‘एक्स’, ‘टेस्ला’ आणि ‘स्टारलिंक’ या जागतिक कंपन्यांचे सर्वेसर्वा आणि अब्जाधीश एलॉन मस्क यांनी नुकतीच इस्रायलला भेट दिली. काही दिवसांपूर्वी एका ज्यूविरोधी वक्तव्याला मस्क यांनी चक्क समर्थन दिले आणि त्यानंतर ते जागतिक टीकेचे धनी ठरले. या पार्श्वभूमीवर मस्क यांची इस्रायल भेट ज्यूविरोधी टीकेचा पश्चाताप की आणखी काही...?
एलॉन मस्क.... अब्जाधीश उद्योजकाबरोबरच एक बेधडक, स्पष्टवक्ता म्हणून त्यांची वैश्विक ओळख. तसेच धडाकेबाज आणि बेदरकार निर्णय घेणारा, एक आत्मकेंद्री भांडवलवादी म्हणून मस्क यांची हेटाळणीही तशी नित्याचीच. ‘ट्विटर’च्या खरेदीपासून, त्या कंपनीच्या ‘सीईओ’ची तडकाफडकी हकालपट्टी असेल किंवा थेट ‘ट्विटर’च्या चिमणीला उडवून त्याचे ‘एक्स’ असे नामकरण असेल, मस्क यांच्या अनपेक्षित निर्णय-धक्क्यांनी अख्ख्या जगाचे लक्ष वेळोवेळी वेधून घेतले. त्यात नुकतीच इस्रायलला मस्क यांनी भेट दिल्यामुळे ते जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आले नसते तरच नवल!
खरं तर एलॉन मस्क हे कुठल्याही राष्ट्राचे, जागतिक संघटनेचे प्रमुख नाहीत. पण, तरीही एखाद्या राष्ट्रप्रमुखाप्रमाणे किंवा कुठल्या तरी जागतिक संघटनेच्या अध्यक्षाप्रमाणे त्यांनी इस्रायलला संपूर्ण सुरक्षाकवचात भेट दिली. अशाप्रकारे एका जागतिक समाजमाध्यम कंपनीच्या प्रमुखाने थेट युद्धभूमीवर उतरण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आणि नवीन पायंडा म्हणावा लागेल. यापूर्वी रशिया-युक्रेन युद्धात मस्क यांनी त्यांच्या ‘स्टारलिंक’ कंपनीच्या माध्यमातून सॅटेलाईट इंटरनेट सेवा युक्रेनला देऊ केली होती. परंतु, यंदा मस्क यांनी युद्धविरामादरम्यान इस्रायलला प्रत्यक्ष भेट देत, ‘हमास’च्या दहशतवादी कृत्यांचा जाहीर निषेध केला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासोबत किबुत्झला (इस्रायलमधील छोटी गावे) भेट देऊन पीडितांच्या वेदना, ‘हमास’च्या नृशंस कारनाम्यांचे व्हिडिओ पुरावे त्यांनी आँखोंदेखी पाहिले. एवढेच नाही तर स्वतः मस्क यांनी या स्थळांचे आवर्जून चित्रीकरण वगैरेही केले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी ज्यूविरोधवादाचे (अॅण्टिसेमिटेझिम) समर्थन आणि आज अचानक ज्यूविरोधी ‘हमास’च्या कारवायांची कठोर शब्दांत निंदा, अशी ३६० अंशांच्या कोनात मस्क यांची बदललेली भाषा बरेच काही सांगून जाते.
त्याचे झाले असे की, ‘एक्स’वरील एका नेटकर्याने दावा केला की, एकीकडे ज्यू लोक हे जगभरातील श्वेतवर्णियांबद्दल द्वंदात्मक द्वेष पसरवित आहेत आणि दुसरीकडे ज्यूंची अपेक्षा आहे की, त्यांच्याबद्दलचा असा कोणताही द्वेष बाळगला जाऊ नये. आता या दाव्यावर एलॉन मस्क यांनी जाहीरपणे ‘मी सहमत आहे’ अशी कमेंटही केली. एवढेच नाही तर त्यांनी ‘अॅण्टी डिफेमेशन लीग’ (एडीएल)वरही टीकास्त्र डागले. ‘एडीएल’ ही जागतिक संस्था ज्यूविरोधात लढण्यासाठी सक्रिय पुढाकार घेते. त्याच ‘एडीएल’विषयी बोलताना मस्क म्हणाले की, “पाश्चिमात्त्य देश ज्यू धर्मियांना आणि इस्रायलला समर्थन देत असले, तरी ‘एडीएल’ ही संस्था मुद्दाम पाश्चिमात्य देशांना लक्ष्य करते. त्याचे कारण म्हणजे, ‘एडीएल’ त्यांच्या सिद्धांतांनुसार ज्यूंना लक्ष्य करणार्या अल्पसंख्याक समुदायावर टीका करू शकत नाही.” आता साहजिकच या ‘ज्यू विरुद्ध श्वेतवर्णीय’ सिद्धांताला दिलेल्या समर्थनावरून मस्क यांच्यावर टीकेची झोड उठली. एवढेच नाही तर अमेरिकन सरकारनेही कठोर शब्दांत मस्क यांच्या या शब्दांची निंदा केली. एवढ्यावरही हा सगळा प्रकार थांबला नाहीच. ज्यू मंडळींसह कित्येक श्वेतवर्णियांनी मस्क यांचा हा दावा खोडून काढत, त्यांच्या कंपन्यांविरोधात चक्क बहिष्कारास्त्र उगारले.
