मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ‘मेंटॉर’चे प्रकाशन
31-Oct-2023
Total Views |
मुंबई : उद्योजकांना त्यांचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी एका मार्गदर्शकाची गरज ओळखून उद्योजकाला मार्गदर्शन करणारे मराठीतील पहिले पुस्तक ‘मेंटॉर’ची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन सोमवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी प्रतिथयश उद्योजक तथा कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पुस्तकाचे लेखक डॉ. अजित मराठे आणि राजेंद्र सावंत यांसह शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध विकासक डॉ. सुरेश हावरे, उद्योजक दीपक घैसास, ‘पथिक’चे मोटिवेशनल ट्रेनर समीर सुर्वे आदी उपस्थित होते.यावेळी पुस्तकाचे लेखक डॉ. मराठे म्हणाले की, “आपण जे काही शिकलो, आपले ज्ञान, अनुभव, नेटवर्क इतर उद्योजकांना मिळावे.
तसेच, उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ’तू लढ आम्ही तुझ्यासोबत आहोत. तुझ्यामध्ये जबरदस्त क्षमता आहे,’ असा विश्वास उद्योजकाला दिला, तर तो यशस्वी होऊ शकतो. उद्योग ही कोणा एका समाजाची मक्तेदारी नाही, याच विचारावर उद्योजकाला मार्गदर्शन करण्यासाठी ’मार्स गुरुकुल’ची स्थापना झाली आहे,” असे अजित मराठे आणि राजेंद्र सावंत यांनी सांगितले. डॉ. सुरेश हावरे यांनी उद्योजकांना सचोटी आणि विश्वासाने व्यवसाय करण्यासह चांगली टीम उभी करण्याचा मोलाचा सल्ला उद्योेजकांना दिला.
‘जे करायचे आहे ते सर्वोत्तम करा’
उद्योगात यशस्वी व्यक्तीचे अनुकरण करणे फार महत्त्वाचे असते. जे करायचे ते सर्वोत्तम करा. कोणत्याही परिस्थितीत आयुष्यात पुढे जायचे, कोणी थांबवलं तरी थांबायचे नाही, जे काही ठरवले ते करून दाखवायचे. जीवनात मेहनतीला पर्याय नाही सतत स्वतःला बदलत राहायचे. असा मोलाचा सल्ला राज्याचे कौशल्य विकासमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिला. यावेळी त्यांनी आपल्या उद्योग क्षेत्रातील यशस्वी वाटचालीतील अनुभव उपस्थित उद्योजकांसमोर मांडले.