नवी दिल्ली : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी ३० ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी सादर केलेले वेळापत्रक फेटाळले आहे. तसेच आमदार अपात्रतेप्रकरणी ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या सुनावणीपुर्वी विधानसभा अध्यक्षांकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते. यात २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वेळ वाढवून मागितला होता. परंतु, कोर्टाने वेळ वाढवून देण्यास नकार दिला आहे. तसेच आमदार अपात्रतेप्रकरणी ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, असे आदेश सरन्यायाधिशांनी विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.
वेळोवेळी संधी देऊनही निर्णय झाला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने आजवर स्वायत्त संस्थेला मुदत दिली नाही. त्यामुळे ३१ डिसेंबरची मुदत देऊ शकत नाही असा युक्तवाद अधिवक्ता तुषार मेहता यांनी केला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पार पडणार आहे.