आम्ही कट्टर प्रामाणिक आहोत, त्यामुळेच आम्हाला संकटांचा सामना करावा लागत आहे. मला आठ वर्षं झाली मुख्यमंत्री होऊन; पण तेव्हापासून माझी चौकशी सुरू आहे. माझे सात जन्म शोधून काढले. मात्र, कोणताही भ्रष्टाचार वा कोणतेही चुकीचे काम आढळून आलेले आहे,” असा दावा नुकताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. आपचे खासदार संजय सिंह यांना नुकतीच दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यामुळे केजरीवालांचा चांगलाच तिळपापड झाला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी डोक्यापासून पायापर्यंत भ्रष्टाचारात बुडालेले आहे. स्वतंत्र भारताचे सर्वात भ्रष्टाचारी पंतप्रधान जर कुणी असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत,” अशा बाष्कळ बाताही संजय सिंह यांच्या अटकेनंतर चिंतीत केजरीवालांनी मारल्या. पण, नेहमीप्रमाणेच कोणतेही पुरावे सादर न करता केजरीवाल पंतप्रधान मोदींना भ्रष्टाचारी म्हणून मोकळे झाले. पक्ष स्थापन करण्याआधी केजरीवालांनी काँग्रेसपासून ते अगदी अंबानींपर्यंत सर्वांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले. मात्र, ज्या काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप लावत आंदोलन उभारले, त्यांच्यासोबत ‘इंडिया’ आघाडीत केजरीवाल सामील झाले. आधी मनीष सिसोदिया आणि आता संजय सिंह, अशा प्रकारे केजरीवालांचा उजवा आणि डावा हात सध्या अटकेत आहे. यानिमित्ताने ‘मोदी घाबरले’ असे म्हणायचे आणि झालेल्या आरोपांवर उत्तर देणे टाळायचे, असा नवा अजेंडा देशभरात राबविला जात आहे. संजय सिंह उत्तर प्रदेशातील असून, त्याठिकाणी त्यांच्या पक्षाचा ना एक आमदार आहे ना एक खासदार. उत्तर प्रदेशात निवडणुकीतही एकाही ठिकाणी त्यांना साधे डिपॉझिटही वाचवता आले नाही. अनेक ठिकाणी तर ‘नोटा’पेक्षाही कमी मते आम आदमी पक्षाला मिळाली. व्यावसायिक दिनेश आरोडा याचे संजय सिंह यांच्याशी संबंध होते. मात्र, हाच दिनेश आरोडा माफीचा साक्षीदार झाल्याने आप आणि आपच्या नेत्यांचे पितळ उघड पडले. वीज, पाणी फुकट द्यायच्या घोषणा करायच्या. शिक्षणात आम्ही बदल घडवणार, अशा आरोळ्या ठोकायच्या. प्रत्यक्षात मात्र दारूमध्येही घोटाळा करायचा. शिशमहल बांधून सरकारी पैशांचा चुराडा करायचा. म्हणूनच २०११ साली ज्यांनी देशभरात काँग्रेसच्या भ्रष्टाचारी राजवटीविरोधात रान पेटवलं होतं, ही तीच मंडळी आहेत का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
काँग्रेसच्या संगतीचा परिणाम
राजस्थानमध्ये काँग्रेसचे अशोक गेहलोत, तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, तामिळनाडूमध्ये स्टॅलिन आणि आता झारखंडमध्ये हेमंत सोरेन... या राज्यांमध्ये हिंदू धर्म आणि हिंदू धर्मीयांवर अत्याचाराच्या घटना देशाला नवीन नाही. कधी हिंदू सण-उत्सवाला परवानगी नाकारली जाते, तर कुठे हिंदूंची धार्मिक स्थळे जमीनदोस्त केली जातात. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तर आपली राजकीय रणनीती आखण्यासाठी आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा समोर आणला. अगदी न्यायालयीन लढाई लढून, त्यांनी जात जनगणनेचा हट्ट पूर्ण केलाच. देश जातीपातीतून विकासाकडे जात असताना कोणत्या जातीची किती लोकं आहेत, याचा शोध घेणे अतिशय शरमेची बाब आहे. मात्र, नितीशबाबूंनी हीदेखील इच्छा पूर्ण करून घेतली. यातही हिंदूंची संख्या घटल्याचे आणि मुस्लिमांची संख्या वाढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. त्यानंतर आता तिकडे झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपली मोडकळीस आलेली खुर्ची टिकविण्यासाठी हिंदू धर्मीयांकडे दुर्लक्ष करण्यास सुरूवात केली आहे. ’विश्व हिंदू परिषदे’ची युवा शाखा ’बजरंग दल’ने रांचीमध्ये ’शौर्य जागरण’ नावाने चार यात्रा काढल्या आहेत. या यात्रांमध्ये हजारो कामगार सहभागी झाले होते. मात्र, पेलावल भागात ’शौर्य जागरण यात्रे’वरून परतणार्या हिंदू कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यात आली. हिंदू भाविकांची बस मशिदीसमोर थांबली होती आणि तेथे धार्मिक घोषणाबाजी करण्यात आली. पोलीस वेळेवर घटनास्थळी पोहोचले, त्यामुळे मोठी घटना टळल्याचा दावा एसपींनी केला. या घटनेवर भाष्य करताना झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी म्हणाले की, “हजारीबागमध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला निषेधार्ह आहे.” तुष्टीकरणाच्या राजकारणात बुडालेल्या हेमंत सोरेन सरकारमध्ये विशिष्ट समाजाच्या गुंडांना गुंडगिरी करायला मोकळा लगाम मिळाला आहे. रांचीमध्ये झालेल्या दंगलीत आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि आता हा हल्ला हजारीबागमध्ये झाला आहे. झारखंडच्या सोरेनबाबूंनाही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात पुरते अपयश आले आहे. काँग्रेसच्या संगतीने आणखी दुसरा परिणाम तरी हाय होणार म्हणा!