भाजपने रामभक्तांना अयोध्यावारीच्या दिलेल्या आश्वासनावरुन ठाकरे बंधूंना पोटशूळ उठणे म्हणा साहजिकच. या अयोध्यावारीचा राजकीय लाभ भाजपला होईल, हीच ठाकरेंची खरी पोटदुखी. पण, स्वत:ला सच्चे हिंदुत्ववादी म्हणविणार्या ठाकरे बंधूंनीही राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून, रामभक्तांच्या अयोध्यावारीसाठी पुढाकार घेतला, तर रामभक्तांचे आशीर्वाद त्यांनाही लाभतीलच!
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी श्रीराम भक्तांसाठी अयोध्यावारी आयोजित करण्याचे आश्वासन दिले, म्हणून उबाठा गटाचे उद्धव ठाकरे यांचे पोट दुखू लागले, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही भाजप श्रीराम भक्तांना अयोध्येला का नेत आहे, असा प्रश्न पडला. त्यापैकी राज ठाकरेंबद्दल पहिल्यांदा बोलूयात. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास धरल्यानंतर अयोध्येला जाण्याचा संकल्प सोडला होता. मात्र, तेथे त्यांच्या अयोध्या भेटीला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. स्वाभाविकच होते ते. मनसेने स्थापनेवेळी उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेत, त्यांच्या महाराष्ट्रावरील वास्तव्यावर निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला होता.
म्हणूनच राज यांना उत्तर प्रदेशात विरोध होणारच होता. उद्धव ठाकरे यांनी मात्र अमित शाहंच्या अयोध्यावारीच्या आश्वासनाची थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार, असे म्हटले. अयोध्या हे एक तीर्थक्षेत्र. श्रीराम भक्त अयोध्येत जाणार आहेत, भाजप त्यासाठीची व्यवस्था करत आहे. मग उद्धव ठाकरे यांची पोटदुखी ती काय? अयोध्येत श्रीराम मंदिर उभे राहिले आहे, ते केवळ आणि केवळ भाजपमुळे. प्रभू श्रीरामांचे भव्यदिव्य मंदिर उभारण्याची घोषणा भाजपनेच केली होती, त्यासाठीचे आंदोलन उभे केले तेही भाजपने. रामभक्तांना दिलेले आश्वासन पूर्ण करत सत्तेवर येताच, श्रीराम मंदिराची उभारणी केली, तीही भाजपने.
भाजपने ‘मंदिर वही बनायेंगे’ हा नारा दिला आणि तो प्रत्यक्षातही आणला. म्हणूनच २०२४ मध्ये होणार्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ‘श्रीराम मंदिर’ हा भाजपच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा राहील, यात कोणतीही शंका नाही. पंतप्रधान मोदी यांची श्रीराम मंदिराच्या उभारणीतील भूमिका निर्णायक ठरली असून, हे मंदिर केवळ श्रीरामाचे मंदिर म्हणून ओळखले जाणार नाही, तर हिंदूंची अस्मिता आणि भावना यांचे ते प्रतीक ठरणार आहे. म्हणूनच अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे महत्त्व अनन्यसाधारण असेच. भारतात विशेषतः उत्तर भारतातील हिंदी भाषिक राज्यांतील हिंदू मतदारांवर याचा सकारात्मक परिणाम होईलच. भाजपचा तो प्रमुख जनाधारही आहे. त्याचवेळी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पातळीवर नवे संदर्भ प्रस्थापित होऊन दक्षिणेकडील राज्यांतील मतदारांनाही तो आकर्षित करू शकतो.
रामायणानुसार श्रीराम यांचा जन्म अयोध्येत झाला. ज्या ठिकाणी मंदिर उभे राहिले आहे, तेच त्यांचे जन्मस्थान असल्याची जगभरातील हिंदूंची श्रद्धा. तथापि, बाबराने १६व्या शतकात या ठिकाणी वादग्रस्त ढाँचा उभारला. याठिकाणी असलेले मंदिर तोडून, त्याजागी त्याने ढाँचा उभा केला. हिंदूंच्या श्रद्धास्थानावर घाला घालण्याचे मोठे पाप आक्रमणकर्त्या इस्लामी राज्यकर्त्यांनी केले. मात्र, हे कोणीही सांगितले नाही आणि सांगणारही नाही. १९८४ मध्ये विश्व हिंदू परिषदेने श्रीराम मंदिरासाठी आंदोलनाची हाक दिली. १९९०च्या सुरुवातीला त्याला खर्या अर्थाने गती आली. दि. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबराने उभारलेला अनधिकृत ढाँचा उत्स्फूर्त आंदोलनात पाडला गेला. तथापि, हा ढाँचा पाडल्यानंतरच कायदेशीर लढाईला खर्या अर्थाने वेग आला. अनेक दशके ती सुरू होती. नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने विवादास्पद जागेचा ताबा ‘श्रीराम मंदिर ट्रस्ट’कडे सोपवण्याचे आदेश दिले. ऑगस्ट २०२० मध्ये मंदिराचे बांधकाम सुरू झाले आणि आता जानेवारी महिन्यात त्याचे लोकार्पणही होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्तेच मंदिराचे भूमिपूजन झाले होते.
