नांदेड : नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील शासकीय रुग्णालयात सोमवारी २४ तासांत २४ मृत्यू झाले आहेत. औषधांच्या तुटवड्यामुळे हे मृत्यू झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
नांदेड येथील विष्णुपुरी परिसरात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात २४ तासांत २४ मृत्यू झाले आहेत. यामध्ये ६ मुले, ६ मुली, ७ स्त्रिया आणि ५ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात १२ नवजात बालकांचाही समावेश आहे.
मृतांमध्ये सर्पदंश, विषप्राशन तसेच अन्य आजारांच्या रुग्णांचा समावेश असून यातील काहीजण परराज्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. औषधांच्या तुटवड्यांमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. परंतू, रुग्णालय प्रशासनाने हा आरोप फेटाळून लावला आहे.
याशिवाय मंगळवारी इथे पुन्हा ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ४ बालकांचाही समावेश आहे. दरम्यान, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आज नांदेड रुग्णालयाला भेट देणार आहेत. रुग्णालयातील घटनेची चौकशी केली जाणार असून यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे.