मुंबई : राज्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. या पार्श्वभुमीवर राज्यात कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक ५७ हजार ६८८ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात ४५ हजारापेक्षा जास्त नोंदी सापडल्या आहेत. तर धुळे जिल्ह्यात ३१ हजार ४५३ नोंदी सापडल्या आहेत.
मराठा आरक्षणासाठी जळगाव जिल्ह्यात महसूल, शैक्षणिक, भूमी अभिलेख यासह विविध विभागात ५ लाख ९० हजार २८ नोंदी तपासण्यात आल्या आहेत. त्यात ४५ हजार ७२८ नोंदी कुणबी जातीच्या आढळून आलेल्या आहेत. १९४८ ते १९६७ आणि १९४८ पूर्वीच्या नोंदी अभिलेखावर तपासण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यात २२११ इतक्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. कोल्हापुर जिल्ह्यात ५५६६, हिंगोली ३१३०, रत्नागिरी ६९ कुणबी नोंदी आढळल्या आहेत. या शोध मोहिमेत मोडी अभ्यासकांची मोठी मदत होत आहे. लिप्यांतर सॉफ्टवेअरचा आणि मोडी किरण पुस्तकाची मदत घेतली जात आहे, अशी माहिती मिळाली आहे.