संगीत ते समाधी

    04-Oct-2023
Total Views |
Article On Deepak Raga Music To Samathi

स्वानुभवाने सांगावेसे वाटते की, गायनाने वस्तुलाभ व घटनाप्राप्ती होऊ शकते. पण, यावर अधिक संशोधन व प्रयोग होणे आवश्यक आहे.

काही कल्पना

चंद्रनाडी स्थिर ठेवून वायू तत्वाची गती दिल्यास व शुद्ध मध्यम विहंग राग गायिल्यास गायक गंधर्वासारखा आकाशगमन करू शकेल. कमीतकमी गायकाचे आसन तरी डळमळेल. नाकातील वायू आठ अंगुळे वाहत असला म्हणजे वायुतत्व होते. तीव्र मध्यम प्रधान विहंग गायल्यास तेजस् तत्वाचा अनुभव येतो. हा स्वतः लेखकाचा अनुभव मागे नोंदला आहेच. शुद्ध गांधार-मध्यमाचे प्राबल्य आपतत्वाला पोषक असते. सुषुम्ना नाडीतून आकाश तत्व कायम करून मारुह राग गायल्यास पूर्ण वैराग्य प्राप्त होऊन साधक मुक्तकाम बनतो. नाकाला लागूनच श्वासाची आवेग गती असल्यास आकाश तत्व असते.

१२ अंगुले श्वासची गती म्हणजे पृथ्वीतत्वाची गती होय. चंद्रनाडीत पृथ्वीतत्व कायम करून वसंतबहार गायल्यास कळ्या बहरतील व झाडांची चांगली वाढ होईल. याबाबतीत लेखकाने स्वतः काही प्रयोग केले आहेत. काही काळापूर्वी लेखकाच्या घरी द्राक्षाचे वेल लावले होते. वेलाला लागूनच लेखक रात्री व सकाळी गायला बसत असे. वेलांची इतकी वाढ झाली की ते सर्व अंगणभर पसरले होते व त्यांना ठायी ठायी द्राक्षांचे झुपके लागले होते. कालांतराने लेखकावर काही अडचणी, आपत्ती आल्याने लेखक पूर्वीप्रमाणे गाऊ शकत नव्हता. वेली कमी विस्तारल्या व फळल्या. यात बागेकडील दुर्लक्षाचा काहीच संबंध नाही हे सांगावेसे वाटते. वेली कोणत्या रागाने वर्धित झाल्या, हे सांगता येणार नाही. वसंतबहार बागेला फुलविणारा आहे हे मात्र नक्की वाटते.

झिंझोटी, पहाडी, खंबावती, नंद किंवा गौडसारंग १६ अंगुलाच्या आप तत्वातील चंद्रनाडीतून गायल्यास कमी दूध देणार्‍या गाई वा माता अधिक दूध द्यायला लागतील. उलट सूर्य नाडीत चार अंगुलाचे अग्नितत्व स्थिर करून मल्हार राग गायल्यास सस्तन मातांचे दूध आटेल. तोच मल्हार राग चंद्रनाडीतील आपतत्वातून गायल्यास थोडा तरी पाऊस पडेलच. चंद्रनाडीत अग्नितत्व स्थिर करून दीपक राग गायल्यास ठायी-ठायी दिवे लागतील व गायकाच्या अंगाचा दाह होणार नाही. तोच दीपक सूर्यनाडीतून अग्नितत्व स्थिर करून गायल्यास गायकाच्या अंगाचा विलक्षण दाह होईल. स्वल्प अनुभवाला धरून लेखकाचे असे मत आहे की दीपक लावणारा दीपक राग कल्याण अंगाचाच असावा.

कारण, तेजसाच्या उत्पत्तीकरिता तीव्र मध्यम व तीव्र गांधाराचा विशिष्ट मेळ आवश्यक असतो. तीव्र मध्यम, तीव्र गांधार यांच्या विशिष्ट युगुलाला अधे-मधे पंचम निषादाची जोड दिल्यास तेजस उत्पन्न होईल, पण ते तेजस केवळ गायकालाच ज्ञात होईल. रक्तदाब व हृदयविकाराकरिता चंद्रनाडीतील वायुतत्वात गायलेला ललित राग फलदायक होईल. निद्रानाशाकरिता पुरिया, पुरियाधनाश्री, हिंडोल आणि चंद्रकौससारखे राग चांगले. पण ते चंद्र नाडीतून गावेत. प्रकृतीगणिक पोषक असे तत्व असावे. प्रकृती तीन प्रकारच्या असतात. वात, पित्त व कफ. काहींच्या प्रकृती वात-पित्त तर काहींच्या वात-कफ आणि काहींच्या पित्त-वात, पित्त-कफ अशासारख्या विभिन्न असतात. कोणत्या प्रकृतीगटाला कोणती नाडी योग्य ठरेल याचेही एक शास्त्र असू शकते. लेखकाला त्याची नीटशी कल्पना नाही. रक्तप्रवाह बंद करण्याकरिता सुषुम्ना नाडीतील वायुतत्वात गायलेला मारूह राग काम देईल, असे वाटते.

