गंगटोक : सिक्कीममध्ये बुधवारी अचानक ढगफुटी झाल्याने तिस्ता नदीला पूर आला. या घटनेत आतापर्यंत १४ लोकांचा मृत्यू झाला असून १०२ लोक बेपत्ता आहेत. यात २३ लष्कराच्या सैनिकांचाही समावेश आहे. सिक्कीममधील विवध भागांतील आठ पुल उध्वस्त झाले आहेत.
राज्यातील विविध भागात ३ हजारांहून अधिक पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. चुंगथांग येथील तीस्ता स्टेज ३ धरणावर काम करणारे अनेक मजूर अजूनही धरणाच्या बोगद्यात अडकले आहेत. सिक्कीममध्ये आलेल्या पुरामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले असल्याने राज्यातील दळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे.
चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने परिस्थिती आणखी बिकट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तीस्ता नदीच्या पाण्याची पातळी अचानक १५ ते २० फुटांनी वाढल्याने नदीलगतच्या परिसरात पाणी साचले. त्यामुळे अनेक घरात नदीचे पाणी शिरले आहे.
बचाव कर्मचार्यांनी सिंगताममधील गोलितार येथील तिस्ता नदीतून एका लहान मुलासह अनेक मृतदेह बाहेर काढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री पीएस तमांग यांच्याशी राज्यातील परिस्थितीवर चर्चा असून राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.