जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचे कंबरडे मोडल्यामुळे आता राज्यामध्ये पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. तब्बल १.८८ कोटी पर्यटकांनी काश्मीरला २०२२ मध्ये भेट दिल्याची आकडेवारी समोर आली असून, विशेष म्हणजे हा गेल्या ७५ वर्षांतला सर्वात मोठा विक्रम म्हणावा लागेल. त्यानिमित्ताने केंद्र सरकार, सैन्यदलातर्फे जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन विकासासाठी सुरु असलेले प्रयत्न आणि याबाबतीत उपलब्ध असलेल्या अनेकानेक संधी यांचा आढावा घेणारा हा लेख...
बहुतेक देशविदेशातील पर्यटक हे जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर, गुलमर्ग, पहेलगाम आणि लडाखला भेट देण्यास उत्सुक असतात. गुलमर्गमधील ’अॅडव्हेंचर स्पोर्ट्स’ आणि लडाखच्या ’म्युझिकल फेस्टिवल’लाही पर्यटकांनी मोठी दाद दिली आहे. पवित्र अमरनाथ यात्रेमध्ये तर तब्बल चार लाखांहून अधिक पर्यटकांनी अमरनाथला भेट दिली.
काश्मीरमधील तीन विमानतळे - जम्मू, श्रीनगर आणि लेहमध्ये दररोज ९० ते ९५ विमानांची ये-जा होते. काश्मीरच्या डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांवरती पूल आणि डोंगरातून बोगदे निर्माण केल्यामुळे रस्ते वाहतूकदेखील अतिशय उत्कृष्ट दर्जाची आणि वेगवान झालेली दिसते. यामुळे पर्यटनाचा मार्गही अतिशय सुकर झालेला दिसतो. याशिवाय रेल्वेसेवेमध्येही अनेकविध सुधारणा झाल्या आहेत. आता रेल्वेने उधमपूरपर्यंत पोहोचता येते. येत्या डिसेंबरमध्ये काश्मीर खोर्याकरिता चिनाब नदीवर बांधलेला पूल वाहतुकीकरिता खुला केला जाणार आहे. यामुळे दिल्ली ते श्रीनगर हे अंतर रेल्वेने १२ तासांत म्हणजे अत्यंत वेगाने पार करता येईल. यामुळे आगामी काळातही जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनाचे क्षेत्र हे अधिक विस्तारणार आहे, यात शंका नाही.
काश्मीरमध्ये पर्यटन बहरण्याचे मुख्य कारण म्हणजे, राज्यातील मजबूत झालेली सुरक्षा व्यवस्था. काश्मीरच्या ५० ते ६० टक्के लोकसंख्येला पर्यटनामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या फायदा होतो, हे लक्षात घेतले पाहिजे.
‘लाईन ऑफ कंट्रोल’जवळ ’बॉर्डर टुरिझम’
मात्र, जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात पर्यटन वाढवणे अत्यंत आव्हानात्मक होते. कारण, या भागात ’एलओसी’वर सतत पाकिस्तानकडून गोळीबार सुरू असतो. येथे मोठी शस्त्रे म्हणजे तोफखाना वगैरे वापरला जात होता. याशिवाय दहशतवाद्यांची अविरत घुसखोरी या भागात सुरू असल्यामुळे वेळोवेळी इथे दहशतवाद्यांच्या आपल्या सैन्याबरोबर चकमकी चालू असायच्या. त्यामुळे हा भाग अशांत समजला जायचा आणि इकडे पर्यटन शक्य नव्हते. परंतु, आता सुरक्षा व्यवस्था अत्यंत मजबूत झाल्यामुळे आणि या भागांमध्ये रस्ते वाहतूक सुधारल्यामुळे इथेसुद्धा पर्यटन वाढवण्याचा सरकारने निर्णय घेतला. यामध्ये भारतीय सैन्याची मदत आणि भूमिका अत्यंत मोलाची होती.
जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागांमध्ये पूँछ, राजौरी, तंगदार, कुपवाडा, उरी, गुरेज इत्यादी स्थाने अत्यंत सुंदर आणि ऐतिहासिक आहेत. जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागांमध्ये प्राकृतिक सौंदर्य, ऐतिहासिक स्थळे, प्राचीन मंदिरे, पारंपरिक सांस्कृतिक वारसा आणि अन्य सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पाऊलखुणाही सापडतात. त्यामुळे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला या भागात चालना मिळालेली दिसते. भारतीय सैन्याच्या मदतीने ‘लाईन ऑफ कंट्रोल’जवळ उरी, गुरेज, पूँछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये ’बॉर्डर टुरिझम’ विकसित झाले आहे. तिथे अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. याशिवाय युद्धभूमीला भेट देण्यासाठी काही कार्यक्रमदेखील विकसित करण्यात आलेले आहे.
सीमावर्ती भागात भारतीय सैन्य तब्बल २५ हजार कोटी रुपये खर्च करून, ६० हजार किमी एवढ्या लांब ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम सुरु आहे. यामुळे सीमा भागातील १३३ गावांना मोबाईल कम्युनिकेशनची सुविधा उपलब्ध होईल आणि ते देशाच्या इतर भागांशी जोडले जातील. हा कार्यक्रम जरी भारत सरकारचा असला, तरी या कार्यक्रमांमध्ये भारतीय सैन्य ही प्रमुख संस्था आहे. यामुळे या भागात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत. तसेच स्थानिक आणि पर्यटकांना या भागात इंटरनेटची सुविधा मिळत आहे.
सीमावर्ती भागांमध्ये पर्यटन वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजना
सीमावर्ती भागांमध्ये सरकारने पर्यटन सोयीसुविधांना सर्वार्थाने चालना दिली आहे. यामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटन मार्गदर्शक, वाहतूक व्यवस्था इत्यादींचा समावेश होतो. या भागातील पर्यटनस्थळांची माहिती व्यापकपणे पोहोचवण्यासाठी प्रचार आणि प्रसार मोहिमा राबविल्या गेल्या. यासाठी सोशल मीडिया, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर केला. या भागासाठी पर्यटन उत्पादने विकसित केली गेली. यामध्ये साहसी पर्यटन, ग्रामीण पर्यटन, धार्मिक पर्यटन, साहसी पर्यटन इत्यादींचा समावेश आहे.
भारतीय सैन्यामुळे सीमावर्ती भागात पर्यटन कसे वाढले?
सैन्याच्या मदतीने ‘लाईन ऑफ कंट्रोल’जवळ ’बॉर्डर टुरिझम’ विकसित करण्यात आले आहे. त्याअंतर्गत पर्यटकांना लाईन ऑफ कंट्रोल (LOC) जवळील पर्यटन स्थळांना भेट देता येते. याशिवाय युद्धभूमीला भेट देण्यासाठीही काही कार्यक्रम विकसित करण्यात आले आहेत. भारतीय सैन्याने सीमावर्ती भागातील अनेक पर्यटन स्थळांची निर्मिती केली आहे. यामध्ये स्मारक, संग्रहालये आणि इतर सुविधांचा समावेश होतो. यामध्ये संस्कृती आणि इतिहास यांचा समावेश आहे. सैन्य, पर्यटन यांमुळे या भागातील पर्यटनाला चालना मिळाली आहे. या कार्यक्रमांमुळे पर्यटकांना या भागातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांचा अनुभव घेतो.
’होम स्टे’ अजून जास्त लोकप्रिय करण्याकरिता काय करावे?
’होम स्टे’ची गुणवत्ता सुधारण्यासाठी नियमन आवश्यक आहे. या नियमनांमध्ये निवास, अन्न, स्वच्छता इत्यादी बाबींचा समावेश होतो. या भागातील स्थानिकांमध्ये ’होम स्टे’ला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. यामुळे पर्यटकांना स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेता येईल. ’होम स्टे’ मालकांना पर्यटन क्षेत्रातील कौशल्ये शिकवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. तसेच ’होम स्टे’साठी प्रोत्साहन योजना आखल्या जाऊ शकतात. या योजनांमध्ये कर सवलत, अनुदान इत्यादींचा समावेश होऊ शकतो. ’होम स्टे’चे अजून जास्त ऑनलाईन मार्केटिंग करणे आवश्यक आहे. यासाठी सोशल मीडिया, संकेतस्थळ आणि इतर माध्यमांचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे ’होम स्टे’ व्यवसायाला चालना मिळेल.