कल्पना अनेक आहेत, पण त्यांचा प्रत्यक्ष प्रयोग झाल्याशिवाय त्यांची सांगता किंवा वैयर्थ कळणार नाही. केवळ कल्पनांचे हे शास्त्र नव्हे. याबाबतीत प्रत्यक्ष उद्योगाला लागणे आता आवश्यक आहे. चवीबद्दलही विवेचन करता येईल. शास्त्रानुसार पृथ्वी तत्वाची गोड, आपाची तुरट, तेजसाची तिखट, वायू तत्वाची आंबट व आकाशतत्वाची चव कडू असते. वरील तत्वांमधून वादी-संवादीचा जरी मारा केला तरी वरील चवी उत्पन्न होऊ शकतील. षड्ज-मध्यमाचा योग तर हे कार्य निश्चित करेल असे वाटते. परंतु, हेही प्रयोग होणे आवश्यक आहे. चंद्रनाडीतून पंचतत्वात्मक स्वरांचा न्यास करून गंधारग्रामातून आरंभी वेलावलीसारखे राग गायिल्यास प्रत्यक्ष नवसृष्टी उत्पन्न होऊ शकेल. सुषुम्ना नाडीतील आकाश तत्वातून तोडी राग गायल्यास मधुमेहासारखे रोग बरे होण्यास प्रत्यवाय असू नये. पशूपक्षीसुद्धाअसल्या तोडीने आकर्षिल्या जातील.

चंद्रनाडीतील आप तत्वातून कांभोजी राग-रागिण्या गायल्यास किंवा शुद्ध काफी गायल्यास त्यातून प्रणय साकारायला पाहतो. म्हणून आपल्या इकडे सर्व ठुमर्‍या खमाज व काफीत असतात. ठुमरी म्हटली की त्यात प्रेमाचा आविष्कार आलाच. काही काळापूर्वी लेखकाने तीन स्वरांचा म्हणजे सा, ग, प या स्वरांचा मालश्री रात्री गायला. आवश्यक त्या पाच स्वरांपेक्षा कमी स्वर रागात असल्याने घटनाप्राप्ती तर नव्हेच पण विघटन झाले. गात असताना लेखकाचा सूक्ष्म देह त्याच्या जडदेहातून बाहेर पडायला पाहत होता. यावरून घटना प्राप्तीकरिता रागात कमीतकमी पाच स्वर का असावेत, याचा स्पष्ट उलगडा होईल. कमी स्वर रागात असल्यास पिंडाचे तेवढ्या कमी प्रमाणात विघटन होईल व वरीलप्रमाणे अनुभव येतील हे निश्चित. म्हणून घटनाप्राप्ती होण्याकरिता आकाश तत्वापासून पृथ्वी तत्वापर्यंतच्या सर्व मूलतत्वांना गुंफणारे कमीतकमी पाच स्वर तरी रागात असावेत, हे भारतीय संगीत शास्त्राचे विधायक वैशिष्ट्य आमच्या आता लक्षात येऊ शकेल.

भगवान व्यासांनी भागवतात लिहून ठेवले आहे की, ब्रह्मदेवाच्या क्रीडेपासून सप्तस्वर उत्पन्न झाले. ’स्वराः सप्तविहारेण भवन्ति स्म प्रजापते’ या वचनातील व कथेतील शास्त्रीय रहस्य आम्ही जाणून घेतले पाहिजे. ब्रह्मदेव नावाची कोणी देहधारी व्यक्ती नसून विश्वाच्या उत्पादक शक्तीची ती एक अवस्था होय. बृह म्हणजे फुगणे. विश्व व्यापक होणारी, वाढणारी शक्ती म्हणजे ब्रह्मा होय. विश्व आजही वाढत आहे. ब्रह्मदेवाची क्रीडा म्हणजे ब्रह्मदेवाचा विहार म्हणजे सहज क्रिया होय. ब्रह्मदेवाची सहज क्रीडा सृष्टी उत्पादक असल्याने आनंदमय असणार. एकच शक्ती नानारुपाने प्रकट होऊ शकते. सूर्य किरणाचे पृथक्करण केल्यास त्यातून इंद्रधनुष्याप्रमाणे सप्तरंग प्राप्त होऊ शकतात, हे सर्वांनाच माहीत आहे. ’एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति’ एका चैतन्यशक्तीचे पर्याय नाद, स्पर्श, रुप, रस व गंध या प्रकारांनी व्यक्तीला व्यक्त होणार. स्वरांना रंग, रस व चव आहे. एवढेच आज सिद्ध झाले आहे. असाही दिवस उगवेल की ज्यावेळेस स्वरांना रुप व गंधही प्राप्त होईल. आमच्या पूर्वजांनी गानयोगात त्याबद्दल बरेच लिहून ठेवले आहे. त्याकडे आमचे लक्ष जाणे आवश्यक आहे.

योगिराज हरकरे
(शब्दांकन :राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७