‘व्हेल’च्या वासराने दिलेला धडा

    15-Nov-2023   
Total Views |
Article on Whales Rescue work
 
गणपतीपुळ्यातील व्हेल बचाव कार्यामुळे ‘महाराष्ट्र वन विभाग’ हवा तसा सागरी सस्तन प्राण्यांच्या बचावकार्यामध्ये सक्षम नसल्याचे समोर आले. या बचावाकार्यातील उणिवा हेरून प्रशासनाने यापुढे काम केल्यास, अनेक सागरी सस्तन प्राण्यांचे जीव आपण वाचवू शकतो. त्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
 
महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रात आढळणार्‍या समुद्री सस्तन प्राण्यांविषयी आजही अचंबा व्यक्त करण्यात येतो. मुंबईच्या समुद्रात डॉल्फिन दिसणे वा एखादा व्हेल समुद्र किनार्‍यावर वाहून आल्याच्या घटनांकडे कुतूहलाच्या चश्म्यामधून पाहिले जाते. या घटना अतिशय विलक्षण असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये असते. याला कारण आहे, राज्यात सागरी सस्तन प्राण्यांविषयी झालेला फार थोडका अभ्यास आणि त्यांच्याविषयीच्या जनजागृतीचा अभाव. हा अभाव ज्याप्रमाणे सामान्य नागरिकांमध्ये आहे, तसाच तो या प्राण्यांसबंधी काम करणार्‍या वन विभाग आणि मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचार्‍यांमध्ये देखील आहे. डॉल्फिन, व्हेल आणि पॉरपॉईजसारखे जीव हे जरी पाण्यात राहत असले, तरी ते मासे नव्हते. हे जीव माणसांप्रमाणेच सस्तन प्राणी आहेत, ही बाब बर्‍याच सामान्य नागरिकांना आणि प्रशासनातील कर्मचार्‍यांना अवगत नाही. या सर्व बाबींचा उहापोह करण्याची वेळ आली आहे ती-रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळेच्या किनार्‍यावर वाहून आलेल्या ’ब्लू व्हेल’च्या वासरामुळे.

महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रात व्हेलच्या तीन प्रजाती सर्वसामान्यपणे आढळतात. ’ब्लू व्हेल’, ’ब्युड्रीज व्हेल’ आणि ’हॅम्पबॅक व्हेल’. समुद्रातील सस्तन प्राण्यांना इंग्रजीत ’सीटेशियन्स’ म्हणतात. समुद्री सस्तन प्राण्यांना माशांप्रमाणे कल्ले नसून त्यांना फुफ्फुस असतात. त्यामुळे ते पाण्यातून नाही; तर हवेतून श्वास घेतात. यासाठी त्यांना डोक्याच्यावर श्वसनछिद्रे किंवा नाकपुड्या असतात. पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन श्वसनछिद्र उघडून ते मोठा श्वास घेतात आणि पुन्हा पाण्याखाली जातात. त्यांच्या पिल्लांना ’वासरू’ म्हणतात. आईच्या दूधावर ही वासरे जन्मल्यानंतर काही काळ जगतात. ’बलीन व्हेल्स’ हे सर्वात मोठे सस्तन प्राणी आहेत. यांमध्ये ’ब्लू व्हेल’ या पृथ्वीवरच्या सर्वात मोठ्या प्राण्याची गणना होते. हे ३० मीटरपेक्षा (१०० फूट) अधिक लांब असतात. २०१५ साली सिंधुदुर्गातील कुणकेश्वर येथे किनार्‍यापासून अडीच किलोमीटर अंतरावर समुद्रात ’ब्लू व्हेल’ची मादी आपल्या वासरासोबत पोहत असल्याची नोंद ’कोकण सीटेशियन्स रिसर्च टीम’च्या संशोधकांनी केली होती. त्यावेळी महाराष्ट्रात ’ब्लू व्हेल’ची नोंद जवळपास १०० वर्षांनी करण्यात आली होती. ’बलीन व्हेल्स’ हे सामान्यतः एकलकोंडे असतात. केवळ अन्नाच्या शोधात आणि प्रजोत्पादनाच्या प्रदेशात ते मोठ्या संख्येने एकत्र येतात.

गणपतीपुळ्याच्या किनार्‍यावर सोमवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी वाहून आलेल्या ’ब्लू व्हेल’च्या वासराचे बचावकार्य दोन दिवस चालले. बोटीच्या मदतीने खेचून या वासराला मंगळवारी रात्री समुद्रात तर सोडण्यात आले. मात्र, बुधवारी सायंकाळी हे पिल्लू मृतावस्थेत पुन्हा गणपतीपुळ्याच्या किनार्‍यावर वाहून आले. ४२ तास हे बचावकार्य सुरू होते. मात्र, नियोजनबद्धरित्या हे बचावकार्य पार पाडले असते; तर ते चार तासांमध्ये संपण्यासारखे होते. ज्यावेळी व्हेलसारखे अवाढव्य सागरी सस्तन प्राणी समुद्र किनार्‍यावर जीवंत वाहून येतात, तेव्हा त्यांच्या शरीरातंर्गत असलेल्या अवयवांना इजा पोहोचण्यास सुरुवात होते. पाण्यामध्ये व्हेलचे शरीर हे एकाप्रकारे तरंगत असते. ज्यावेळी ते जमिनीला टेकते, तेव्हा व्हेलच्या शरीराचा कित्येक टन असलेला वजनाचा दाब अवयवांवर पडतो. परिणामी अवयवांना इजा पोहोचण्यास सुरुवात होते.

