आज मोतीबागेचा जो कायापालट झाला आहे, तो काळानुरूप आवश्यक असल्याचे नमूद करताना या वास्तू अगोदरपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करणारे आणि मोतीबागेची जडणघडण बघणारे श्रीधरपंत फडके यांनी मोतीबाग संघाकडे येण्यापूर्वी पुण्यात संघाची कार्यालये म्हणजे कार्यकर्त्यांची घरे होती, तेथूनच संघाचे काम चालायचे असे सांगितले.
मोतीबागेचे स्थान नदीच्या जवळ आहे. मोतीबागेत प्यायचे पाणी कॉर्पोरेशनचे तर वापराचे पाणी विहिरीचे असायचे, जेव्हा कॉर्पोरेशनची पाण्याची समस्या होती, तेव्हा मोतीबागेने शनिवारपेठेत पाणी पुरविले ही आठवण त्यांनी आवर्जून सांगितली.सुरुवातीला उत्पन्न मिळविण्यासाठी मंगल कार्यालय चालविण्यात आले तेव्हा याच कार्यालयात रामभाऊ म्हाळगी, मुकुंदराव लेले यांचे विवाहदेखील झाल्याचे ते म्हणाले.संघासाठी कार्यालय घेतले हा आनंद, अभिमान कार्यकर्त्यात होता, त्यामुळे उपनगरांतील शाखेतील कार्यकर्ते तर मोतीबागेत येऊ लागले. मात्र, ही संघटना समाजासाठी अहोरात्र कार्यरत असल्याचे अन्य लोकांना देखील लक्षात आले त्यामुळे तरुणांचा ओघ संघाकडे वाढल्याचे श्रीधरपंत फडके म्हणाले.
पानशेतचा प्रलय, चीनचे युद्ध हा प्रवास विषद करताना फडके म्हणाले की, मोतीबागेतून कार्य सुरू झाल्यानंतर गोव्याच्या सत्याग्रहासाठी, दादरा-नगर हवेली मुक्तिसंग्रामसाठी मोतीबागेतून स्वयंसेवक गेले होते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात तर येथे चहलपहल असायची.1961 साली पानशेत धरण फुटल्याने लकडीपुलावरून पाणी वाहत होते. मोतीबागेत पहिल्या मजल्यावर कमरेइतके पाणी होते. मात्र, मोतीबाग पूरग्रस्त होती तथापि अनेक लोकांनी असे सांगितले की, मोतीबाग कोपर्यावर असल्याने पाणी वळत होते, त्यामुळे मोतीबागेच्या आधाराने अनेक इमारती वाचल्या, ही आठवणदेखील महत्वाची आहे.
आणखी एक महत्त्वाची आणि संघाच्या समाजहित कार्याची साक्ष देणारी आठवण नमूद करताना पंतांनी पानशेत पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी, तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी स.गो.बर्वे यांना प्रमुख करून पानशेत पुनर्वसन समिती नेमली त्यामागे हेतू हा होता की, बर्वे यांना मतदारसंघातून उभे केले आणि रामभाऊ म्हाळगी यांचा पराभव करविला असे सांगितले, मात्र, त्याच बर्वे यांनी त्याहीपुढे जाऊन अशी कामगिरी केली की, त्यांनी या भागातील शनवार, नारायण कसबा भागात संघाचे स्वयंसेवक पूरग्रस्त आहेत. त्या सर्वांना आपले अधिकार वापरून प्लॉट देऊन सोसायटी स्थापन करण्यास सांगितले. आज सहकार नगर परिसरात ज्या 25-30 सोसायट्या आहेत. त्याच्या निर्मितीची तयारी मोतीबागेतून झाली, हे आवर्जून नमूद करावे लागेल, असे श्रीधरपंत फडके यांनी नमूद केले.
त्यानंतर 1962 साली चीनचे भारतावर आक्रमण झाले. आपण तरुणांना आवाहन केले त्यानंतर शाखांमध्ये तरुणांची संख्या वाढली. मोतीबागेत तेव्हा सैनिकी प्रशिक्षण दिले जाऊ लागल्याचे ते म्हणाले. आकाशवाणीवरदेखील संघाच्या कार्याची दखल सामूहिक देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून घेतली गेली. या गीतांसाठी संघाकडे विचारणा झाली आणि नाना पालकरांची गीते होती. सुधीर फडके यांनी गीते मोतीबागेत येऊ बसवून घेतली व आकाशवाणीवर गायली जाऊ लागली.ज्यावर्षी चीनचे आक्रमण झाले, त्यावेळी दसर्याचे संचलन शहरातील एकत्र शनिवारवाड्यापासून निघे. मात्र, संघ कार्याचा इतका प्रचार लोकप्रिय झाला की, सकाळी संघाचे संचलन झाल्यावर त्यावर्षी नागरिकांनी स्वतःहून चीनचा निषेध म्हणून संचलन केले आणि त्यात संघाला बोलावले हे देखील त्यांनी सांगितले.
