मुंबई : मुंबईसह राज्यातील शिक्षकांचे व शिक्षणक्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी विधान परिषदेत मुंबई विभागातून शिक्षक असलेला प्रतिनिधी निवडून देण्यासाठी शिक्षकांची नोंदणी होणे आवश्यक असून शिक्षकांच्या भवितव्यासाठी शिक्षकांनी मतदार नोंदणी करावी असे आवाहन भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य व मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केले.
मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी मुंबईतील पश्चिम उपनगरातील विविध शाळा व महाविद्यालयांना अनिल बोरनारे भेटी देत असून शिक्षकांशी संवाद साधून मतदार नोंदणीचे आवाहन करीत आहेत. मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढील वर्षी जून महिन्यात होणार असून ३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर पर्यंत पहिल्या टप्याची नोंदणी सुरू झाली आहे. मुंबईतील माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालये, फार्मसी, मेडिकल व अभियांत्रिकी, आयटीआय तसेच डिप्लोमा व डिग्री महाविद्यालयात शिक्षक असलेले व मुंबईत निवासक्षेत्र असलेले शिक्षक मतदार होऊ शकतात.
शिक्षणक्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न असून या प्रश्नांवर मुंबईतील चेंबूरमधील शाळेत शिक्षक म्हणून असलेले अनिल बोरनारे २२ वर्षांपासून मुंबईसह राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत शासनाशी दोन हात करीत संघर्ष करीत असून विना अनुदानित शाळांना अनुदान मिळवून देण्याबाबत झालेल्या ५० हुन अधिक आंदोलनात सहभाग, १ नोव्हेंबर पूर्वी व नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी अनिल बोरनारे यांनी सातत्याने आंदोलने केली आहेत.
मुंबईतील उत्तर पश्चिम व दक्षिण विभागातील शेकडो शिक्षकांच्या वैयक्तिक सेवाशर्तीचे प्रश्न बोरनारे यांनी सोडविले असल्याने केलेल्या कामांचा प्रभाव मतदार नोंदणीत दिसून येत आहे. पश्चिम उपनगरातील शाळा व महाविद्यालयांच्या भेटी नंतर दक्षिण व उत्तर विभागातील शाळा व महाविद्यालयांना भेटी देणार असून शिक्षकांशी संवाद साधणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.