संगीत ते समाधी

    22-Nov-2023
Total Views |
Article on Music Helps in Mental Health
 
आयुर्वेदाचा आधार लेखक सुश्रुत वनस्पतींची भाषा समजू शकत होता आणि त्यामुळे त्याला वनस्पतींचे गुण आपोआप समजत असत. म्हणूनच त्याचे नाव ‘सुश्रुत’ असे सार्थ ठेवण्यात आले.

‘तत्प्रविभाग संयमात् सर्वभूतरुत ज्ञानम्’ ॥ १७ ॥
‘प्रवृत्यालोकन्यासात् सूक्ष्मव्यवहितविप्रकृष्ट ज्ञानम्’॥२५॥ विभूतिपाद॥
या सूत्रात पातंजलींनी अन्य जीव आणि वस्तूंशी एकरुप होण्याची अभ्यासशक्ती वर्णन केली आहे. सुश्रुताला वनस्पतींची भाषा कळत असे. म्हणजे वनस्पती बोलू शकत होत्या, असा त्याचा अर्थ नव्हे, तर सुश्रुताने आपल्या चित्ताचा वरीलप्रमाणे वनस्पतीवर संयम केल्यास त्यांचे हृद्गत सुश्रुताला आपोआप कळत असे. यालाच ‘ज्ञानाची अवस्था’ म्हणतात. आजही असा संयम साधल्यास साधकाला वनस्पतींचे गुणधर्म आपोआप कळतील. आयुर्वेदाच्या पद्धतीने वैद्यकी करणार्‍यांना स्वरोदयज्ञान आणि नाडीज्ञान अतिशय आवश्यक असते. चित्रकला आणि मूर्तीकला यांनाही शरीर रचनाशास्त्र व त्याला धरून असलेल्या स्वभावशास्त्राचा अभ्यास आवश्यक होता, त्यामुळेच त्यांना स्वभावागणिक इंद्रिय रचना आणि इंद्रियरचनेवरून परंपरेने स्वभाव वैशिष्ट्ये ज्ञात असत. स्वभाव वैशिष्ट्ये सहजगत्या गम्य होण्याकरिता कलावंतांनाही स्वरोदय शास्त्राची अतिशय आवश्यकता असते.

या शास्त्रात सहजगत्या नैपुण्य प्राप्त करण्यास आजही असल्या कलावंतांना स्वरोदय शास्त्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे. स्वरोदय शास्त्राचा मूलप्रणेता म्हणजे आदिनाथ शिवशंकर होत. शिवशंकर योगाचे मूल प्रवर्तक मानले जातात. संगीतशास्त्र आणि संगीतकला याचेही मूळ प्रवर्तक भगवान शिवशंकरच आहेत. संगीत साधनेत राग-रागिण्यांचे स्वरुप दिसणे आणि रागानुरुप अवकाशात तयार करणे, हे एक अपरिहार्य कार्य असल्यामुळे शरीरचना आणि तद्नुसार अविर्भावित होणार्‍या देवदेवता, राग-रागिण्या यांच्या शरीररचनेचा अर्थ समजण्याइतपत साधकाचे योग ज्ञान वाढणे अत्यावश्यक असते. या दृष्टीने भारतीय चित्रे, मूर्ती व वास्तुकला यांचे सूक्ष्म निरीक्षण करण्यासारखे आहे. भारतीय जीवनात देव-देवतांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. सर्व देव-देवता शक्ती उपासनेची समान केंद्रे जरी असली तरी त्यांच्या गुणधर्मानुसार देव-देवतांच्या शरीर अवयवांची रचना भिन्न-भिन्न दाखविली आहे. त्या भारतीय चित्रकारांच्या केवळ कल्पना नसून त्यात शरीर स्वभावशास्त्रांचे एक महान सत्य दडले आहे.
 
योग शरीर

पृथ्वी तत्वापासून आकाश तत्वापर्यंतच्या अनेक देवदेवता वैदिक परंपरेत मानल्या आहेत. त्या तशा खरोखरीच आहेत की, मानवी मनाचा तो एक अविष्कार आहे, हा स्वतंत्र विषय असून त्याचा उहापोह लेखकाच्या ‘वैदिक परंपरा आणि साधना’ या लेखात केला आहे. कोणत्या देवतेचे डोक्यापासून ते पावलापर्यंतच सर्व अवयव कसे काढावे हे एक मानवशरीर आणि त्याला धरून असलेल्या मनोविज्ञान आणि जीवविज्ञान शास्त्रांना सुसंगत असे स्वतंत्र शास्त्रच आहे. त्या शास्त्राला धरूनच देव-देवतांचे शरीरावयव आकारले जात असत. गणपतीच्या शरीरावयवाची रचना त्याच तेजस् तत्वातील देवी आणि रुद्र यासारख्या देवतांपेक्षा भिन्न आहे. तेजस तत्वातील देवतांचे डोळे साधारणतः तिर्यक असतात. वायुतत्वातील देवतांचे जबडे आणि दात अतिशय मजबूत असून ते आजानुबाहू असतात. वायुतत्वातील देवतांचा वर्ण धुम्र, तर तेजस तत्वातील देवतांचा वर्ण अग्निशिखेप्रमाणे शेंदरी असतो. आपतत्वातील देवता शुभ्र वर्णाच्या तर आकाश तत्वातील देवता नीलश्याम वर्णाच्या असून अतिशय सुस्वरुप असतात. सर्व विश्वाचे लावण्य जणूकाही त्यांच्यावरून ओवाळून टाकावे इतक्या आकाश तत्वाच्या भगवान श्रीविष्णू, भगवान रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण या देवता स्वरुपसुंदर असतात.

