‘बिईंग डिफरंट’ म्हणजेच प्रस्तुत ‘धर्म माझा वेगळा’ हे पुस्तक ललित, हलके-फुलके, रसाळ वगैरे अजिबात नाही. तलवार किंवा बंदूक ही रसाळ असून कशी चालेल? ती खणखणीत, कठोरच असायला हवी. तसेच हा ग्रंथ म्हणजे एक बौद्धिक शस्त्र आहे. प्रत्येक हिंदूने, विशेषतः कार्यकर्त्याने ते शांतपणे वाचून, समजून, पचवण्याची फार-फार गरज आहे.
इसवी सनाच्या सातव्या शतकात आक्रमक इस्लामची टोळधाड भारतावर कोसळली. इस्लामचे आक्रमण नुसतेच लष्करी-राजकीय नव्हते, ते सामाजिक-धार्मिक-सांस्कृतिकही होते. प्रथम लष्करी बळावर एखादा भूभाग पादाक्रांत करायचा आणि मग राजकीय दबावाने धार्मिक जुलूम करून त्या भूभागातील समाजाची संस्कृतीच बदलून टाकायची, पचवून टाकायची असे ते तंत्र होते. उदा. इजिप्त आणि इराण. या देशांवर इस्लामने फक्त राजकीय वर्चस्वच मिळविले असे नव्हे, तर त्यांची मूळ संस्कृतीच खाऊन गिळून, पचवून टाकली.
भारतावर मुहम्मद बिन कासीम, मुहम्मद गझनी, मुहम्मद घोरी यांसारख्या लष्करी लोकांनी राजकीय आक्रमणे केली. पाठोपाठ अरबस्तान आणि इराणमधून फार मोठ्या प्रमाणावर फकीर, अवलिये, सुफी हे सांप्रदायिक लोक आले. त्यांनी लष्करी सुलतानांप्रमाणे हिंदू देवस्थाने (यांत बौद्ध मठ, विहार आणि जैन मंदिरेही आलीच) तर उद्ध्वस्त केलीच; पण भरपूर बाटवाबाटवीही केली. यासाठी त्यांनी जबरदस्ती सोबतच गोड-गोड बोलणे, किरकोळ चमत्कार करून दाखवणे याही मार्गांचा अवलंब केला आणि इस्लामचा प्रचारप्रसार केला. साध्या भाषेत सांगायचे तर ईश्वर अल्ला, राम-रहीम, कृष्ण-करीम हे एकच आहेत, सर्व धर्म सारखेच आहेत आणि अमका-तमका पीर हा नवसाला पावतो, या गोष्टींचा सर्वसामान्य हिंदू जनमानसावर प्रचंड पगडा आहे.
या आणि अशा अनेक भ्रामक समजुतींचा कडेलोट १९९०च्या दशकात झाला. अयोध्या आंदोलनामुळे जागृत होऊ पाहणार्या हिंदू समाजाला संभ्रमित करण्यासाठी इस्लामी आणि डाव्या विचारवंतांनी व्यापक स्वरुपात बौद्धिक लढाईला सुरुवात केली. त्या मोहक, मायावी, उच्च वैचारिकतेचा आव आणणार्या प्रचारयुद्धाला तोंड देण्यासाठी सीताराम गोयल या माणसाच्या पुढाकाराने अनेक हिंदुत्वप्रेमी विद्वान पुढे सरसावले. अरुण शौरी, रामस्वरुप, देवेेंद्र स्वरूप गोयल, डॉ. एन. एस. राजाराम अशा भारतीय विद्वानांसह डॉ. डेव्हिड फ्रॉवली हे अमेरिकन, डॉ. कॉनराड एल्स्ट असे विदेशी विद्वानही पुढे आले. या सर्वांच्या अतिशय तर्कनिष्ठ, प्रभावी मांडणीमुळे मतपरिवर्तन होऊन ‘टाईम्स’ गटात हयात घालवलेले गिरिलाल जैन, एम. व्ही. कामत असे ज्येष्ठ पत्रकार संपादकसुद्धा हिंदुत्वाच्या बाजूने लिहू लागले. त्यावेळी या सर्व मंडळींनी लिहिलेली आणि सीताराम गोयलांच्या ‘व्हॉईस ऑफ इंडिया’ या प्रकाशन संस्थेने छापलेली पुस्तके म्हणजे आधुनिक काळात, आधुनिक परिभाषेत हिंदुत्वाची कशी तर्कनिष्ठ, बुद्धीनिष्ठ मांडणी करावी, याचे आदर्श वस्तुपाठ आहेत.
