येत्या प्रजासत्ताक दिनी ३५० किल्ल्यांवर तिरंगा व भगवा ध्वज फडकणार

महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०वा राज्याभिषेक दिनी निश्चय

    01-Nov-2023
Total Views |
Maharashtra Climbing Federation Initiative

मुंबई :
श्री शिव छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य म्हणजे आपल्या सर्वांचा अभिमान. २०२३-२४ वर्ष हे हिंदवी स्वराज्याचे ३५०वे वर्ष. या निमित्ताने महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’च्या वतीने महाराष्ट्रातील विविध ३५० गडकिल्ल्यांवर भारतीय तिरंगा व स्वराज्याची भगवी पताका अर्थात भगवा ध्वज फडकविण्याचा तसेच शिवप्रतिमा पूजनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हा उपक्रम २६ जानेवारी २०२४ रोजीच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वार्षिक कार्यकारिणीमध्ये यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्यकारी अध्यक्ष ऋषिकेश यादव व सचिव डॉ. राहुल वारंगे यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.

हा उपक्रम अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या सर्व जिल्हा शाखा, गिर्यारोहण संस्था, शिवप्रेमी संस्था यांच्या माध्यमातून आणि तमाम शिवप्रेमी कार्यकर्ते यांच्या सहभागातून संपन्न होणार आहे. यासाठी किल्ल्यांची वेगवेगळ्या विभागात विभागणी करण्यात आली असून विभाग निहाय ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे. हा उपक्रम महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील, जगाच्या कानाकोपऱ्यातील शिवभक्तांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. यामध्ये महासंघाकडे नाव नोंदणी करून आपल्या जिल्ह्यातील किल्ल्यावर जाऊन या उपक्रमामध्ये सहभागी होता येणार आहे. याची नोंदणी प्रक्रिया, सविस्तर कार्यक्रम व इतर सर्व माहिती सर्वांसाठी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे महासंघातर्फे सांगण्यात आले आहे.

याविषयी बोलताना महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे म्हणाले, “श्री शिव छत्रपती हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान. सर्वसमावेशक हिंदवी स्वराज्याची त्यांनी पायाभरणी केली. या भक्कम पायावरच आजची भारतीय लोकशाही मजबूतपणे उभी आहे. या हिंदवी स्वराज्याचे २०२३-२४ वर्ष हे ३५० वे वर्ष. त्यानिमित्ताने महाराष्ट्रभरच नव्हे तर जगभरात विविध अभिनव उपक्रम शिवप्रेमींनी हाती घेतले आहेत. तसाच हा उपक्रम महासंघाद्वारे घेण्यात आला आहे. जेणेकरून महाराजांचे स्वराज्य, त्याची साक्ष देणारे गडकिल्ले व साहसाची सांगड घालणारे कडे कपारीतील निसर्ग सौंदर्य. या सर्वांना एका धाग्यात गुंफणारा हा उपक्रम आहे. याची अधिकृत घोषणा करण्यात येत आहे. या विषयी सविस्तर माहिती येत्या काही दिवसांत आम्ही घेऊन येणार आहोत".

गिर्यारोहण, साहस व शिवरायांचा जाज्वल्य इतिहास यांची सांगड अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ नेहमीच घालत असतो व त्यातून नवनवीन अभिनव उपक्रम राबवत असतो. हा देखील त्यांपैकीच एक उपक्रम असून नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अधिक तपशीलवार माहिती जाहिर करण्यात येईल.