’होम स्टे’ अजून जास्त लोकप्रिय करण्यासाठी, स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला आणि लोकसंग्रहालये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. स्थानिक खाद्यपदार्थ आणि वस्त्रे, त्यांची विशेषता पर्यटकांना आकर्षित करु शकते. स्थानिक सांस्कृतिक संपत्तीची उत्कृष्टता दाखवून प्रादेशिक विविधतेचे दर्शन पर्यटकांना होऊ शकते. स्थानिक वस्त्र, संगीत आणि विशेष आचार-विचार पर्यटकांसमोर ठेवता येतील. पर्यटकांना चांगली निवार्याची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यासाठी आकर्षक हॉटेल आणि रिसॉर्ट्स विकसित करण्याचाही पर्याय आहे.
सीमावर्ती भागातील पर्यटनवाढीसाठी अजून काय करावे?
या भागामध्ये पर्यटन सुविधांचा अजून विकास करणे आवश्यक आहे. यामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटन मार्गदर्शक, वाहतूक व्यवस्था इत्यादींचा समावेश होतो. या भागातील पर्यटन स्थळांचा प्रचार आणि प्रसार देश भर करणे आवश्यक आहे. यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जाऊ शकतो.
पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे याासठी गरजेचे आहे. यामुळे पर्यटन सुविधांमध्ये सुधारणा होईल आणि पर्यटनाचा विस्तार करणे शक्य होईल. यासाठी पर्यटन व्यवसायाशी संबंधित संस्था आणि संघटनांना प्रोत्साहन दिले पाहिजे. सीमावर्ती भागातील पर्यटनाचे नियोजन करणेदेखील तितकेच महत्त्वाचे. यासाठी पर्यटन धोरण आणि विकास आराखडा तयार केला पाहिजे. या गोष्टींचा विचार केल्यास जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागातील पर्यटनात आणखी वाढ होऊ शकते.
या भागात सैन्यामुळे सुरक्षा व्यवस्था सुधारण्यास हातभार लागला आहे. सैनिकांनी स्थानिक जनतेमध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. एकूणच भारतीय सैन्यामुळे सीमावर्ती भागात पर्यटन वाढले आहे. ’बॉर्डर टुरिझम’मुळे लाखो नोकर्या निर्माण झाल्या. त्याचा लाभही सीमावर्ती भागातल्या आणि इतर दुर्गम भागातल्या जनतेला मिळताना दिसतो. एकेकाळी काश्मीरमधील नैसर्गिक सौंदर्यामुळे भारतीय चित्रपटांचे चित्रीकरण हे काश्मीरमध्ये होत असते. परंतु, वाढत्या दहशतवादी आणि फुटीरतावादी घटनांमुळे त्यात काहीसा खंड पडला होता. आता तिथे पुन्हा चित्रीकरणाने वेग धरला आहे आणि आतापर्यंत ४०० वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसला, काश्मीरमध्ये चित्रीकरणाकरिता परवानगी मिळालेली आहे. सततच्या प्रयत्नांमुळे काश्मीरमध्ये २०२३ मध्ये येणार्या पर्यटकांची संख्या दोन कोटी, ५० लाखांहून जास्त होण्याची शक्यता आहे.थोडक्यात, काश्मीरची पुन्हा सर्वार्थाने नंदनवन होण्याकडे वाटचाल सुरू झालेली आहे आणि या वाटचालीमध्ये भारतीय सैन्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती आणि येणार्या काळातदेखील ती तशीच राहणार आहे.
(नि.) ब्रि. हेमंत महाजन