मोतीबाग संघ कार्यालयाच्या वास्तूत ‘समरसता मंचा’चे सर्व महत्त्वाचे निर्णय झाले. सेवाकार्य करणार्या बहुजन समाजातील कार्यकर्त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम, सामाजिक परिषदा, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या जीवनकार्यावरील अभ्यासवर्ग, पहिली समरसता यात्रा, सामाजिक समरसता पुरस्कार, समरसतेचे पंचक करण्याचा निर्णय, असे सर्व निर्णय मोतीबाग कार्यालयात झाले. म्हणून मोतीबाग कार्यालयाला ‘समरसता विचारांची जन्मभूमी’ असे म्हटले पाहिजे.
मोतीबाग कार्यालय महाराष्ट्रातील संघकार्याची कर्मभूमी आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा मोतीबाग कार्यालयाशी, त्यांच्या संघजीवनातील आयुष्यात संबंध येतोच. कार्यालय म्हणजे वास्तू असते आणि वास्तू म्हणजे चार भिंती, निवास, भोजनाची व्यवस्था वगैरे. या अर्थाने मोतीबाग ही दगड, वीट, रेती, सिमेंट यांची वास्तू नाही. मोतीबागेत निवास करणारे प्रचारक आणि त्यांच्या वागण्या-बोलण्यातून, व्यवहारातून प्रगट होणार्या संघाची स्पंदने म्हणजेच मोतीबाग कार्यालय आहे. व्यक्तीपरत्वे असंख्य कार्यकर्त्यांच्या असंख्य आठवणी असतात. नानाराव ढोबळे, तात्याराव बापट, दामूअण्णा दाते, वसंतराव केळकर, शिवराय तेलंग, तात्या इनामदार अशा अनेक दिवंगत प्रचारकांच्या असंख्य आठवणी म्हणजे मोतीबाग. माझ्याही मोतीबागेच्या असंख्य आठवणी आहेत. त्या मी ‘समरसता मंचा’च्या कामापुरत्या मर्यादित ठेवतो.
दामूअण्णा दाते यांच्या नेतृत्त्वाखाली १९८५ सालापासून महाराष्ट्रात ‘सामाजिक समरसता मंचा’चे काम सुरू झाले. दामूअण्णा दाते हयात असेपर्यंत ‘समरसता मंचा’च्या सर्व बैठका मोतीबाग कार्यालयातच झाल्या. प्रत्येक बैठकीत सामूहिक चिंतनाद्वारे समरसता कार्याचा एक एक पैलू उलगडत गेला. ‘सामाजिक समरसता मंचा’चे काम म्हटले, तर फार सोपे आणि म्हटले तर फार अवघड होते. ते सोपे एवढ्यासाठी की, संघकार्यात म्हणजे शाखेत, शिबिरात, वर्गात, बैठकांत, कुणी कुणाची जात विचारीत नाही. सर्वांचे भोजन पंगतीत असते. वाढण्याचे काम स्वयंसेवक करतात. एकत्र खेळणं, एकत्र निवास करणं, हे संघ स्वयंसेवकांच्या अंगवळणी पडलेलं असतं. संघ स्वयंसेवकाला समता भाषणातून समजवावी लागत नाही. १९८५ पूर्वी ‘समता’ या विषयावर मी संघात एकही बौद्धिक वर्ग ऐकला नाही. एकच गोष्ट सतत ऐकत गेलो, ती म्हणजे ‘आम्ही भारतमातेची संतान आहोत, आमचा एक विशाल परिवार आहे, आम्ही सर्व परस्परांचे बंधू आहोत. ‘बंधुभाव’ याचेच दुसरे नाव ‘समरसता.’
‘समरसता’ ही संघ स्वयंसेवकांना समजावून सांगण्याची काही गरज नाही. ती समाजाला समजावून सांगण्याची गरज होती. प्रारंभीच्या अनेक बैठकांत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दामूअण्णा सांगत की, “संघात जातीभेद नाही, पण समाजात आहेत. संघात अस्पृश्यता नाही, पण समाजात आहे आणि म्हणून समाजमानसातून ती दूर करणे ही काळाची गरज आहे. यासाठी ‘सामाजिक समरसता मंचा’चे काम आपण सुरू केले आहे.” दामूअण्णा प्रांत स्तरावरचे प्रचारक असल्याने संघ-जिल्हा कार्यवाहांच्या बैठकीत मंचासाठी कार्यकर्ते देण्याचा ते विषय मांडत. त्यातून नवीन विषय पुढे येत.