आता या सगळ्या घटनांना तीन दशके उलटली आहेत. म्हणजे वरील ग्रंथ जुने झालेत असे नव्हे. पण, हिंदुत्वाला गिळू पाहणार्या सांप्रदायिकांनी नवे युद्ध, नवी मांडणी समोर आणली आहे. जुनेच मुद्दे नव्या परिवेषात पुढे आणले आहेत. त्यातला सगळ्यात मूळ मुद्दा जो हिंदू जनमानसाला फारच पटकन आवडतो, अपील होतो, तो मुद्दा म्हणजे सर्व धर्मांचे सांगणे अखेर एकच आहे. ईश्वर एकच आहे, कुणी त्याला ‘देव’ म्हणतो, कुणी ‘अल्ला’ म्हणतो, कुणी ‘गॉड’ म्हणतो. प्रत्येक हिंदू व्यक्तीला हे म्हणणे लगेच पटते, आवडते. कारण, शतकानुशतके आम्ही हेच ऐकत-वाचत-आचरत आलो आहोत की, कुणी शिव म्हणा, कुणी विष्णू म्हणा, कुणी देवी म्हणा,कुणी गणपती म्हणा, कुणी राम-कृष्ण-नरसिंह काहीही म्हणा, अखेर सगळी एकाच ईश्वराची रुपे आहेत.
प्रस्तुत ‘धर्म माझा वेगळा’ या ग्रंथात लेखक राजीव मल्होत्रा यांनी नेमके हिंदूंच्या या नाजूकतेवरच बोट ठेवले आहे. ते अत्यंत तर्कनिष्ठ, बुद्धीनिष्ठ पद्धतीने आपल्या हिंदू समाजाला सांगत आहेत की, अरे आपल्या संतांनी आपल्याला जे सांगितले की नावे, रुपे, भिन्न असली तरी ईश्वर शेवटी एकच आहे, मार्ग भिन्न असले तरी अखेर ते एकाच ईश्वरापर्यंत पोहोचतात, ते त्यांचे प्रतिपादन आध्यात्मिक पातळीवर होते आणि हे आता जे आपल्याला सांगत आहेत की, ईश्वर, अल्ला आणि गॉड एकच आहेत, हे लबाड लोक आहेत. यांचे हे प्रतिपादन आध्यात्मिक नसून, तो त्यांच्या राजकीय-सांप्रदायिक -सांस्कृतिक आक्रमणाच्या डावपेचातला एक भाग आहे. तेव्हा नीट जागे व्हा आणि त्यांची ही कूटनीती नीट समजून घ्या. हिंदू (यात बौद्ध, जैन आणि शीख आलेच) धर्म हा वेगळा आहे, तो धर्म आहे आणि हे ख्रिश्चन नि इस्लाम हे धर्म नव्हेत, तर संप्रदाय आहेत.
त्याचबरोबर लेखक पाश्चिमात्य विचारवंतांनाही हेच ठणकावून सांगतो आहे की, आजपर्यंत तुम्ही तुमच्या सांप्रदायिक चष्म्यातून आमचा देश, आमचा धर्म आणि आमची संस्कृती पाहिलीत, मांडलीत. तुमच्या राजकीय वर्चस्वामुळे आणि विज्ञान-तंत्रज्ञानातील तुमच्या घोडदौडीमुळे दीपून गेलेल्या आमच्या विद्वानांनीही तुमच्याच चष्म्यातून स्वतःच्या धर्म-संस्कृतीची चिकित्सा केली. पण, आता या ग्रंथाद्वारे मी आमच्या दृष्टिकोनातून तुमच्या संस्कृतीकडे पाहतो आहे. लक्षात घ्या, आमचा धर्म आहे. धर्म शब्दाचा इंग्रजीत समर्पक अनुवादच होऊ शकत नाही. तुमचे संप्रदाय आहे. ‘रिलिजन’ आहेत. त्यामुळे ‘सर्व धर्म सारखेच’ ही तुमची मांडणीच चुकीची आहे. धर्म आणि संप्रदाय एकच कसे असतील? आम्ही वेगळे आहोत म्हणून या ग्रंथाचे मूळ इंग्रजी नाव आहे- ‘बिईंग डिफरंट.’
