ज्याप्रमाणे आपल्याकडे भाद्रपद महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पितृपक्ष पाळला जातो, तशीच काहीशी प्रथा काही पाश्चात्य देशांतही दिसून येते. विशेष करून अमेरिका आणि कॅनडामध्ये दरवर्षी दि. ३१ डिसेंबर हा दिवस त्यांचा पितृपक्ष म्हणजेच ‘हेलोविन’ म्हणून साजरा केला जातो. ‘हेलोविन’ हा मूळचा स्कॉटिश शब्द असून, त्याचा अर्थ ‘ऑल’ अर्थात ‘सर्व’. त्याला जोडून आलेला ‘ईव्ह’ म्हणजे ‘समान’ आणि ‘इन’ म्हणजेच ‘करार किंवा संकल्प’. अशी ही ‘हेलोविन’ या शब्दाची उत्पत्ती.
आयर्लंड आणि स्कॉटलंडमध्ये १९व्या शतकात या प्रथेचा उगम झाला. या दिवशी पूर्वजांचा आत्मा पृथ्वीवर येतो आणि शेतीच्या कामात मदत करतो, अशी तेथील लोकांची धारणा. त्यामुळे ते हा सण उत्साहाने साजरा करताना, जवळच्या नातेवाईकांना आवर्जून बोलवून त्यांच्यासोबत हेलोविन डे, पार्टी आणि अन्य समारंभ साजरे करतात. या सणात मृत व्यक्ती, संत, हुतात्मा आणि स्नेहीजनांचे स्मरण करण्यासाठी धार्मिक अनुष्ठानही केले जाते. या कालावधीत घरात आणि घराच्या बाहेर वेगवेगळ्या भुताटकीच्या प्रतिकृती सजवल्या जातात. त्यात विद्युत रोषणाई केली जाते. त्यानिमित्त विविध सजावटीच्या स्पर्धाही घेतल्या जातात. अनेक जण तशाच प्रकारची वेशभूषा करून या सणाचे अगदी उत्साहाने स्वागत करतात. भूतांचा पोशाख करून, प्राण्यांचे मुखवटे वापरून नाचत आनंदोत्सव साजरा केला जातो.
पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी जरी हा सण साजरा केला जात असला, तरी चित्रविचित्र कपडे घालून घाबरवणारा मेकअप करणार्यांची संख्याही तितकीच मोठी बरं का... भोपळ्यावर डोळे, नाक, तोंड कोरून आत मेणबत्ती किंवा विद्युत रोषणाई केली जाते. हे भोपळे घराबाहेर आणि आसपासच्या परिसरात लावले जातात. या भोपळ्यांना ‘जॅक-ओ-लँटर्न्स’ असे म्हणतात.
आपल्याकडे ज्याप्रमाणे दसर्याला लहान-मोठे नवे कपडे घालून सोनं वाटतात आणि मोठ्यांचा आशीर्वाद घेतात, त्याचप्रमाणे ‘हेलोविन’च्या दिवशी लहान मुले आकर्षक वेशभूषा करून जवळपासच्या घरांना भेट देतात. त्यावेळी लहान मुलांना चॉकलेट आणि गोड पदार्थ दिले जातात. भारतीय संस्कृती आणि परंपरेच्या पितृपक्षाची आठवण करून देणारा हा सण ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आत्मे आपले जग सोडून माणसांच्या जगात प्रवेश करण्याचा दिवस म्हणजे ‘हेलोविन’ अशी व्याख्याही केली जाते. आत्मा आणि परमात्मा हा हिंदू संस्कृतीचा असलेला गाभा पाश्चात्यांनी यानिमित्त स्वीकारला असे म्हटले तर अजिबात वावगे ठरु नये.
अमेरिकेत तर ‘हेलोविन’ची वेगळीच खासियत. तेथे ‘हॅलोविन’मध्ये काळा आणि नारंगी रंग प्रामुख्याने वापरला जातो. नारंगी रंग हा शक्तीचे प्रतीक मानला गेला आहे. अमेरिकेसह युरोपात ऑक्टोबरच्या शेवटच्या टप्प्यात हिवाळा आणि उन्हाळा यादरम्यानचा हा काळ असतो. त्यात निसर्गातही सारी वृक्ष, पाने पिवळी, नारंगी रंगाची झालेली असतात. त्याला ही मंडळी ‘कलर फॉल’ म्हणतात. काळा रंग भय, मृत्यू यांचे प्रतीक मानला गेला आहे. त्यामुळे पूर्वजांच्या स्मरणासाठी साजर्या केल्या जाणार्या या उत्सवात नारंगी आणि काळ्या रंगाचा वापर केला जातो, असे सांगितले जाते.
असा हा पाश्चात्यांचा सण अलीकडच्या काही वर्षांत चक्क भारतातही विशेष करून महानगरांमध्येही साजरा होऊ लागला आहे. मोठमोठ्या मॉल्समध्ये त्याची झलक पाहायला मिळते. तसेच ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी भारतात ऑफिसेस थाटली आहेत, ते यानिमित्ताने ‘हेलोविन फेस्ट’चे आयोजन करतात. मुंबईतही काही ठिकाणी ‘हॅलोविन’ची भुताटकी डोके वर काढू लागली आहे. उत्सवप्रिय भारतीय आता हळूहळू ‘हेलोविन’च्या जाळ्यात अडकू लागल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत पाहायला मिळते.
‘हेलोविन’निमित्त पार्ट्यांचे आयोजन केले जाते. विशेष करून बॉलीवूडची मंडळी यात सर्वांत पुढे. काही वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांनी वाहतुकीचे नियम पाळा असा संदेश देताना चक्क ‘हेलोविन’च्या वेशभूषेतून जनजागृती केली होती. ‘हेलोविन’चे हे गारुड भारतीय युवकांमध्येही वाढत आहे. मात्र, हेच युवक आपल्या संस्कृतीत असलेल्या पितृपक्षाकडे, त्याच्या पारंपरिक महत्त्वाकडे मात्र पाठ फिरवताना दिसतात. परंतु, तेच ‘हेलोविन डे’ उत्साहाने साजरा करतात. त्यातूनच त्यांना आपल्याही पितृपक्षाची जाणीव होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नसावी!