येत्या पाच वर्षांत भारत आणि बॉलिवूडवर तेलगू लोकांचे राज्य! बीआरएस नेत्याचे वादग्रस्त विधान

    28-Nov-2023
Total Views | 44

Malla Reddi


हैदराबाद :
येत्या पाच वर्षांत तेलुगू लोक भारत, बॉलिवूड आणि हॉलिवूडवर राज्य करतील, असे वादग्रस्त वक्तव्य तेलंगणाचे मंत्री मल्ला रेड्डी यांनी केले आहे. 'ॲनिमल' चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावर सगळीकडून टीका करण्यात येत आहे.
 
२७ नोव्हेंबर रोजी संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता रणवीर कपुर हैदराबादला गेला होता. १ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून रणवीर कपुरने यात मुख्य भूमिका साकारली आहे. यावेळी बीआरएस नेते आणि मंत्री मल्ला रेड्डी हेदेखील या कार्यक्रमात उपस्थित होते.
 
मल्ला रेड्डी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले की, “रणवीर जी, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. पुढच्या काळात, पुढील पाच वर्षांत भारत, बॉलीवूड आणि हॉलीवूडवर पूर्णपणे आमचे तेलुगू लोक राज्य करतील." रणवीर कपुरकडे बघत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

 
ते पुढे म्हणाले की, "आता एक वर्षानंतर हैदराबादला शिफ्ट व्हावे लागते. का? कारण बॉम्बे जुने झाले आहे. भारतात एकच शहर आहे, ते म्हणजे हैदराबाद. आमचे तेलुगू लोक स्मार्ट आहेत. ते राजामौली सारखे, दिल राजू सारखे आणि आता संदीप भय्या सारखे लोक आहेत. आमचे लोक संपूर्ण भारतावर, बॉलिवूड आणि हॉलीवूडवर राज्य करतील. आमचे हैदराबाद स्मार्ट आहे. आमचे तेलुगू लोक खूप हुशार आहेत. बघा आमची हिरोईन किती हुशार आहे. ‘पुष्पा’तर धूमधडाक्यात प्रदर्शित झाला,” असेही ते म्हणाले.
 
दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर टीका करण्यात येत आहे. मल्ला रेड्डी यांनी दारू प्यायली होती का, असा सवाल नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहेत. येत्या ३० नोव्हेंबर रोजी तेलंगणामध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार असून मल्ला रेड्डी हे मेडचाल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121