यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत भारत-अमेरिका दरम्यानच्या द्विपक्षीय व्यापारात अंशतः घट नोंदवण्यात आली आहे. व्यापारात झालेली घट ही दोन्ही देशांसाठी सुवार्ता नक्कीच नाही. जागतिक मंदीमुळे ही घट नोंदवण्यात आल्याचे सांगितले जाते. तसेच अमेरिका-चीन व्यापार युद्धही अनिश्चितता आणि अस्थिरता निर्माण करणारे ठरले आहे. त्याविषयी...
2023 मध्ये एप्रिल-सप्टेंबर या कालावधीत भारत आणि अमेरिकादरम्यानच्या द्विपक्षीय व्यापारात 11.3 टक्के इतकी घट नोंदवण्यात आली असून, दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार हा 59.67 अब्ज डॉलर इतका झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत तो 67.28 अब्ज डॉलर इतका होता. या घसरणीनंतरही यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून अमेरिकेने आपले स्थान मात्र कायम राखले आहे. निर्यात आणि आयात घटली असली तरी आर्थिक वर्ष 2023-24च्या पहिल्या सहामाहीत अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून उदयास आला. जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पलीकडे जाऊन अमेरिकेने एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारताबरोबरच्या व्यापाराच्या बाबतीत चीनला मागे टाकले. जागतिक मंदीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील आयात-निर्यात घटली असली तरी लवकरच यात वाढ होण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. ही घसरण झाली असली, तरी दोन्ही देश आपले आर्थिक संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करीत असल्याने अमेरिकेबरोबरच्या द्विपक्षीय व्यापारात वाढ होण्याचा कल आगामी काळातही कायम राहील.
एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीत अमेरिकेतील निर्यात 38.28 अब्ज डॉलरवर आली आहे, जी गेल्या वर्षी 41.49 अब्ज डॉलर होती. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत दोन्ही देशांची आयात घटून 21.39 अब्ज डॉलरवर आली आहे, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 25.79 अब्ज डॉलर होती. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारात घट झाली असली, तरी येत्या काही महिन्यांत व्यापारात सकारात्मक कल दिसून येईल, अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.कोरोनानंतर अमेरिकेसह जगभरातील पुरवठा साखळी आणि ग्राहकांची मागणी विस्कळीत झाली आहे. त्याचवेळी अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धही सुरू आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत एक प्रकारची अनिश्चितता आणि अस्थिरता निर्माण झाली, ज्याचा अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारावरही नकारात्मक परिणाम झालेला दिसतो. भारतासह अमेरिकेने आपल्या देशातील उद्योगांची काळजी घेण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय लागू केले आहेत. या अडथळ्यांमुळे व्यापार-व्यवसाय करणे, अधिक कठीण तसेच महाग झाले आहे. अमेरिकेसाठी भारताबरोबरच्या व्यापारात घट म्हणजे निर्यात बाजार आणि नोकर्यांचे नुकसान होय. भारत जगातील सर्वात मोठी तसेच वाढत्या मध्यमवर्गासह वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे. अमेरिकेतील उद्योगांसाठी ती महत्त्वाची अशीच आहे. व्यापारात झालेली घसरण अमेरिकी कंपन्यांचेच नुकसान करणारी ठरते.
भारतातील अमेरिकेच्या गुंतवणुकीवरही त्याचा नकारात्मक परिणाम दिसून येतो. भारताच्या दृष्टीने विचार केला, तर अमेरिकेसोबतच्या व्यापारात झालेली घट म्हणजे जगातील महत्त्वाच्या निर्यात बाजारपेठेतील प्रवेश मर्यादित होणे, असा होय. अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते; तसेच जगभरातील वस्तू आणि सेवांचा ती प्रमुख ग्राहक आहे. भारताच्या आर्थिक विकासावर याचा मोठा फरक पडतो. म्हणूनच दोन्ही देशांनी व्यापार आणि गुंतवणुकीतील अडथळे कमी करण्यासाठी एकत्र काम करणे गरजेचे आहे. द्विपक्षीय व्यापारात घसरण होण्यास कारणीभूत ठरलेल्या घटकांना शोधून त्यावर उपाय करणे, भारतासह अमेरिकेलाही गरजेचे. विकासाला चालना देण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी आर्थिक उलाढाल वाढायला हवी.जगभरात डिजिटल व्यापारात वेगाने वाढ होत असून, अमेरिका यात आघाडीवर आहे. भारतात तो वाढीस लागला असला, तरी अमेरिकेच्या तुलनेत उपलब्ध असलेल्या डिजिटल पायाभूत सुविधा, क्षमता विकसित करण्यावर भर दिला जात आहे. भारतीय व्यवसायांना अमेरिकेसोबत डिजिटल व्यापारात सहभागी होणे तुलनात्मक कठीण होते. चीनसारख्या शक्तींमुळे जागतिक आर्थिक परिदृश्य वेगाने बदलत असून, भारतासह अमेरिकेसमोरही नवीन आव्हाने तसेच संधी निर्माण होत आहेत. या दोन देशांनी आपले आर्थिक संबंध टिकवून ठेवण्यासाठी तसेच वाढवण्यासाठी, या बदलांशी जुळवून घेणे आवश्यक आहे.
चीनचा प्रभाव
जागतिक अर्थव्यवस्था, भौगोलिक राजकारण आणि तंत्रज्ञानावर चीन अनेक प्रकारे प्रभाव टाकतो. चीन ही जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. चीनच्या वस्तू आणि सेवांच्या मागणीने जगभरातील आर्थिक विकासाला चालना दिली होती. आता चीनमधील पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. त्याचवेळी अमेरिकेशी चीनचे सुरू झालेले व्यापार युद्ध जगभरावर परिणाम करत आहे. आफ्रिका तसेच मध्य पूर्वेसारख्या प्रदेशात चीन आपला प्रभाव वाढवत आहे. विस्तारवादी चीनच्या आक्रमक धोरणांचा फटका आपल्याला बसतो का, या विचाराने अनेक देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तंत्रज्ञानात चीन करत असलेली गुंतवणूक, ही मोठी आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून चीन काही क्षेत्रांत आघाडी घेईल का, हाही प्रश्न आहे. संपूर्ण जगावर चीनचा असलेला प्रभाव हा गुंतागुंतीचा तसेच बहुआयामी आहे. चीनच्या झालेल्या उदयाला सकारात्मक तसेच नकारात्मक अशा दोन्ही बाजू आहेत. म्हणूनच त्याचा प्रभाव रोखण्यासाठी प्रभावी धोरणांची आवश्यकता आहे.
भारत-अमेरिका व्यापार तुलनेने कमी नोंद झाला असला तरी येत्या कालावधीत तो पुन्हा वाढेल, अशी विश्लेषकांना अपेक्षा आहे. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारत आंतरराष्ट्रीय नकाशावर उत्पादक देश म्हणून उदयास येत आहे. चीनपेक्षा भारताची विश्वासार्हता संपूर्ण जगात जास्त आहे. ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ तसेच ‘जागतिक बँके’ने भारतीय अर्थव्यवस्थेवर, तिच्या वाढीवर विश्वास व्यक्त केला आहे. म्हणूनच चिनी आव्हांनाना भारत सहज तोंड देत, जगाचे उत्पादन केंद्र म्हणून लवकरच उदयास येईल. भारत-अमेरिका व्यापार त्यावेळी पूर्ण भरात आलेला असेल, असे निश्चित म्हणता येते.
- संजीव ओक