स्टंट करणे जीवावर बेतले! ट्रॅक्टरखाली चिरडून युवकाचा मृत्यू
30-Oct-2023
Total Views |
मुंबई : ट्रॅक्टरने स्टंट करत असताना पंजाबमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. सुखमनदीप सिंग असे मृत व्यक्तीचे नाव असून स्टंट करत असताना त्याच ट्रॅक्टरखाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
सुखमनदीप सिंग हे शनिवार २८ ऑक्टोबर रोजी येथील सरचूर गावात एका कार्यक्रमात स्टंट करत होते. यावेळी त्यांनी चालत्या ट्रॅक्टरच्या चाकावर पाय ठेवत त्यावर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा तोल गेला आणि ते ट्रॅक्टरखाली चिरडले गेले.
ट्रॅक्टरची दोन्ही चाके त्यांच्या अंगावरून गेली. यावेळी तेथील काहीजण त्यांच्या मदतीकरिता धावून गेले. परंतू, दवाखान्यात नेताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुखमनदीप सिंग हे गेल्या ७ ते ८ वर्षांपासून स्टंट करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यांनी किसान आंदोलनातही सक्रिय सहभाग घेतला होता. या घटनेनंतर आयोजकांनी कार्यक्रम रद्द केला आहे. दरम्यान,
कार्यक्रमात स्टंट करण्यासाठी प्रशासकीय परवानगी घेण्यात आली नव्हती. यामुळे आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.