मुंबई (विशेष प्रतिनिधी) - रत्नागिरीतील गणपतीपुळ्याच्या समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेल्या ब्लू व्हेलच्या वारसाला ४२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर समुद्रात सोडण्यात आले. ( ganpatipule whale calf ) मंगळवारी दि. १४ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हे बचाव कार्य पार पडले. बचाव कार्य पार पडले असले तरी, या वासराच्या हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. ( ganpatipule whale calf )
सोमवार दि. १३ नोव्हेंबर रोजी गणपतीमुळे येथील 'एमटीडीसी'च्या समोरील किनाऱ्यावर ब्लू व्हेलचे वासरू सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आढळून आले होते. ३० फूट लांब असणारे हे वासरू जीवंत असल्याने 'एमटीडीसी'च्या कर्मचाऱ्यांनी त्याला समुद्रात सोडण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी त्यांना स्थानिक नागरिकांची मदत मिळाली. आजारी असल्यास किंवा आपल्या कपळापासून (पाॅड) विलग झाल्यास डाॅल्फिन, व्हेल, पाॅरपाॅईज सारखे सागरी सस्तन प्राणी किनाऱ्यावर वाहून येतात. त्यांच्या पिल्लांना वासरू म्हणतात. अशाच काही शक्यतेमधून किंवा आईपासून दुरावल्याने हे वासरू गणपतीपुळ्याच्या किनाऱ्यावर वाहून आल्याचा अंदाज आहे. विवान राणे, विशाल राठोड, दिनेश निवातकर, अक्षय केरकर, दत्ताराम तोरसकर, वैभव केळुसकर, गणेश राऊळ, रोशन, क्षितीज, तेजस, आकाश या 'एमटीडीसी'च्या कर्मचाऱ्यांनी या वासराला बोटीच्या मदतीने खेचून समुद्रात सोडल्यानंतर ते पुन्हा किनाऱ्यावर परतले. त्यानंतर जवळपास पुढचे ३५ तास ते किनाऱ्यावर होते.
सोमवारी दिवसभर वन विभाग, एमटीडीसीचे कर्मचारी, पोलीस, गणपतीपुळ्याचे स्थानिक आणि मच्छीमारांनी या पिल्लाला समुद्रात सोडण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना अपयश मिळाले. सरतेशेवटी मंगळवारी वन विभागाकडून पुण्याच्या 'रेस्क्यू' या संस्थेची टीम, भारतीय तटरक्षक दल (कोस्ट गार्ड), मत्स्यव्यवसाय विभाग आणि 'जेएसडब्लू'च्या बोटीची मदत घेण्यात आली. 'रेस्क्यू' टीममधील डाॅ. चेतन वंजारी यांनी व्हेलच्या वासरावर उपचार केले. तर इतर विभागांनी बचाव कार्याची तयारी केली. मंगळवारी रात्री ८.३० वाजता भरतीचे पाणी चढू लागल्यावर बचाव कार्य सुरू झाले. १०.३० वाजण्याच्या सुमारास पाणी चढल्यानंतर पशुवैद्यकांनी स्ट्राईपच्या (पातळ दोरी) मदतीने व्हेलच्या वासराला बांधले. 'जेएसडब्लू'च्या बोटीला हे स्टाईप अडकवण्यात आले. त्यानंतर बोटीच्या मदतीने वासराला खेचून त्याची समुद्रात सुटका करण्यात आली. हे बचावकार्य रत्नागिरी वन विभाग, रेस्क्यू पुणे, एमटीडीसी, जेएसडब्लू, कोस्ट गार्ड, रत्नागिरी पोलीस, मत्स्यव्यवसाय विभाग, कांदळवन प्रतिष्ठान आणि गणपतीपुळ्याचे स्थानिक यांनी पूर्ण केले.
व्हेलच्या वासराला समुद्रात सोडण्यात आले असले तरी, त्याचा भविष्याबाबत सागरी जीवशास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. व्हेलवर अभ्यास करणारे सागरी जीवशास्त्रज्ञ मिहीर सुळे यांनी सांगितले की, "ज्यावेळी व्हेलसारखे वजनदार सागरी सस्तन प्राणी किनाऱ्यावर वाहून येतात, तेव्हा जमिनीला त्यांचे शरीर लागल्यामुळे त्यांचे भरभक्कम वजन हे त्यांच्या अंतर्गत अवयवांवर पडते. परिणामी अंतर्गत अवयवांना इजा होण्यास सुरुवात होते. गणपतीपुळ्याच्या किनाऱ्यावर वाहून आलेले व्हेलचे वासरु हे वयाने लहान असून ते आईच्या दुधावर निर्भर असल्यासारखे वाटते. त्यामुळे जरी या वासराला समुद्रात सोडण्यात आले असले तरी, त्याचे निरीक्षण करणे आणि पुढील आठवडाभर हे वासरू आसपासच्या समुद्र किनाऱ्यावर पुन्हा वाहून न आल्याची शहानिशा करणे गरजेचे आहे."
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.