कल्याण : संविधानाच्या मुल्यांचे सर्व नागरिकांनी पालन करावे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी रविवारी केले. संविधान दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. संविधान दिनानिमित्त उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी वर्गास तसेच नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या समयी उपस्थित असलेल्या बहुसंख्य अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांचेमार्फत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिकरीत्या वाचन करण्यात आले.
त्याचप्रमाणे दि. 26/11/2008 रोजी मुंबई शहरावर झालेल्या दहशदवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आणि दहशदवाद्यांशी लढा देताना शहीद झालेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहून मौन पाळण्यात आले. यावेळी महापलिका उपआयुक्त अवधुत तावडे, वंदना गुळवे, धैर्यशील जाधव, विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव, माजी महापौर रमेश जाधव, माजी पालिका सदस्य रेखा जाधव, जेष्ठ संविधान अभ्यासक ॲड.किरण चेन्ने तसेच महापालिकेचा इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच नागरिक उपस्थित होते. यावेळी क.डो.म.पा बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था कल्याण यांच्या वतीने नवनियुक्त आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांस भारतीय संविधानाचे पुस्तक व महापुरुषांच्या प्रतिमा देण्यात आल्या. महापालिकेच्या विविध शाळांतही संविधान दिनाचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.