नाझ कार्यालय नव्हे, साकेत कार्यालय!

Total Views |
RSS Naz Office in South Mumbai

संपूर्ण नूतनीकरण झालेल्या मुंबईतील रा.स्व.संघाच्या ‘नाझ कार्यालया’चे उद्घाटन गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर या दिवशी ललिता पंचमीच्या शुभ मुहूर्तावर, रा. स्व. संघ कोकण प्रांताचे कार्यवाह विठ्ठलराव कांबळे यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्ताने...
 
दक्षिण मुंबईत लॅमिंग्टन रोड (आता दादासाहेब भडकमकर मार्ग) हा खूप प्रसिद्ध रस्ता. या रस्त्यावरच मुंबईचे एक फार मोठे कापड उद्योजक सर मंगळदास नथुभाई यांचे निवासस्थान होते. या हवेलीभोवती मोठी बाग होती. पुढच्या काळात या बागेमध्ये काही इमारती उभ्या राहिल्या. मग तिला ‘मंगळदास बागे’ऐवजी ‘मंगळदास वाडी’ असे म्हणू लागले. सन १९३४ मध्ये रा. स्व. संघाचे प्रचारक गोपाळराव येरकुंटवार हे मुंबईला आले. त्यांनी संघाची पहिली शाखा सँडहर्स्ट रोड (आता सरदार वल्लभभाई पटेल रोड) वरील मारवाडी विद्यालयाच्या पटांगणात सुरू केली. वर्षभरातच गिरगाव परिसरात अनेक ठिकाणी शाखा सुरू झाल्या आणि त्या जोमाने वाढू लागल्या. त्यामुळे मुंबईत संघाचे कार्यालय असण्याची गरज भासू लागली. तेव्हा १९३५ साली मंगळदास वाडीत एका एकमजली इमारतीत पहिल्या मजल्यावरची जागा भाड्याने घेण्यात आली.

१९३५ ते १९४० या कालखंडात संघसंस्थापक डॉ. हेडगेवार अनेकदा या कार्यालयात आले. या ठिकाणी त्यांचे वास्तव्य झाले. एकदा कार्यालयाचे मासिक भाडे भरण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांकडे पुरेसे पैसे नव्हते. म्हणून डॉ. हेडगेवारांनी स्वतः भाड्याची रक्कम भरून वेळ भागवली. १९४० साली डॉ. हेडगेवारांच्या मृत्यूनंतर गोळवलकर गुरूजी सरसंघचालक झाले. त्यांचे आणि अर्थातच नंतरच्या प्रत्येक सरसंघचालकांचे या वास्तूत येणे घडलेले आहे. पुढच्या काळात संघकार्याच्या रचनेनुसार, मुंबई हा एक जिल्हा होता. त्यामुळे या कार्यालयाला ‘जिल्हा कार्यालय’ असे म्हणू लागले. नंतर मुंबई हे महानगर झाले आणि ‘नाझ’ या चित्रपटगृहाच्या बरोबर समोरच असल्यामुळे या कार्यालयाला ’नाझ कार्यालय’ म्हणू लागले.

१९६६ साली लॅमिंग्टन रोडवरच ’नवयुग निवास’ नावाच्या इमारतीत संघाने अधिक मोठी जागा घेतली. यामुळे सरसंघचालक श्रीगुरुजींसह सर्व केंद्रीय आणि प्रांत कार्यकर्ते हे ’नवयुग कार्यालया’त उतरू लागले. मग ‘नाझ कार्यालया’त मुंबई महानगराचे भांडार आले. संघाचा गणवेष, घोषाची वाद्ये, पुस्तके, प्रतिमा इत्यादी साहित्य विक्रीसाठी इथे उपलब्ध असे.

१९८०च्या दशकात दादरचे ’पितृछाया कार्यालय’ आणि १९९०च्या दशकात परळचे ’यशवंत भवन’ ही कार्यालये निर्माण झाली. या काळात मुंबई महानगराचा विस्तार उपनगरांमध्ये अफाट पसरत गेला होता. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधल्या संघ कार्यकर्त्यार्ंंना एकत्र येऊन बैठका घेण्यासाठी आता ग्रँट रोडपेक्षा दादर-परळ ही ठिकाणे मध्यवर्ती म्हणून सोयीची पडू लागली. त्यामुळे तिथली कार्यकर्त्यांची ये-जा वाढली. तशी ती ‘नाझ कार्यालया’त कमी होत गेली.२०००च्या दशकात ‘नाझ कार्यालया’ची इमारत फारच जीर्ण झाली. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सांडपाणी निचरा यांच्याही समस्या निर्माण झाल्या. हे कार्यालय आता बंद करावे का, असाही विचार झाला. परंतु, जबाबदार कार्यकर्त्यांच्या असे लक्षात आले की, संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या चरणस्पर्शाने, वास्तव्याने पुनीत झालेली आता ही एकमेव वास्तू मुंबईत आहे. तेव्हा तिचे नूतनीकरण, पुनरुज्जीवन करायचे.

त्यानुसार संपूर्ण नूतनीकरण झालेल्या ’नाझ कार्यालया’चे उद्घाटन गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर या दिवशी ललिता पंचमीच्या शुभ मुहूर्तावर, रा. स्व. संघ कोकण प्रांताचे कार्यवाह विठ्ठलराव कांबळे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनापूर्वी गणेशपूजन, उदकशांत, भारतमाता पूजन इत्यादी कार्यक्रम झाल्यावर प्रांत कार्यवाह विठ्ठलराव आणि मुंबादेवी भाग संघचालक दिनेशजी गडा यांनी कार्यालयाचे नूतन नामकरणही घोषित केले. यापुढे हे कार्यालय ’नाझ कार्यालय’ या नावाने नव्हे, तर ’साकेत कार्यालय’ या नावाने ओळखले जाईल. प्रभू रामचंद्राची राजधानी अयोध्या ही ‘साकेत’ या नावानेसुद्धा ओळखली जात असे.

तेच नाव या कार्यालयाला देण्यात आले आहे. या कार्यक्रमात एक असा विशेष अनुभवायला मिळाला, जो फक्त संघाच्या कार्यक्रमातच दिसतो. स्थानिक प्रमुख म्हणजे मुंबादेवी भाग संघचालक दिनेशजी गडा आणि प्रांत कार्यवाह विठ्ठलराव कांबळे हे व्यासपीठावर होते, तर महाराष्ट्र राज्याचे एक मंत्री असलेले नामदार मंगलप्रभात लोढा हे एक सर्वसामान्य संघ स्वयंसेवक म्हणून श्रोत्यांमध्ये बसलेले होते. मुंबादेवी भाग सहकार्यवाह आशिष लोके यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.