एक जिल्हा कार्यवाह म्हणाला, “आमच्याकडे ‘तसा कुणी’ कार्यकर्ता नाही.” दामूअण्णांनी विचारले, “तसा कुणी, म्हणजे कोण?” त्याने उत्तर दिले, “म्हणजे मागासवर्गीय जातीतील किंवा अस्पृश्य वर्गातील असा कुणी नाही.” हे उत्तर आम्हा सर्वांसाठी धक्कादायक होते. मंचाचे काम संघातील जाती शोधून करण्याचे नाही, तर ज्याच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ आहेत, अशा कार्यकर्त्यांनी करण्याचे हे काम आहे. ही गोष्ट संघ कार्यकर्त्यांच्या गळी उतरविण्यास पहिली तीन-चार वर्षे तरी गेली असतील. संस्था म्हटली की तिला कार्यक्रम हवा. मंचाचा कार्यक्रम कोणता? यावरदेखील साधकबाधक चर्चा झाल्या. अशा चर्चेत प्रा. अनिरुद्ध देशपांडे, सुखदेव नवले, भि. रा. इदाते, मोहनराव गवंडी, प्रा. रमेश महाजन, गिरीश प्रभुणे, नामदेवराव घाडगे, प्रा. बापू केन्नूरकर, रवींद्र पवार आणि मी अशी मंडळी सहभागी होत. सामूहिक चिंतनातून कार्यक्रमाच्या रुपरेषा ठरत गेल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, गाडगे महाराज आदी थोर पुरुषांचे स्मरण दिवस वेगवेगळ्या वस्त्यांतून साजरे करावेत. उदा- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सवर्ण वस्त्यांमध्ये साजरी करायला पाहिजे, असा विषय आग्रहाने मांडण्यात आला. बैठकीत मांडले आणि लगेच अमलात आले, असे होत नसते. त्याला वेळ द्यावा लागतो. पुढील तीन-चार वर्षांमध्ये अनेक वस्त्यांतून पुण्यस्मरणाचे कार्यक्रम होऊ लागले. याचवेळी ‘सामाजिक समरसता मंच’ पत्रिका सुरू करण्याचा निर्णय झाला. सामाजिक विषयांवर समरसता मंच पत्रिकेचे विशेषांक निघाले. त्याची सार्वजनिक चर्चा होऊ लागली.
काही लोक म्हणू लागले, ‘दलितांना आपल्या जाळ्यात खेचण्यासाठी संघाने हा उपक्रम सुरू केला आहे,’ तर काही जण म्हणू लागले, ‘समरसता हे ‘स्लो पॉयजनिंग’ आहे. समरसता हा मुखवटा आहे. बाबासाहेबांनी ‘समता’ मांडली, संघवाले ‘समरसता’ म्हणतात. ‘समरसता’ हा मनुवादी शब्द आहेे.’ संघ टिकाकारांना टीका करण्याशिवाय काही उद्योग नसल्यामुळे ‘समरसता मंचा’च्या कुठल्याही कार्यकर्त्याने या टीकेला भीक घातली नाही. आपले कार्यक्रम चालू ठेवले. मोतीबाग संघ कार्यालयाच्या वास्तूत ‘समरसता मंचा’चे सर्व महत्त्वाचे निर्णय झाले. सेवाकार्य करणार्या बहुजन समाजातील कार्यकर्त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम, सामाजिक परिषदा, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या जीवनकार्यावरील अभ्यासवर्ग, पहिली समरसता यात्रा, सामाजिक समरसता पुरस्कार, समरसतेचे पंचक करण्याचा निर्णय, असे सर्व निर्णय मोतीबाग कार्यालयात झाले. म्हणून मोतीबाग कार्यालयाला ‘समरसता विचारांची जन्मभूमी’ असे म्हटले पाहिजे. आज ‘समरसता’ हा अखिल भारतीय विषय झालेला आहे, पण त्याची गंगोत्री ही मोतीबाग कार्यालय आहे.
जेव्हा ‘समरसता मंचा’चे काम सुरू झाले, तेव्हा ‘समरसता मंचा’कडे काही साहित्य नव्हते. केवळ दोन पुस्तिका होत्या. वसंत व्याख्यानमालेतील बाळासाहेबांचे १९७४चे ‘सामाजिक समता आणि हिंदू संघटन’ या विषयावरील भाषण आणि दत्तोपंत ठेंगडी यांचे ‘समरसतेशिवाय समता अशक्य’ हे भाषण. या दोन भाषणांची वैचारिक शिदोरी कार्यकर्त्यांकडे होती. मोतीबाग कार्यालयाच्या एका बैठकीत असा निर्णय झाला की, ३२ ते ४० पानांच्या १६ पुस्तिकांचा संच तयार करावा. सुखदेव नवले यांनी त्यात लक्ष घालून या १६ पुस्तिका तयार केल्या. नंतर दरवर्षी त्यात भर पडत गेली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाबाई आंबेडकर, संत गाडगेबाबा, गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवे, महात्मा फुले, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादी स्त्री-पुरुषांच्या सोप्या भाषेतील छोट्या पुस्तिका प्रकाशित झाल्या.
