जमिनीच्या वादात अंगावर चढवला ट्रॅक्टर, तरुणाचा मृत्यू
राजस्थानमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर
25-Oct-2023
Total Views |
जयपूर : राजस्थानमध्ये दोन गटांतील वादामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. तरुणाच्या अंगावर ट्रॅक्टर चढवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भरतपूर जिल्ह्यातील बयाना सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अड्डा गावामध्ये ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी अड्डा गावातील बहादूर गुर्जर आणि अतारसिंग गुर्जर यांच्यात सुरू असलेल्या जमिनीच्या वादावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांवर हल्ला सुरु केला.
यावेळी अतार सिंगचा मुलगा निरपत गुर्जर जमिनीवर पडला. त्यानंतर बहादूर गटातील एका तरुणाने निरपतच्या अंगावर ट्रॅक्टर चालवला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या दोन कुटुंबांमध्ये जमिनीवरुन वाद सुरु आहे. बुधवारी पुन्हा एकदा तो वाद उफाळून आला. यात एकाचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.