नवी दिल्ली : मानवी तस्करीच्या रॅकेटविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केलेल्या छापेमारीनंतर तस्करांनी गेल्या दोन वर्षांत हजारो रोहिंग्या घुसखोरांना देशातील विविध भागांमध्ये वसविल्याचे उघड झाले आहे.एनआयएने गेल्या आठवड्यात देशातील विविध राज्यांमध्ये आंतरराष्ट्रीय मानव तस्कर आणि त्यांच्या रॅकेटविरोधात कारवाई केली होती. या कारवाईमध्ये १० राज्यांतून मानवी तस्करी रॅकेटमधील ४४ जणांना अटक केली होती. अटक केलेल्यांची चौकशी सध्या सुरू असून त्यातून धक्कादायक माहिती बाहेर येत आहे.
भारत-बांगलादेश सीमेवर तैनात असलेल्या सुरक्षा यंत्रणांना चकमा देऊन मानवी तस्करांनी हजारो रोहिंग्या मुस्लिमांना केवळ सीमा ओलांडण्यास भाग पाडले नाही तर मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्यांना देशातील दहा वेगवेगळ्या राज्यात स्थायिक केले. ज्यांच्याकडे पैसा आहे अशा बांगलादेशातील रोहिंग्यांवरच तस्करांचे लक्ष असते. या संदर्भात, इंटरपोलने देशातील मोठ्या प्रमाणावर अवैध स्थलांतरितांचा बंदोबस्त करण्यासाठी मानवी तस्करांच्या कारवायांशी संबंधित सुरक्षा यंत्रणांना माहितीदेखील सामायिक केले होते.
तस्करांनी अनेक रोहिंग्यांना बनावट आधार, पॅन आणि मतदार ओळखपत्रही मिळवून दिल्याचे उघड झाले आहे. मृत किंवा बेपत्ता असलेल्या हजारो लोकांची ओळख चोरून त्यांनी आधार अद्यतनीकरणाच्या नावाखाली रोहिंग्यांची माहिती भरण्यात आली आहे. जेणेकरून त्यांना भारतीय ओळख मिळू शकेल. एनआयएने 200 हून अधिक आधार आणि पॅन कार्ड जप्त केले आहेत. या आधारे भारतात मालमत्ता खरेदीसाठी मदत करण्यात आली. एनआयए तस्करांची चौकशी करत आहे आणि अशा स्थलांतरितांची माहिती मिळवत आहे, जेणेकरून त्यांना पकडून त्यांच्या देशात परत पाठवता येईल.
भारतातील या राज्यांमध्ये वसले रोहिंग्या घुसखोर
· कर्नाटक - बंगळुरू, मंगलोर, गुलबर्गा, बिदर, धारवाड, रायचूर, चामरापेट, कलबुर्गी
· पश्चिम बंगाल - दिनाजपूर, मालदा, मुर्शिदाबाद, नादिया
· हरियाणा - नूह, मेवात
· राजस्थान - जयपूर, जोधपूर, अलवर
· तेलंगणा - हैदराबाद
· तामिळनाडू – चेन्नई, पुदुच्चेरी
· जम्मू आणि काश्मीर, आसाम, त्रिपुरा