“शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे प्रमुख नेते आहेत आणि त्यांच्या भोवतीच महाराष्ट्राचे राजकारण केंद्रित राहणार आहे,” असे संजय राऊत म्हणाले. म्हणजे मी आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे प्रमुख नेते आहोत, म्हणजे मी राष्ट्रीय नेता नाही? माझ्या भोवती केवळ महाराष्ट्राचे राजकारण फिरणार, भारताचे राजकारण नाही? काही लोक म्हणतात, निवडणुकीत आम्ही दोघे हरणार आहोत. तेव्हा महाराष्ट्राने नाकारलेले नेते म्हणून राजकारण आमच्या भोवती केंद्रित राहील असं संजयला सांगायचे आहे. असो. मी खूप कामात आहे. आता चांगल्या की वाईट हे तुम्हीच ठरवा. राज्यात आरक्षणाचा आखाडा व्यवस्थित सुरू झालाय. त्याला खतपाणी घालयला नको का? चैन पडत नाय राव. लोक कमळवाल्यांवर डोळे बंद करून विश्वास ठेवतायत. अशात संजय असं पण म्हणाला की, नरेंद्र मोदी राहुल गांधींना घाबरतात. नरेंद्र मोदींना थांबवायचे, तर राहुल गांधीच हवेत असं आडून आडून तर त्याला बोलायचं नाही ना? मी तर ‘भावी पंतप्रधान’ आहे. पण, आता संजय मला फक्त ‘महाराष्ट्राचा नेता’ ठरवू पाहतोय. माझे अखिल भारतीय नेतृत्व त्याला दिसत नाही का? देशात कुठेही काही झालं की मी पहिल्यांदा बोलतो. मोदींविरोधात बोलून मोदींची भेटीगाठी घेणार्यांतही मीच पहिला असतो. मी तेल लावलेला पहिलवान आहे. म्हणून भानावर आलो गड्या. मनात गोळाबेरीज केली की हा असं का म्हणाला असेल? महाराष्ट्राच्या राजकारणात काय करायचं, त्यासाठीचं जे काम दिलं याला दिलं होतं ते त्याने फत्ते केलं. मी ५६ जागा जिंकलो. चाणक्य म्हणून पुन्हा लोकांमध्ये आलो. पण, कधी कधी हा असं काही बोलतो की, वाटतं यालाच कुणीतरी आमचंही काम फत्ते करायची सुपारी दिलीबीली की काय? हा असं काहीबाही बोलतो आणि लोक अगदी तयारीनिशी पुराव्यांसकट माझ्याविरोधात बोलायला सुरुवात करतात. नवाब कसा शांत झालाय, नाहीतर पूर्वी त्याला पण हीच उठाठेव करायची सवय होती. हा उबाठा गटाचा शिलेदार काय शांत बसत नाही. काही लोक बोलतात की, माझा रेकॉर्ड संजय मोडेल. मी जशी पक्षाची भाकरी फिरवली होती, तशी त्याने आडून आडून उबाठा गटाची भाकरी फिरवली होती. पण, काय झालं त्याच? कमळवाल्यांनी माझी आणि त्याची पण भाकरी चुलीसकट करपवली ना राव!
नवी खेळी!
‘जय भवानी जय शिवाजी’ म्हणत मतदान करा असं साहेब आवाहन करत आहेत. साहेब इसरले का काय? मी सुषमा, मागं देवी उत्सवाला ‘आय बसली...बाय बसली’ म्हणून जोक वर जोक केले होते मी. आता सायबांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणायला सांगितलं. कसं बोलणार मी? ‘आय बसली’ म्हणत म्हणत मी इथपर्यंत आले. आता लगेच ‘जय भवानी’ कसं बोलू पोरोहो? माझं तर माझं, तो तिकडं माझा रक्ताच नाही, पण अगदी माझा सख्खा भाऊ शोभावा असा संजयभाऊ; त्याला पण माझ्यासारखाच प्रश्न पडला असल. हं पण प्रश्न सत्तेचा असल्यावर आम्ही एक काय हजार वेळा काहीही बोलायला तयार आहोत!आम्ही दोघे भाऊबहीण उबाठा गटाची खिंड लढवतो. माझा भाऊ तुरुंगात असताना त्याच्या तोडीस तोड मी सभेत बोलत होते. तेव्हा मला उबाठा गटाच्या लोकांनी डोक्यावर घेतलं. कारण, माझ्यासारखं खेकसून ओरडून आणि काहीच्या बाही बोलणारी एकपण महिला त्यांच्याकडे नव्हती. मग मीच बाजी मारली. त्यानंतर माझा भाऊ तुरुंगातून सुटून आला. मग मला कोण विचारणार? पडले पुन्हा काहीशी अडगळीत! अगं बया, संजय भावाला विचारायला हवं त्याला काय वाटतं? काय रे भावा, तुला काय वाटतं मतदार ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणतील का? काय म्हणालास? आपण तर मराठी-मुसलमान म्हणून सारखं सारखं बोलत होतो. ते मराठी-मुसलमान आपले मतदार झालेत, ते ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणत मतदान करतील का? आता गं बया मी काय बोलू? ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणणारे आपले मतदार आता भाजप आणि शिंदेकडे गेले. आपल्या साहेबांना बोलताना दहा वेळा विचार करायला हवा होता. संजय भावा, ते बघ कुणीतरी म्हणतय की आपल्या दोघांचेही पालक आदरणीय माननीय जाणता राजा शरद पवार साहेब यांना तरी हे मानवणार आहे का? कारण, ते छत्रपती शिवाजी महाराजांना नाही तर ते स्वत:लाच ‘जाणता राजा’ म्हणवून घेण्यात धन्यता मानतात. बाई बाई, मी तर बारामती साहेबांच्या पुढे जाणार नाही. मला माहिती आहे भावा, तू पण त्यांच्या पुढे जाणार नाहीस. पण मग ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणायला सांगितलं त्याचं काय? काय म्हणाला कोथळा खंजीर म्हंटल्यावर मराठी जनता भूलत नाही म्हणून? महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा भावनिक ‘ब्लॅकमेल’ करण्यासाठी ही नवी खेळी?
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.