नवी दिल्ली : काँग्रेस सरकारने राजस्थानच्या विकासाला खोडा घालून राज्याला मागे नेण्याचे काम केले आहे. मात्र, आता राजस्थानच्या जनतेने स्वत:ला जादूगार म्हणविणाऱ्यांना छूमंतर करण्याचा निश्चय केला असल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगाविला आहे.
भाजपने राजस्थानमध्ये एक अद्भुत जाहीरनामा जारी केला आहे. राजस्थान हे देशातील आघाडीचे राज्य बनवण्याचा भाजपचा संकल्प आहे. राजस्थानमध्ये भ्रष्टाचारावर जोरदार प्रहार करण्याचा भाजपचा संकल्प आहे. बहिणी-मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा भाजपचा संकल्प आहे. राजस्थान भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. राजस्थानला दिलेली ही आश्वासने नक्कीच पूर्ण होतील, ही मोदींची गॅरंटी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
काँग्रेस पक्षाने राजस्थानच्या विकासात अडथळा आणल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, एकीकडे भारत जगात अग्रेसर होत आहे. दुसरीकडे, राजस्थानमध्ये गेल्या 5 वर्षांत काय घडले हे सर्वांना माहीत आहे. काँग्रेसने राजस्थानला भ्रष्टाचार, दंगली आणि गुन्ह्यांमध्ये आघाडीवर आणले आहे. प्रत्येक नागरिकाच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण करणे ही काँग्रेस सरकारची जबाबदारी होती. मात्र गेल्या ५ वर्षात बहिणी, मुली, दलित आणि वंचितांवर सर्वाधिक गुन्हे आणि अत्याचार झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसला सत्तेतून दूर करणे आता आवश्यक असल्याचे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले आहे.
जेथे काँग्रेस, तेथे अराजक
होळी असो, रामनवमी असो किंवा हनुमान जयंती असो, राजस्थामचे लोक कोणताही सण शांततेत साजरा करू शकत नाहीत. जेथे जेथे काँग्रेस सत्तेत असते, तेथे तेथे थे दहशतवादी, गुन्हेगार आणि दंगलखोरांना मोकळे रान मिळते. नागरिकांचा जीव धोक्यात घालून काँग्रेस लांगुलचालनासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.