जेरुसलेम : शनिवारी सकाळी गाझा पट्टीतून इस्रायलच्या अनेक निवासी भागांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात अश्कलोन आणि तेल अवीव या दोन शहरांवर अनेक रॉकेट डागण्यात आले आहेत. या हल्ल्यामुळे संपुर्ण इस्रायल हादरले असून सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गाझा पट्टीत पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने दक्षिण आणि मध्य इस्रायलवर रॉकेट हल्ला केला असल्याचे सांगण्यात येत आहे. इस्त्रायलला हवाई हल्ल्यांविरुद्ध इशारा देणार्या सायरनचा आवाज उत्तरेस ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या देशाची राजधानी तेल अवीवमध्येही ऐकू आला.
हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. तेल अवीवच्या गेडेरोट भागात रॉकेट पडल्याने एका ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, गाझा पट्टीतून रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलनेही निवेदन जारी केले आहे. आम्ही युद्धासाठी तयार आहोत, असे या निवेदनात म्हटले आहे. या हल्ल्याशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.