मुंबई : महाराष्ट्रातील फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला आता लक्षद्वीपमध्येही मोठा धक्का बसला आहे. लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांचे लोकसभेचे सदस्यत्त्व रद्द करण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाने बुधवारी अधिसूचना जारी करून मोहम्मद फैजल यांना अपात्र ठरवले आहे.
मोहम्मद फैजल आणि अन्य तिघांवर पी. सालेह यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. यासाठी कावारत्ती सत्र न्यायालयाने त्यांना १० वर्षाच्या कारवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर मोहम्मद फैजल यांचे सदस्यत्व २९ मार्च रोजी बहाल करण्यात आले.
त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला आहे. लोकसभा सचिवालयाने यासंदर्भात एक बुलेटिन जारी केली आहे. या बुलेटिननुसार, केरळ उच्च न्यायालयाच्या ३ ऑक्टोबर २०२३ च्या आदेशानुसार, मोहम्मद फैजल यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. ११ जानेवारी २०२३ पासून त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. तेव्हापासूनच त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.