आम्ही ‘एक्स’ किंवा तत्सम तुमच्या कंपनीची उत्पादने/सेवा वापरणार नाही, असा हा साधासुधा बहिष्कार नव्हे, तर अमेरिकेसह युरोपातील बड्या कंपन्यांनी ‘एक्स’वरील त्यांच्या उत्पादन/सेवांच्या जाहिरातीच बंद केल्या. यामध्ये अगदी ‘अॅपल’पासून ते ‘कॉमकास्ट’, ‘वॉर्नर ब्रदर्स’, ‘सीबीएस’, ‘आयबीएम’ इत्यादी बड्या कंपन्यांचा समावेश. एवढेच नाही तर ’युरोपियन युनियन’ या जागतिक संघटनेनेही मस्क यांच्या विधानाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, ‘एक्स’वरील जाहिरातींना लगोलग स्थगिती दिली. परिणामी, एका आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यात ‘एक्स’वरील जाहिरातींचे उत्पन्न तब्बल ६० टक्क्यांनी घटले. तसेच ‘एक्स’चा वापरही सात टक्क्यांनी कमी झाल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे ‘टेस्ला’ कंपनीतील गुंतवणूकदारांनीही मस्क यांच्या विधानावर नापसंती व्यक्त करत, कंपनीतून गुंतवणूक काढून घेण्याची धमकी दिली. एका विधानावरून आपली आर्थिक कोंडी होत असल्याचा साक्षात्कार झाल्यानंतरही मस्क मात्र “पैसा येतो आणि जातो, त्याने मला काहीही फरक पडत नाही,” अशा आविर्भावातच रममाण होते. परंतु, अचानक सोमवारी ते नेतान्याहू यांच्यासोबत इस्रायलमध्ये दिसल्यानंतर, मस्क यांचा हा दौरा म्हणजे ‘डॅमेज कंट्रोल’साठीची ‘पीआर एक्सरसाईझ’ तर नाही ना, म्हणून एकाएकी चर्चांना उधाण आले.
म्हणा, ही बाब मस्तमौला मस्क हे कधीही कबूल करणार नाहीत, हे शंभर टक्के खरे. पण, यानिमित्ताने हे मात्र मान्य करावेच लागेल की, अमेरिकसह पाश्चात्य देशातील ज्यू धर्मियांची सर्वच क्षेत्रांत ‘लॉबी’ अतिशय सक्रिय आहे. त्यामुळे कुठेही ज्यूविरोधी वक्तव्ये, घटना घडल्या की त्याची तीव्र प्रतिक्रिया या वर्तुळातून उमटते, हा आजवरचा पूर्वेतिहास. पण, आपल्या तोंडाला लगाम न लावता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने बरळत सुटलेल्या मस्क यांनाही आता याचा जोरदार दणका बसला. म्हणूनच पश्चातापासाठी, आपल्या चुकीच्या परिमार्जनासाठीच मस्क यांनी इस्रायलला भेट देऊन सगळे काही आलबेल असल्याचे दाखवण्याचा उशीरा का होईना शहाणपणा दाखविला, असेच म्हणता येईल. विशेष म्हणजे, नेतान्याहूंनी देखील या भेटीत मस्क यांच्या वादग्रस्त विधानाचा मुद्दा उपस्थित केला नसल्याचे समजते.
शेवटी हे लक्षात घ्यायला हवे की, कुठल्याही देशाचे सरकार, राष्ट्रप्रमुख यांना अशा बड्या उद्योजकांशी कायमस्वरुपी संबंध बिघडवणे उद्योग-रोजगाराच्या दृष्टीने निश्चितच परवडणारे नाही आणि विशेष करून जर तो उद्योजक एलॉन मस्कसारखा ‘मीडिया मुगल’ असेल, तर विचारायलाच नको. त्यामुळे नेतान्याहूंनीही काहीशी सामंजस्याची आणि व्यवहार्य भूमिका घेत, मस्क यांच्याकडून ‘हमास’विरोध, ‘स्टारलिंक’ इंटरनेट सेवा ‘हमास’च्या हाती लागणार नाही, याची या भेटीत पुरती तजवीज करून घेतलेली दिसते. पण, यानिमित्ताने पुन्हा एकदा वैश्विक राजकारणातील समाजमाध्यमे, त्यांच्या प्रमुखांच्या समर्थन-विरोधाच्या अनाकलनीय भूमिका आणि यामागच्या अर्थकारणाच्या पदराचे हे आकलन महत्त्वाचे ठरावे!