सुख सुख म्हणता हे दुःख ठाकुनि आले...

Total Views |
Article on Israel-Palestine Conflict Reality
 
मार्सेली लास्ट या एका सर्वसामान्य ज्यू महिलेचं हे मनोगत आपल्याला इतिहास आणि भविष्य दोन्ही दाखवतं. कल्पना करा की, आपले ऐतिहासिक वीर जेव्हा मोहिमेसाठी बाहेर पडत, तेव्हा यांच्या घरच्यांची मनःस्थिती कशी होत असेल?
 
सप्टेंबर महिना हा ज्यू लोकांसाठी सणासुदीचा महिना असतो. पहिल्यांदा त्यांचं नवीन वर्ष सुरू होतं, त्याला म्हणतात-’रोश हाशन्ना.’ त्यानंतर येतो-‘योम किप्पूर’ हा सण. ज्यू धर्मश्रद्धेनुसार या दिवशी देव प्रत्येक जीवंत माणसाच्या पाप-पुण्याचा झाडा घेतो आणि पुढच्या वर्षी कुणाला जीवंत ठेवायचं नि कुणाला नाही, याचा निर्णय घेतो. ‘योम किप्पूर’नंतर येतो-’सुक्कोथ’ हा सण. ज्यू लोक घर नाही, दार नाही अशा स्थितीत वणवण भटकत होते; कधी कामचलाऊ निवारा बनवून त्यात आश्रय घेत होते, तर कधी उघड्या आकाशाखालीच झोपत होते. या दिवसांची आठवण म्हणून ज्यू लोक आजही एखाद्या मोकळ्या मैदानात, बागेत, तात्पुरता निवास बनवून राहतात. तिथेच जेवणखाण करतात, प्रार्थना करतात.

पण, ‘सुक्कोथ’ सणाचे हे सात दिवस उत्साहाचे, आनंदाचे, जल्लोषाचे असतात. कारण, ’सुक्कोथ’च्या शेवटी आठव्या दिवशी ’सिम्हत तोराह’ हा सण असतो. ‘सुक्कोथ’ उत्सव ज्यूंच्या इतिहासातल्या दोन मोठ्या घटनांशी जोडला गेलेला आहे. पहिली घटना म्हणजे ज्यूंचा महान सम्राट सॉलोमन याने जेरूसलेममध्ये एक भव्य मंदिर बांधून, ते देवाला अर्पण केलं. ही घटना इसवी सन पूर्व दहाव्या शतकातली म्हणजे आजपासून तीन हजार वर्षांपूर्वीची आणि दुसरी घटना म्हणजे बॅबिलोनमधून ज्यूंचे पुनरागमन. बॅबिलोन देशाचा सम्राट नेबुचाडनेझार याने ज्यू लोकांना गुलाम बनवून पॅलेस्टाईमधून बॅबिलोनियात म्हणजेच्या आजच्या इराक देशात नेलं होतं. तिथून मुक्त होऊन ते ज्यू पुन्हा आपल्या मायभूमीत आले. ही घटना इसवी सन पूर्व सहाव्या शतकातली म्हणजे आजपासून अडीच हजार वर्षांपूर्वीची.

यंदा ‘रोश हाशन्ना’ किंवा नवीन वर्षारंभ दि. १५ सप्टेंबर रोजी, ‘योम किप्पूर’ दि. २४ सप्टेंबरला, तर ‘सुक्कोथ’ दि. २९ सप्टेंबरला होता. म्हणजेच दि. ७ ऑक्टोबर रोजी ‘सुक्कोथ सप्ताह’ संपून ‘सिम्हथ तोराह’ साजरा होणार होता. या तारखा बघून जर तुम्ही आपलं कालनिर्णय बघितलंत, तर तुमच्या लक्षात येईल की, आपल्याकडे हा प्रत्येक सण एक दिवस पुढे दाखवलेला आहे. याचं कारण असं की, ज्यू धर्म नियमांप्रमाणे प्रत्यक्ष ज्यू भूमीवर म्हणजे इस्रायलध्ये ज्या दिवशी हे सण साजरे केले जातात, त्यापेक्षा एक दिवस उशिरा ते गैर ज्यू भूमीवर साजरे व्हावेत, असा नियम आहे.
 
यावरून तुमच्या लक्षात येईल की, ‘हमास’ने दि. ७ ऑक्टोबर हा दिवस अतिरेकी हल्ल्यांसाठी का निवडला. ‘सिम्हथ तोराह’ उत्सवाच्या तयारीत मग्न असलेल्या इस्रायलच्या गाझा पट्टी या भागात ‘हमास’च्या अतिरेक्यांनी किमान पाच हजार स्फोटक अग्निबाणांचा वर्षाव केला. गाझा पट्टी आणि मुख्य इस्रायली भूमी यांच्या सीमेवरचे अडथळे ओलांडून किमान २ हजार, ५०० ‘हमास’ अतिरेकी इस्रायली भूमीत घुसले. अंदाधुंद, बेछूट गोळीबार करीत त्यांनी किमान १ हजार, ४०० इस्रायली नागरिकांना ठार केले. यातले २४७ लोक तर एकाच ठिकाणी ठार झाले. ‘सिम्हथ तोराह’ उत्सव साजरा करण्यासाठी गाझा पट्टी जवळच्या रीम या ठिकाणी ’सुपरनोव्हा सुक्कोथ गॅदरिंग’ या नावाने एक खूप भव्य संगीत जलसा सुरू होता.
 