हिंदुस्तान साहित्य आणि दुग्धालयाबाबत बोलताना श्रीधरपंत फडके म्हणाले की, बापूराव दाते यांच्या ‘हिंदुस्तान साहित्य’ ही प्रकाशन संस्था मोतीबागेत सुरू झाली. त्यांनी येथे काढलेले गुरूजींचे चित्र आपल्या कार्यालयात लावले होते. आज ते चित्र आपण गोळविलेला पाठविले असल्याचे फडके यांनी नमूद केले. नाना पालकरांना गुरूजींनी डॉ.चे चरित्र लिहायला सांगितले होते, त्याची पहिली आवृत्ती ही ‘हिंदुस्तान साहित्या’ने प्रकाशित केली असेही ते म्हणाले.आजही मोतीबागेतील प्रकाशित पहिल्या आवृत्तीची प्रत आपल्याजवळ असल्याचे श्रीधरपंत म्हणाले.नाना पालकरांच्या ‘इस्रायलवर छळाकडून बळाकडे’ या पुस्तकाबद्दलही आठवण सांगितली. हे पुस्तक ‘हिंदुस्तान साहित्य’ ने प्रसिद्ध केले. नाना पालकर ज्या ज्या वेळी यायचे ते बापूराव दाते यांना भेटल्याशिवाय जात नसत. त्यांची मैत्री अतूट होती, असेही ते म्हणाले.
याशिवाय या वास्तूत चैतन्य निर्माण करणार्या बाबा सरदेशपांडे, आबा अभ्यंकर, बाळासाहेब वझे, प्रभाकर भट यांच्या सेवाकार्याची महती सांगून त्यांनी येथे त्याकाळात कार्यरत असलेल्या कोकणातील, बुधाजी, राम, दाजी यांच्या योगदानवर देखील प्रकाश टाकला.बाबा सरदेशपांडे हे तर आयुष्यभर चंदनाच्या खोडासारखे मोतीबाग येथे सेवाकार्यासाठी झिजत होते, असे फडके म्हणाले.मोतीबागेत आलेला पहिला दुरध्वनी चा क्रमांक 470840 असा तो लक्षात राहण्याचे कारण सांगताना त्यांनी शास्त्री यांच्या खास कानडी शैलीचा उल्लेख केला.संघाच्या वास्तूत जे गरजेनुसार बदल होत गेले असे श्रीधरपंत फडके म्हणाले, 1962 मध्ये पहिलं बांधकाम झाले, त्यानंतर वास्तुशांत झाली, विभाग प्रचारक दादा गवंडी हे पती पत्नी या पूजेला बसल्याची आठवण त्यांनी सांगितली.
1975च्या आणीबाणीपूर्वीची आणि नंतर सघकार्य कसे झाले यावर बोलताना श्रीधरपंत फडके म्हणाले की, संघाच्या दृष्टीने आणि देशाच्या दृष्टीने आणीबाणीचे पर्व अतिशय महत्त्वाचे ठरले. संघावरील बंदीच्या काळातील तेव्हा कोणालाही माहीत नसलेल्या अनिल गाडगीळांच्या नव्या घरी झालेली बैठक, भानुदास केराळ यांनी. त्यावेळी महानगर प्रचारक असलेल्या तात्या बापट यांची मोतीबागेतून आणलेली सुटकेस, मोतीबाग सील झाल्यावर तेथे काय उद्योग चालत होते हे पाहण्यासाठी पाठविलेले संघ कार्यकर्ते आणि त्यांनी दिलेली माहिती अशा उत्कंठावर्धक आठवणी सांगितल्या. काही कार्यकर्ते पोलिसांशी गोड बोलून आम्हाला भीमरूपी महारुद्रा म्हणायचे आहे, असे सांगून त्यावेळी मोतीबागेत जाऊन आले, तेव्हा तेथे अस्व्च्छता आणि सिगारेटचे थुटकं पडली होती, अनेक जण पत्ते कुटत बसलेले त्यांना दिल्याचे फडके यांनी सांगितले
आणीबाणी संपल्यानंतर संघावरील बंदी उठली, कार्यकर्त्यांना सोडण्यात आले होते. ज्यावेळी बाळासाहेब देवरसांना अटक करण्यात आली होती, तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली होती की, “थांबा, प्रतीक्षा करा आम्ही विजयी होऊन बाहेर येऊ” आणि बाळासाहेब बाहेर आल्यानंतर त्यांनी सांगितले की, संघावरील पहिली बंदी वाईट अवस्थेत संपली आणि दुसरी बंदी संघासाठी चांगली ठरली. इंदिरा गांधी यांच्या पराभवानंतर हे सिद्ध झाले होते. संघाकडे लोकांचा कल वाढला होता आणि मग मोतीबागेचे महत्त्व चकाकत राहिले ते आजतागायत आणि भविष्यात देखील, असे श्रीधर फडके यांनी आवर्जून नमूद केले.
ज्येष्ठ स्वयंसेवक श्रीधरपंत फडके यांनी सांगितलेल्या आठवणींचे शब्दांकन
(शब्दांकन : अतुल तांदळीकर)