मुंबई : इन्स्टाग्राम किंवा फेसबुक या सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्सवर सक्रिय असणाऱ्यांना नेहमीच एका गोष्टीचा कंटाळा येतो तो म्हणजे जाहिराती. जर आपण पाहिलं तर सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर स्क्रोलिंग करत असताना बऱ्याचदा जाहिराती येत असतात. त्यामुळे युझर्स वैतागतात. यावर मेटा कंपनीकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
'मिंट'च्या अहवालानुसार, आता मेटा कंपनी जाहिरात फ्री सेवा आणण्याच्या तयारीत आहे. ही सेवा भारतात पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. पण यासाठी १४ डॉलर्स म्हणजेच अंदाजे १,१६५ रुपये युझर्सला भरावे लागणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, युरोपियन देशांमध्ये जाहिरात फ्री सबस्क्रिप्शन ट्रायल सुरू आहे. त्याचधर्तीवर आता मेटाकडून भारतात जाहिरात-मुक्त इन्स्टाग्राम आणि फेसबुक साठी १४ डॉलर महिना शुल्क आकारण्याची योजना आखत आहे.
'मेटा'ला गेल्या महिन्यात युरोपियन महासंघाच्या नवीन डिजिटल मार्केट कायद्यांतर्गत 'गेटकीपर'चा दर्जा देखील देण्यात आला होता. हा कायदा कंपन्यांना त्यांच्या विविध सेवांमधील वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा एकत्रित करण्यास आणि इतर निर्बंध लादण्याची परवानगी देणार नाही. युरोपियन युजर्सचे ऑनलाइन संरक्षण करण्यासाठी आणि यूएस दिग्गजांचे वर्चस्व असलेल्या उद्योगांमध्ये स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी युरोपियन महासंघ मोठ्या तंत्रज्ञानाचे कठोर नियमन तयार करण्यावर काम करत आहे.