१६व्या शतकात बाबराने श्रीराम जन्मभूमीवर अनधिकृत ढाँचा उभारला. मात्र, हिंदूंना त्यांच्या आराध्यदैवताच्या जन्मस्थानी मंदिर उभे होण्यासाठी २०२४ पर्यंत वाट पाहावी लागली. भाजपने यासाठीची राजकीय इच्छाशक्ती दाखवल्यानेच ते प्रत्यक्षात साकार होत असेल, तर त्याचे संपूर्ण श्रेय घेण्याचा अधिकारही भाजपचाच! २०२४च्या निवडणुकीत भाजपच्या प्रचाराचा केंद्रबिंदू ‘श्रीराम मंदिर’ राहिला, तर म्हणूनच आश्चर्य म्हणूनच वाटणार नाही. धर्मनिरपेक्ष राष्ट्रात बहुसंख्य हिंदूंच्या आस्थेविषयी ममत्व दाखवून हे मंदिर उभे करणे, हे प्रचंड अवघड काम भाजपने प्रत्यक्षात आणून दाखवले. जगभरातील कोट्यवधी हिंदू आता प्रतीक्षा करताहेत, ती जानेवारी महिन्याची. प्रभू श्रीराम त्यांच्या पवित्र नगरीत, अयोध्येत विराजमान होणार आहेत. भव्य आणि देखण्या अशा मंदिराची निर्मिती केली गेली आहे.
उद्धव ठाकरे यांनी तर श्रीराम मंदिराच्या प्रश्नावरून भाजपला कोंडीत पकडण्याचा यापूर्वीही वारंवार प्रयत्न केला होता. ‘मंदिर वहीं बनायेंगे, तारीख नही बतायेंगे,’ अशी कूचेष्टा करणार्या कंपूत नंतर उद्धव ठाकरेही सामील झालेच. मंदिर उभे करण्याची गरज आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. यासाठी श्रीराम भक्त देश-विदेशातून निधी पाठवत असताना, हा निधी खरोखरच मंदिर निर्माणासाठी खर्च केला जात आहे ना, अशी अनाठायी शंका मुद्दाम उपस्थित करणारेही उद्धव ठाकरेच! मुस्लीम मतांसाठी लाचार होत, त्यांच्या दाढ्या कुरवाळणार्या उद्धव यांना काँग्रेसी विचारधारा आता जवळची. ज्या काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मतदानासाठीची बंदी घातली होती, त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार्या उद्धव यांच्याकडून यापेक्षा कमी अपेक्षाच नाही.
उद्धव ठाकरे आणि अन्य विरोधकांचे एकच दुखणे आहे, ते म्हणजे अयोध्येतील मंदिराचे. ते कोणतेही श्रेय घेऊ शकत नाहीत. देशातील सर्व भाजपविरोधकांनी १९८०च्या दशकापासून सातत्याने मंदिरविरोधी भूमिका घेतली होती. भाजप हा एकमेव पक्ष होता, ज्याने यासाठीचा ठराव मांडला, तो प्रत्यक्षात आणला. सत्तेवर आल्यावर मंदिर उभारणी करू, हे भाजपचेच आश्वासन, जे त्यांनी ठरल्याप्रमाणे पूर्ण केले. म्हणूनच उद्धव यांच्यासह अन्य विरोधकांची जळजळ होते आहे. भाजपने जाहीरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे मंदिर बांधून पूर्णत्वास नेले आहे. जानेवारी महिन्यात विधिवत पूजन होऊन, त्याचे लोकार्पणही होईल. जगभरातील हिंदू त्यावेळी पुन्हा एकदा दिवाळी साजरी करणार आहेत. भाजप छातीठोकपणे त्याचे श्रेय घेणार आहे, घेत आहे. कारण, तो त्यांचा हक्कच आहे!