नवी दिल्ली : केरळच्या डाव्या आघाडीच्या सरकारची उधळपट्टी आणि चैन यामुळेच राज्यावर आर्थिक संकट आले आहे, असा टोला केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी लगाविला आहे. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधर यांनी केरळमधील पिनरायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीच्या सरकारवर टीका केली. ते म्हणाले, केरळ राज्यावर आलेल्या आर्थिक संकटास केंद्र नव्हे तर राज्य सरकारचा कारभार जबाबदार आहे.
केरळच्या आर्थिक संकटासाठी केंद्र सरकारच्या धोरणांपेक्षा सत्तारूढ डाव्या आघाडी सरकारची चैन आणि उधळपट्टी कारणीभूत आहे. मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी राज्यातील जनतेची दिशाभूल करणे थांबविणे गरजेचे आहे. कारण, मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री हे दरवेळी केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या निधीविषयी वेगवेगळे आकडे सांगत असतात. त्यामुळे सत्तारूढ डाव्. आघाडीने प्रथम आपल्या कारभाराकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दिला आहे.
राज्याचे अर्थमंत्री बालगोपाल यांनी कोल्लम येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, केंद्र आर्थिक बाबतीत राजस्थान आणि छत्तीसगडसह विरोधी शासित राज्यांशी अत्यंत भेदभावपूर्ण वागणूक देत आहे. त्यापैकी केरळला सर्वाधिक भेदभावाचा सामना करावा लागत आहे, असाही आरोप केरळ सरकारतर्फे करण्यात आला होता.