किमान तीन हजार तरूण माणसं तिथे जमलेली होती. ‘हमास’ने तिथूनच हल्ल्यांना सुरुवात केली. रीम नंतर नेटिव-हा-असरा, बीरी, कफ्र आझा, नीर ओझ आणि होलित या ज्यू गावांवर, वस्त्यांवर लागोपाठ हल्ले चढवण्यात आले. एका दिवसात एवढा मोठा अतिरेकी हल्ला आणि ठार झालेल्यांची एवढी मोठी संख्या असणं, हे इस्रायलच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे. १ हजार, ४०० ही ठार झालेल्यांची संख्या आहे. जखमी, घायाळ त्याच्या दुप्पट आहेत. शिवाय असंख्य लोकांना ओलिस म्हणवून पळवून नेण्यात आले आहे. स्त्रियांवर अत्याचार करण्यात आले. स्त्रिया आणि लहान मुले यांचे शिरच्छेद करण्यात आले. गरोदर स्त्रियांची पोट फाडून त्यांना आणि त्या गर्भांना ठार मारण्यात आलं आहे.

जगभरातील सर्व वृत्तपत्रं, नियतकालिकं, वाहिन्या, अन्य माध्यमं गेले तीन आठवडे ‘हमास‘-इस्रायल संघर्षाच्या बातम्यांनी भरभरून ओसंडून वाहत आहेत. अरब-इस्रायल संघर्षाचा सगळा इतिहास-भूगोल पुनःपुन्हा मांडला, सांगितला जात आहे. लष्करातला एखादा जवान, एखादा अधिकारी जेवायला बसलेला असतो. त्याला आदेश येतो, तोंडाशी नेलेला घास तसाच पानात ठेवा आणि ताबडतोब निघा. रणभूमी तुमची वाट पाहते आहे. देशाला तुमच्या सेवेची गरज आहे. ताबडतोब या. तो माणूस खरंच जेवण अर्धवट टाकून निघून जातो. अशा वेळी त्याच्या बायकोची काय स्थिती होते, यावर बर्‍याच कथा-कविता रचल्या गेलेल्या आहेत. कारण, ललित साहित्याला एक नायक आणि एक नायिका हवी असते. पण, प्रत्यक्षात सैनिकाला फक्त बायकोच नसते, आई-बाप असतात, मुले असतात, बहीण-भावंडे, सासू-सासरेसुद्धा असतात. आपल्या माणूस तातडीने रणभूमीकडे रवाना झाला म्हटल्यावर त्यांची मनःस्थिती काय होते?

मार्सेली लास्ट नावाची एक ७० वर्षांची म्हातारी इस्रायलहून लिहिताना एका सर्वसामान्य ज्यू महिलेची मनःस्थिती व्यक्त करतेय. तिचे मुलगे, जावई, नातू सगळ्यांनाच आघाडीवर बोलावून घेण्यात आलंय. रीममधल्या त्या संगीत जलशावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या ठिकाणी तिची नात प्रत्यक्ष हजर होती. ती नात या आजीला कळवतेय की, माझ्या डोळ्यांदेखत माझे मित्र-मैत्रिणी ठार झालेत. मी कशी बचावले कुणास ठाऊक!

मार्सेली लिहिते की, “दि. ७ ऑक्टोबरला सकाळी माझा मुलगा आमच्या शयनगृहात आला आणि त्याने मला आणि माझ्या नवर्‍याला जोरजोरात हाका मारून उठवलं.” तो म्हणाला की, ”दक्षिण भागात कुठेतरी फार मोठा अतिरेकी हल्ला झाला आहे.” आमच्या डोळ्यांवरची झोप खाडकन उडाली. माझा मुलगा ४७ वर्षांचा असून, इस्रायली सैन्यातच नोकरी करतो. सकाळी ठीक १० वाजता फोन आला. तो तयार होऊन या फोनचीच वाट पाहत होता. ‘सिम्हथ तोराह’ सण आम्ही सगळे आनंदात साजरा करणार, तर मुलगा घाईघाईने रणांगणाकडे निघून गेला.“

