड अंदाजे १६ कागद तयार करते, म्हणून एक टन कागद तयार करण्यासाठी २५ झाडे लागतात. महाराष्ट्रात बल्लारपूर (जिल्हा- चंद्रपूर) येथे फार मोठ्या प्रमाणात जंगल असल्यामुळे महाराष्ट्रात येेथे कागदनिर्मिती होते. ‘सतिया इंडस्ट्रीज लिमिटेड’ ही भारतातील सर्वात मोठी लाकूड आणि कृषी आधारित कागद उत्पादन कंपनी आहे. सध्या पश्चिम बंगाल हे राज्य देशातील कागदाच्या उत्पादनात आघाडीवर आहे. चलनी नोटा तयार करण्यासाठी कापसापासून विशिष्ट पद्धतीने तयार केलेले कागद आणि विशेष शाई वापरली जाते.
या पेपरचा काही भाग महाराष्ट्राच्या करन्सी नोट प्रेसमध्ये आणि काही मध्य प्रदेशातील होशंगाबाद पेपर मिलमध्ये तयार केला जातो. काही कागद जपान, ब्रिटन आणि जर्मनी येथूनही आयात केला जातो.नोटांची छपाई देशात फक्त चार ठिकाणी होते त्यामध्ये नाशिकरोड, देवास (इंदूर जवळ मध्य प्रदेश) नोटा छपाईचा कागद पुरविणाररा कारखाना होशंगाबाद येथे आहे. नाशिकमधील कारखाना १९२८ पासून कार्यरत आहे. कर्नाटकात म्हैसूर येथे नोट छपाई होते. हैदराबाद येथे स्टॅम्प पेपर, पोस्टाची तिकिटे छापली जातात. बहुतेक पुस्तकांच्या आतील पानांसाठी ‘अनकोटेड पेपर स्टॉक’प्रकारचा कागद आणि पुस्तकाच्या कव्हरसाठी कोटेड कव्हर स्टॉक पेपर वापरला जातो. कॉफीटेबल बुकसाठी मॅट आर्ट पेपर वापरला जातो. पेपर कप उत्पादन क्षेत्रात नफ्याचे साधारण प्रमाण १४ टक्के आहे आणि प्लास्टिक कप वापरू नयेत, असा नियम अस्तित्वात असल्यामुळे पेपर कप उद्योगात मुसंडी मारायला उद्योजकांना चांगली संधी उपलब्ध आहे.