ते आजानुबाहु असून त्यांच्या शरीराचे सर्व अवयव अतिशय रेखीव, प्रमाणबद्ध आणि कोमल असतात. कपाळ, भुवया, नेत्र, नासिका, गाल, हनुवटी, मान, स्कंध, हात, हातांची बोटे, पोट, पाठ, कटी, प्रकोष्ठ, पावले, पायांची बोटे, पावलांचा उकिडवेपणा इत्यादी सर्व बाबतीत भिन्न-भिन्न तत्वानुसार देवतांच्या शरीर अवयवात बरीच भिन्नता दिसेल. हे सर्व का? याचे ज्ञान असल्याशिवाय भारतीय परंपरेचा चित्रकार, शिल्पकार आपापल्या कलेला हातच लावू शकत नसे. हे सर्व ज्ञान होण्याकरिता कलावंतांना योगमार्गाच्या नाडीज्ञान आणि स्वरज्ञानासारख्या प्राथमिक अवस्थांचे अनुभव असणे अत्यावश्यक होते. भविष्य सांगणार्‍या ज्योतिषाला तर दुसर्‍याच्या आणि स्वतःच्या श्वासातील वर्ण केव्हाही ओळखता येण्याइतके स्वरोदयशास्त्राचे आणि प्राणायामाचे ज्ञान असावे लागते. हे सर्व ज्ञान असल्याशिवाय त्यांचे ज्योतिष खरेच ठरू शकत नाही. वैद्यांना तोच नियम लागू आहे. आज भारतीय परंपरेतील वैद्य आणि ज्योतिषी त्यांचे उद्योग करतात, पण त्यापैकी काहींना वरीलप्रमाणे स्वरोदय शास्त्र आणि प्राणायामाचे ज्ञान आहे, हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे भारतीय परंपरेतील वैद्यकीय आणि ज्योतिषज्ञान खोटे किवा पांगळे ठरू पाहत आहे. भारतीय संगीत या परंपरेला अपवाद नाही.

अंतराळशास्त्रात तर प्राचीन भारतीयांची प्रगती आश्चर्यकारक होती. चंद्रावर जाण्याकरिता याने तयार करण्यात आली होती. शिस्तबद्ध जीवन जगणारे अंतराळयात्री वजनरहित, वायूरहित, कर्षणरहित अवस्थेत राहण्यासाठी सतत संस्काराने आणि प्रशिक्षणाने तयार करण्यात आले. पण, सर्वात मोठी अडचण निराळीच होती. अवकाशातील काही ग्रह व्यक्त (+पॉझिटिव्ह) तर काही अव्यक्त (-निगेटिव्ह)आहेत. व्यक्त ग्रह दिसतात किंवा उपकरणात त्यांचा ठावठिकाणा लागतो, पण अव्यक्त ग्रह दुर्बिणीतून दिसत नाहीत किंवा त्यांचा मागमूस पृथ्वीवरील उपकरणात लागत नाही. त्यामुळे अवकाशातील अंतराळयानांचा प्रवासमार्ग निश्चित करताना मोठीच अडचण उत्पन्न होत असे. असल्या अव्यक्त ग्रहांकडे दुर्लक्ष करुन अंतराळातील मार्ग निश्चित केल्यास यानाची असल्या एखाद्या अव्यक्त ग्रहाशी टक्कर होऊन अंतराळयान सकट सार्‍याच अंतराळयात्रींच्या ठिकर्‍या उडण्याचा धोका होता. मग करायचे कसे? प्राचीन भारतीय खगोलशास्त्र त्यांच्या मदतीला धावून आले.

प्राचीन भारतीय खगोलशास्त्रात असल्या व्यक्त आणि अव्यक्त ग्रहांच्या कक्षा आणि कालगतिक प्रमाणांची स्थळे तिथी-वार लिहून ठेवली होती. जे अद्ययावत यंत्रउपकरणांना जमले नाही, ते प्राचीन भारतीयांना कसे जमले? कशामुळे आपल्या अव्यक्त ग्रहाचे ज्ञान झाले? योगशास्त्राच्या अभ्यासामुळे! भगवान पातंञ्जलींनी लिहून ठेवले आहे ’भुवनज्ञानं सूर्ये संयमातं॥२६ विभूतिपाद॥ सूर्यावर संयम केल्याने बसल्या जागी सर्व भुवनाचे ज्ञान होऊ शकते. प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञ योगमार्गाच्या असल्याच संयमामुळे अव्यक्त ग्रहांच्या गती व स्थाने ज्ञात करु शकले. भृगु ऋषी आकाशाकडे पाहून आपल्या शिष्यांना असंख्य कुंडल्या तोंडपाठ असल्यागत सांगत असत. हे सर्व ज्ञान त्यांना योगशास्त्रामुळे प्राप्त झाले होते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. भारतीय संगीतशास्त्राचे आदिप्रवर्तक, आदिनाथ भगवान शिव शंकर आहेत. योगशास्त्राचेही आदिप्रवर्तक आदिनाथ भगवान शिव शंकर आहेत. यावरून संगीताचा आणि योगशास्त्राचा संबंध किती घनिष्ठ आहे, याची कल्पना येईल.

योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७