नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज गुरूवारी नवी दिल्ली येथे भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेडद्वारे (बीबीएसएसएल) आयोजित ‘सहकार क्षेत्राद्वारे सुधारित आणि पारंपरिक बियाणांचे उत्पादन’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेला संबोधित करणार आहेत.
या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लोगो, वेबसाइट आणि माहितीपत्रकाचे प्रकाशन देखील करतील आणि बीबीएसएसएलच्या सदस्यांना सदस्यत्व प्रमाणपत्रांचे वितरण करतील. या परिषदेमध्ये छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी सहकारी संस्थांची भूमिका, यासह बीएसएसएलची उद्दिष्टे, प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या माध्यमातून बीजोत्पादनाचे महत्त्व आणि पिकांची उत्पादकता, पोषण यामधील बियाण्याची भूमिका, या मुद्द्यांवर चर्चा होईल.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी, सहकार क्षेत्राद्वारे प्रक्रिया आणि विपणनासह प्रगत आणि पारंपरिक बियाणे संशोधन आणि उत्पादन याचे नियंत्रण करणारी एक संस्था म्हणून राष्ट्रीय स्तरावरील बहु-राज्य सहकारी संस्था स्थापन करण्याच्या गरजेवर भर दिल्यानंतर ‘बीबीएसएसएल’ची स्थापना झाली. ही संस्था मागणी-आधारित बियाणे उत्पादन, बियाण्याची साठवण, प्रक्रिया आणि पॅकेजिंगसाठी पायाभूत सुविधांचा विकास, लॉजिस्टिक सहकार्य, उत्पादित बियाणांची गुणवत्ता वाढ आणि मानकीकरण, आवश्यक प्रमाणीकरण आणि विपणन, यामध्ये देशभरातली सहकारी संस्थांना सहाय्य पुरवेल. बीबीएसएसएल, विविध पिके आणि त्यांच्या विविध प्रकारांच्या पारंपरिक बियाणांचे जतन आणि संवर्धन करण्यामध्ये सहकारी संस्थांना मदतही करेल.