फुफ्फुसे एकमेकांना चिकटले जाऊन, त्याद्वारे श्वास घेण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. अशावेळी तातडीने बचावकार्य केल्यास व्हेल जीवंत राहू शकतो. अशाच प्रकारचे बचाव कार्य २०१६ साली दापोली तालुक्यातील कोळथळे किनार्‍यावर पार पडले होते. यावेळी उथळ पाण्यात अडकलेल्या ४० फुटांच्या ’ब्लू व्हेल’ला बोटीच्या मदतीने खेचून वनकर्मचारी आणि ’कांदळवन प्रतिष्ठाना’च्या तज्ज्ञांनी सुखरूपरित्या समुद्रात सोडले होते. गणपतीपुळ्याचे हे बचावकार्य कौतुकास्पद असले तरी, ते बराच काळ लांबले. हे वासरू बर्‍याच काळ जमिनीवर राहिल्याने, त्याच्या शरीरातंर्गत अवयवांना इजा पोहोचल्याची शक्यता होती. शिवाय हे वासरू आईच्या दुधावर निर्भर असल्याची शक्यता असल्याने त्याला समुद्रात सोडल्यानंतरही ते किती काळ तग धरू शकेल, याबाबत शाश्वती नव्हती. त्यामुळे जे घडायचे होते, तेच झाले आणि हे वासरू मृतावस्थेत पुन्हा समुद्रकिनार्‍यावर वाहून आले. मात्र, या बचावकार्यामधून आपल्या प्रशासनाला खास करून वन विभागाला समन्वयाच्या पातळीवर अनेक सुधारणा करण्याचे संकेत मिळाले आहेत.

परदेशामध्ये अनेक ठिकाणी व्हेल बचावकार्यामध्ये हवाई दल किंवा नौदलाचे हेलिकॉप्टर वापरण्यात येतात. ताकदीच्या हेलिकॉप्टरद्वारे या अवाढव्य जीवांना उचलून, त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात येते. गणपतीपुळ्याच्या बचावकार्यातही नौदलाचा पर्याय रत्नागिरी वन विभागासमोर ठेवण्यात आला होता. नौदलदेखील या बचावकार्यासाठी सकारात्मक होते. मात्र, रत्नागिरी विभागीय वनधिकार्‍यांकडून नौदलासोबत कोणत्याही प्रकारे समन्वय साधण्यात आला नाही. परिणामी, नौदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे जे काम अवघ्या दोन ते तीन तासांमध्ये पार पडले असते, त्या कामाला विलंब झाला.

व्हेलसारख्या जीवांच्या बचावकार्यामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय असणे अपेक्षित असते. त्यामुळे भविष्यात वन विभागाने अशा स्वरुपाच्या बचावकार्यांना लक्षात घेत नौदल, तटरक्षक दल आणि हवाई दल यांसारख्या संस्थांबरोबर सामंजस्य करार करणे गरजेचे आहे. याशिवाय मंगळवारी सकाळी भरती असतानादेखील वन विभागाचे स्थानिक वनकर्मचारी या वासराला खेचून घेऊन जाण्यासाठी बोटींचे नियोजन करू शकले नाही. उलटपक्षी माध्यमांशी संवाद साधण्यात, त्यांनी वेळ वाया घालवला. परिणामी, सकाळी बचाव कार्य पार पडले नाही. ’कांदळवन कक्षा’च्या ’कांदळवन प्रतिष्ठाना’तील तज्ज्ञांचे कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन या बचावकार्यात मिळाले नाही. व्हेलसारख्या सागरी सस्तन प्राण्यांच्या बचावकार्यासाठी ’केंद्रीय वने आणि वातावरणीय बदल विभागा’ने तयार केलेल्या ’प्रमाणभूत कार्यपद्धती’ची (एसओपीचे) अंमलबजावणी झाली नाही.

एकंदरीत व्हेलसारख्या अजस्त्र जीवाचे बचावकार्य करणे अवघड असले तरी योग्य आणि वेळेत केलेल्या समन्वयामधून ते सहजरित्या करण्याजोगे आहे. त्यामुळे गणपतीपुळ्याच्या बचावकार्यामधून धडा घेऊन भविष्यात ’महाराष्ट्र वन विभाग’ आणि ’कांदळवन कक्षा’ने आतापासून वेगवेगळ्या विभागांशी सामंजस्य करार करणे, अशा स्वरुपाच्या बचाव कार्यांसाठी आवश्यक असणार्‍या सामुग्रीची बांधणी करणे, वनकर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या क्षमता बांधणीचे कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.