मुंबई : अयोध्येच्या धरतीवर श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य पुर्णत्वास येऊ लागले आहे. दि. २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून या दिवशी श्रीरामलला मंदिरात विराजमान होणार आहेत. या ऐतिहासिक दिनी भारतभर उत्सव साजरा करण्याचे आवाहन श्रीराम जन्मभूमी न्यासकडून करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदु परिषद, कोकण प्रांतने ४० लाख घरांपर्यंत संपर्क करण्याचा विशेष संकल्प हाती घेतला आहे. विहिंपचे कोकण प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी याविषयी माहिती दिली. शनिवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी खार जिमखाना येथे आयोजित पत्रकारांच्या दिवाळी मिलन कार्यक्रमात त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान विहिंपचे कोकण प्रांत अध्यक्ष जोग सिंगजी आणि कोकण प्रांत उपाध्यक्ष सुरेश भारवाणी उपस्थित होते.
अयोध्येत २२ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ०१ या वेळेत प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी देशभरातून एकूण सात हजार जणांना आमंत्रित केले आहे. यात महंत(साधूसंत) परिवारातील तीन हजार जणं उपस्थित असतील, तर बाकी विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती असेल. दरम्यान सर्वच रामभक्तांना एकाच दिवशी ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार म्हणून उपस्थित राहता येणार नसल्याने विहिंप कोकण प्रांताकडून दि. ०१ ते १५ जानेवारी या कालावधीत विशेष संपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. आपल्या प्रांतातील ४० लाख घरांशी संपर्क करून त्यांच्यापर्यंत अयोध्येतून आलेल्या पूजीत अक्षता, माहितीचे एक पत्रक आणि श्रीरामाची प्रतिमा यावेळी पोहोचवण्यात येणार आहे. या कार्यासाठी तब्बल ४० हजार कार्यकर्ते मैदानात उतरणार आहेत.
त्याचबरोबर प्रांतातील एकूण ५ लाख ३४ हजार मंदिरांमध्ये २२ जानेवारी रोजी उत्सव साजरा करण्याचे नियोजन विहिंपकडून करण्यात आले आहे. अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपणही यावेळी स्क्रीनिंगच्या माध्यामातून दाखवण्यात येणार आहे. त्याकरीता काही मंदिर प्रशासनास आवाहनही करण्यात आले आहे. साधारण १ लाख १७ हजार ठिकाणी लाईव्ह स्क्रीनिंग होणार असल्याची माहिती विहिंपने दिली आहे. त्यामुळे आपल्या जवळच्या कुठल्याही मंदिरास यादिवशी सकाळी ११ ते ०१ या कालावधीत एकत्र येऊन ऐतिहासिक सोहळ्याचा भाग होण्याचे तसेच संध्याकाळी दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन विहिंपकडून करण्यात आले आहे.
१३ फेब्रुवारीला 'चलो अयोध्या...'
अयोध्येत २२ जानेवारी रोजी श्रीरामलला आपल्या मंदिरात विराजमान होणार आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यादरम्यान केवळ निमंत्रितांनाच परवानगी असल्याने इतर कोणालाही यादिवशी जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे मंदिर न्यासने देशभरातील विविध प्रांतांना एक विशेष तारीख ठरवून दिली आहे. विहिंपच्या कोकण प्रांतासाठी १३ फेब्रुवारी २०२४ ही तारीख दिली असून यादिवशी प्रांतातील रामभक्तांना श्रीरामललाचे अयोध्येत जाऊन दर्शन घेता येणार आहे. साधारण २००० जणांची व्यवस्था करण्यात येणार असून यासंदर्भात सविस्तर माहिती लवकरच देण्यात येईल, असे विहिंपचे कोकण प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी सांगितले.