मुंबई (विशेष प्रतनिधी): ऑक्टोबर हिटमुळे उन्हाचा तडाखा सगळ्यांनाच सोसावा लागत असुन याचा पर्यावरणावरही परिणाम होत आहे. मात्र, वन्यजीवांना या अतिउष्णतेचा त्रास होऊ नये म्हणुन भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाकडून दक्षता घेतली जात आहे.
“प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांसाठी आईस पॉक्सीकल म्हणजेच फळे, फळांचा रस आणि बर्फयुक्त केक बनवुन त्यांना दिला जात आहे. अस्वल, हत्ती यासारखे प्राणी या आईस केकचा आनंद लुटताना दिसत आहेत. त्याचबरोबर वाघ, बिबट्या, हायना अशा मांसाहारी प्राण्यांना ही त्यांची शिकार केलेली खाद्य डीप फ्रिझ म्हणजेच अतिशीत केलेले दिले जात आहे”, अशी माहिती वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अभिषेक साटम यांनी मुंबई तरूण भारतशी बोलताना दिली आहे. प्राणीसंग्रहालयात असणाऱ्या प्राण्यांसाठीचे वसतिस्थाने हवामान आणि ऋतूचा विचार करून तयार केली गेली असुन त्यात जास्तीत जास्त नैसर्गिक अधिवास निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यांच्या अधिवासातमध्ये जास्तीत जास्त पाणवठे निर्माण करण्यात आली असुन प्राण्यांना उष्णतेचा किंवा तापमानाचा त्रास होऊ लागल्यावर ते पाणवठ्यांचा उपयोग करू शकतात अशी रचना करण्यात आली आहे.
या प्राण्यांमध्ये असलेले नैसर्गिक अधिवासातील वर्तन टिकवुन ठेवण्यासाठी ही प्राणीसंग्रहालयाकडून विविध उपक्रम केले जातात. काही खेळ किंवा उपक्रम घेऊन या प्राण्यांच्या हालचालींवर सातत्याने निरिक्षण ठेवले जाते. त्यामुळेच, प्राण्यांच्या शारिरीक स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी हे प्राणीसंग्रहालय प्रयत्नशील आहे.