समाजजीवनात सामाजिक क्षेत्रात सतत काही ना काही प्रश्न निर्माण होतात. मंचाची स्थापना होईपर्यंत अशा प्रश्नांच्या बाबतीत संघाची सार्वजनिक भूमिका नसे. मंचाने ही भूमिका व्यक्त करण्याचे काम केले. रिडल्सवाद, मराठवाडा विद्यापीठ नामांतर, महात्मा फुले बदनामी, मंडल आयोग, असे त्याकाळच्या ज्वलंत प्रश्नांवर ‘सामाजिक समरसता मंचा’ने ‘राष्ट्र प्रथम’ या भूमिकेतून विचार मांडले, पत्रके काढली. हे सर्व निर्णय मोतीबाग कार्यालयात झालेले आहेत. एखादे पत्रक काढायचे ठरल्यानंतर पत्रकाच्या मसुद्यावर निवडक कार्यकर्ते साधकबाधक चर्चा करीत. कोणते शब्द टाळावेत, कोणते शब्द आग्रहाने मांडावेत, याचे निर्णय होत आणि नंतर ते पत्रक प्रकाशित केले जाई. हे सर्व निर्णय मोतीबाग कार्यालयात झालेले आहेत. १९८९ सालची ‘फुले-आंबेडकर संदेशयात्रा’ आणि २००५ सालची ‘समरसता यात्रा’ या दोन उपक्रमांनी महाराष्ट्राचे वैचारिक विश्व ढवळून निघाले. या यात्रांची सर्व पूर्वतयारी व नियोजन मोतीबागेतच झाले होते.
यथावकाश भटके-विमुक्त विकास परिषदेचे काम सुरू झाले. या परिषदेचे बहुसंख्य कार्यकर्ते भटके आणि विमुक्त समाजातीलच होते. त्यांचे मोतीबागेत येणे सुरू झाले. समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित बांधवांना मोतीबागेने ममतेने जवळ केले. त्यांना स्नेहभोजन दिले. रात्री त्यांच्या निवासाची व्यवस्था केली. संघकार्य तळागाळातील वर्गात घेऊन जाण्याच्या मार्गाची मोतीबाग ही साक्ष आहे.सुप्रसिद्ध कवी वामनदादा कर्डक यांना ‘समरसता’ पुरस्कार देण्याचे ठरले. मोतीबागेत ते दोन दिवस मुक्कामाला होते. लोकांना भरविलेल्या संघविषयक कल्पना डोक्यात घेऊन ते आले आणि जाताना डोकं स्वच्छ करून गेले. मोतीबागेच्या व्यवहारात नाटकीपणा, दिखाऊपणा, सोंगबाजी याला काही थारा नसतो. आपण जसे आहोत, तसेच व्यक्त व्हायचे. चेहर्यावर खोटे हास्य आणायचे नाही आणि कुणाचे बनावट स्वागत करायचे नाही. याला ‘पारदर्शिता’ म्हणतात. मोतीबाग वास्तूचा तो आत्मा आहे. मोतीबागेतून प्रारंभ झालेल्या ’समरसता मंचा’च्या कामाच्या प्रभावामुळे संघविरोधावर ज्यांची दुकाने चालली होती, त्यांचे दिवाळे वाजत गेले.
संघाला ‘मनुवादी’, ‘विषमतावादी’, ‘अस्पृश्यतावादी’ म्हणणे अवघड जाऊ लागले. या मालाला कुणी गिर्हाईक राहिला नाही. तरीदेखील स्वनामधन्य असे काही विद्वान महाराष्ट्रात आहेत, काही विद्यापीठात आहेत. तिथे बसून ते आपली दुकाने चालवीत असतात. मोतीबागेचा पवित्र स्पर्श जर त्यांना झाला, तर त्यांच्यातील रावणी प्रवृत्ती नक्कीच कमी होईल. परंतु, त्यांची प्रवृत्ती तशी नसल्यामुळे या स्पर्शापासून ते वंचित राहतील. काही जण स्पर्श होऊनही तसेच राहतात आणि हरीनिवासी होतात.अशा या मोतीबागेतून संघकार्याच्या अनेक बीजांना अंकुर फुटले आणि कालांतराने त्यांचे वृक्ष झालेले आहेत. ‘सहकार भारती’, ‘स्त्री शक्ती’, ‘जनकल्याण समिती’, सहकारी बँकांचा विकास, ‘भारतीय विचार साधना’ अशी अनेक नावे घेता येतील. प्रत्येकाचे मोतीबागेशी जैविक नाते जोडले गेलेले आहे. म्हणून मोतीबाग ही बांधाकामांच्या वस्तूंनी बनविलेली वास्तू नव्हे. या वास्तूच्या पायात असंख्य समर्पित कार्यकर्त्यांच्या जीवनाचा सुगंध आहे, म्हणून ही वास्तू सोन्याला सुगंध देणारी आहे.