मार्सेली पुढे लिहिते की, “आमचं कुटुंब अगदी धार्मिक ज्यू आहे. सगळे धर्म नियम आम्ही काटेकोर पाळतो. यामुळे सब्बाथ (शनिवार)च्या दिवशी आम्ही दूरध्वनी किंवा समाजमाध्यमे वापरत नाही, या कारणाने आमचा संपूर्ण दिवस कमालीच्या तणावात गेला. सूर्यास्त झाला. ‘सब्बाथ’ संपला आणि आम्ही सर्वांनीच सेल फोन्सवर झडप घातली. माझी मुलगी गाझा पट्टीच्या उत्तरेला १३ किमीवर असलेल्या अश्केलॉन शहरात राहते. तिचा नवरा इस्रायली पोलीस दलात आहे. तो सकाळी लवकरच निघून गेला होता. तिचा मुलगा - माझा नातू फक्त १९ वर्षांचा आहे. गेल्याच आठवड्यात ‘गिवाती ब्रिगेड’ या स्पेशल कॉम्बॅट युनिटमधील त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करून, तो घरी आला होता. तोदेखील तातडीने रवाना झाला. नंतर दुसर्‍या मुलीचा फोन आला. तिचा नवरादेखील सकाळीच रवाना झाला. माझा मोठा जावई ५१ वर्षांचा आहे नि धाकटा जावई ४७ वर्षांचा आहे. दोघेही वरिष्ठ कार्यालयातून संदेश येता क्षणी कामावर रवाना झाले. आपलं वय, कौटुंबिक जबाबदार्‍या, सणाचे दिवस या कशाचीही चिंता न करता ते कर्तव्य बजावण्यासाठी धावत गेले. तात्पर्य, या बाईचा ४७ वर्षांचा मुलगा, ५१ आणि ४७ वर्षांचे दोघे जावई आणि १९ वर्षांचा नातू असे चार पुरूष आघाडीवर लढत आहेत.

आता या मागे राहिलेल्या घरच्या लोकांची काय स्थिती आहे? मार्सेली लिहिते की, “दिवसा, रात्री कोणत्याही वेळी इशार्‍याचा भोंगा वाजतो. त्यासरशी जसे असू, त्या स्थितीत आम्ही सुरक्षित ठिकाणाकडे पळत सुटतो. आता नव्या इमारतींमध्ये अशी सुरक्षित स्थानं मुद्दाम बांधण्यात आली आहेत. पण, जुन्या वस्त्यांमध्ये तशी व्यवस्था नाही. हातातलं काम टाकून पळा, लिफ्ट वापरू नका, आडोसा घ्या, अशा आम्हाला सक्त सूचनाच आहेत. यामुळे मध्यरात्री, पहाटे अर्धवट झोपेत भोंगा वाजतो. कसेबसे जागे होऊन, धडाधडा जिने उतरत आम्ही, या आडोशाकडे धावायचं. वयाची सत्तरी ओलांडल्यावर, हे फारच अवघड होतं. पण, दुसरा इलाजच नाही. भोंग्यापाठोपाठ ‘हमास’चे अग्निबाण दणादणा अग्निवर्षाव करू लागतात. गेल्या तीन आठवड्यांत अनेक लोक सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यापूर्वी इमारतींच्या जिन्यांमध्येच ठार झालेत.

अर्थात, यात नवीन काहीच नाही. यापूर्वीही अनेकदा असं झालेलं आहे. ‘हमास’ हा क्रौर्याचाच मूर्तिमंत अवतार आहे. कुणी त्यांना ‘पशू’ म्हणतात. पण, असं म्हणणं, हा पशूंचादेखील अपमान आहे. त्यांनी माणसं मारली, स्त्रियांवर अत्याचार केले. पण, त्यांनी ४० लहान मुलांना त्यांच्या आयांच्या कडेवरून हिसकावून काढले आणि त्यांचा शिरच्छेद केला. या दृष्ट रानटीपणाला मर्यादाच नाहीत. रीममध्ये संगीत जलसामध्ये रमलेल्या आमच्या तरूण मुलांवर बेछूट गोळ्या चालवून यांनी २४७ तरूण मुलं ठार केली. आमचे तरूण! आमचं भविष्य! आमच्या समाजाचं उज्ज्वल भवितव्य त्यांनी नष्ट केलं! आपण देवाला प्रार्थना करायला हवी की, या भयकारक कालखंडातून आम्ही सुखरूप पार पडू.“

मार्सेली लास्ट या एका सर्वसामान्य ज्यू महिलेचं हे मनोगत आपल्याला इतिहास आणि भविष्य दोन्ही दाखवतं. कल्पना करा की, आपले ऐतिहासिक वीर जेव्हा मोहिमेसाठी बाहेर पडत, तेव्हा यांच्या घरच्यांची मनःस्थिती कशी होत असेल? आणि कल्पना करा, भविष्यात जगातल्या प्रत्येक देशाला इस्लामच्या या भीषण संकटाला तोंड द्यावंच लागणार आहे, तेव्हा देशोदेशींचं समाजमन कसं वागेल?

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.