राजीव मल्होत्रा हे मूळचे दिल्लीचे. आता ते अमेरिकेत वास्तव्याला असूल मॅसेच्युसेटस् विद्यापीठ डार्टमथ येथे ‘सेंटर फॉर इंडिक स्टडीज’मध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. २१व्या शतकात हिंदुत्वाविरोधात कोणत्या शक्ती काम करीत आहेत, त्यांची कार्यपद्धती कशी फसवी, मायावी आहे, या विषयावरचे त्यांचे ‘बे्रकिंग इंडिया’ हे पुस्तक २०११ साली प्रसिद्ध झाले आणि जगभर प्रचंड गाजले. त्यानंतर ‘बिईंग डिफरंट’(२०११), ‘इंद्र’ज नेट’ (२०१४), ‘दि बॅटल फॉर संस्कृत’(२०१९) आणि ‘स्नेक्स इन दि गंगा ः ब्रेकिंग इंडिया २.०’ (२०२२) अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध झालेली असून, ती सगळीच प्रचंड गाजत आहेत. ‘इंडिक स्टडीज’ म्हणजे ‘भारतविषयक अध्ययन’ या नावाखाली भारताचा म्हणजेच हिंदू धर्म-संस्कृती-इतिहास-समाज यांचा अभ्यास करून उच्च वैचारिक, मोहक, मायावी मांडणीद्वारे हिंदूंना संभ्रमित करण्याचा नवा खेळ पाश्चिमात्य देशांमध्ये सुरू झालेला आहे. वेंडी डूनियर ही विदुषी (?) हे यातले एक ठळक नाव. राजीव मल्होत्रांनी असल्या विद्वान आणि विदुषींच्या प्रतिपादनाचे अत्यंक तर्कशुद्ध पद्घतीने वाभाडे काढले आहेत.
अलीकडे अशीही एक पद्धत रूढ झाली आहे की, कठीण विषय अगदी सुलभ, सोपा करून वाचकांसमोर मांडायचा. अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालाही प्रतिपाद्य विषय समजावा म्हणून अशी मांडणी केली जाणे योग्यही आहे. पण, काही-काही विषयच असे असतात की, ते त्यांच्या तोलाने, त्यांच्या वजनानेच मांडावे लागतात. मग सर्वसामान्य वाचकांच्या दृष्टीने ते अवजड, अवघड आणि तर्ककर्कश होतात. पण, त्याला इलाज नसतो. प्रभावी वकिली युक्तिवाद हा कठोर, तर्ककर्कश्शच असला पाहिजे. अशी पुस्तके रोज थोडी-थोडी वाचून, समजून घेत, पवचून घेत पुढे जायचे असते.
‘बिईंग डिफरंट’ म्हणजेच प्रस्तुत ‘धर्म माझा वेगळा’ हे पुस्तक त्या प्रकारचे आहे. ते ललित, हलके-फुलके, रसाळ वगैरे अजिबात नाही. तलवार किंवा बंदूक ही रसाळ असून कशी चालेल? ती खणखणीत, कठोरच असायला हवी. तसेच हा ग्रंथ म्हणजे एक बौद्धिक शस्त्र आहे. प्रत्येक हिंदूने, विशेषतः कार्यकर्त्याने ते शांतपणे वाचून, समजून, पचवण्याची फार-फार गरज आहे. तर्कनिष्ठ युक्तिवादाने भरलेला ‘धर्म माझा वेगळा’ : बौद्धिक लढाईसाठी उपयुक्त शस्त्र हा ग्रंथ शक्य तितक्या सोप्या मराठी भाषेत अनुवादित करणे, ही एक मोठीच अवघड कामगिरी होती. अनुवादक पुलिंद सामंत यांनी हे अवघड आव्हान ताकदीने पेलले आहे. ते स्वतः कॉर्पोरेटक्षेत्रातील मानव संसाधन विभागातील उच्चपदस्थ अधिकारी असून, भारत आणि आग्नेय आशिया यांच्यातील आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचे अभ्यासक, लेखक आहेत. या विषयावर त्यांचा स्वतंत्र ग्रंथही प्रसिद्ध झालेला आहे.
हिंदुत्वप्रेमी कार्यकर्त्यांना बौद्धिक दारुगोळा पुरवणार्या या ग्रंथाच्या अनुवादाचे काम पुलिंद सामंत यांच्याकडे सोपवून आणि मुळात असा अवजड-अवघड पण आवश्यक बौद्धिक ग्रंथ प्रकाशित करण्याचे कार्य ‘भारतीय विचार साधना’ या प्रकारात संस्थेने ते उत्तमरितीने पार पाडले आहे. या ग्रंथाच्या संदर्भ ग्रंथांच्या सूचीने साडेसतरा पाने व्यापली आहेत. लेखक राजीव मल्होत्रा यांच्या व्यासंगाची झलक म्हणून हे सांगितले.
मुखपृष्ठ, मांडणी, छपाई इत्यादी तांत्रिक बाबी समाधानकारक.
पुस्तकाचे नाव : धर्म माझा वेगळा
मूळ लेखक : राजीव मल्होत्रा
मराठी अनुवाद : पुलिंद सामंत
प्रकाशक : भारतीय विचार साधना
पृष्ठसंख्या : ५८७
मूल्य : ६५० रु.