बँकेची एक चूक आणि ग्राहकांच्या खात्यात आले कोट्यावधी रुपये!

    17-Nov-2023
Total Views |
 banks
 
मुंबई : युको बँकेच्या एका चुकीमुळे तात्काळ पेमेंट सेवेच्या माध्यमातून काही बँक खात्यांमध्ये ८२० कोटी रुपये जमा झाले. बँकेला आपली चूक लक्षात येताच त्यांनी पैसे वसूलीची प्रक्रिया सुरू केली. आतापर्यंत बँकेने ६४९ कोटी रुपये वसूल केले आहेत. ही रक्कम एकूण रक्कमेच्या ७९ टक्के आहे. अद्याप २१ टक्के रक्कम वसूल होणे बाकी आहे.
 
बँकेने अद्याप स्पष्ट केलेले नाही की एवढी मोठी रक्कम अचानक खात्यात कशी हस्तांतरित झाली, ती मानवी चुकांमुळे होती की तांत्रिक बिघाडामुळे की हॅकिंगमुळे? बँकेचे म्हणणे आहे की हस्तांतरित केलेल्या रकमेपैकी रक्कम म्हणजे ६४९ कोटी रुपये परत आले आहेत.
 
मात्र, अद्यापही सुमारे २०० कोटी रुपये वसूल न झाल्याने ते परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेचा परिणाम युको बँकेच्या शेअरवर देखील झाला. गुरुवारी युको बँकेचा शेअर १.१ टक्क्यांनी घसरून ३९.३९ रुपयांवर आला. बँकेने या घटनेची माहिती तपास यंत्रणांना दिली आहे.
 
बँकेने म्हटले आहे की, १० नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत त्यांच्या तात्काळ पेमेंट सेवेमध्ये अंतर्गत अडथळा निर्माण झाला होता, त्यानंतर बँकेने ऑनलाइन पेमेंट सेवा बंद केली. बँकेने बीएसईला या घटनेची माहिती दिली आहे आणि सांगितले आहे की, सावधगिरीचा उपाय म्हणून, बँकेने चुकून पैसे ट्रान्सफर करण्यात आलेली खाती ब्लॉक केली आहेत. रिझर्व्ह बँकही आपल्या स्तरावर या त्रुटीच्या कारणाचा तपास करत आहे.