ध्येयगंधा नखशिखांत प्रियांका स्थितप्रज्ञा

    24-Oct-2023
Total Views |
priyanka divte

'स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा नि आज नखशिखांत तू... तू आहेस स्थितप्रज्ञा राणी' आरशातली स्त्री आणि आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वस्मृती जागवतानाच्या या काव्यपंक्ती अनेकींच्या बाबतीत तंतोतंत खऱ्या ठरतात. अशीच एक ध्येयगंधा प्रियांका दिवटे आजच्या काळातील नवदुर्गाच....

स्वाभिमान, संघर्ष, ध्यास आणि जिद्द हे सर्व गुण ज्याच्याकडे असतात, ती व्यक्ती आपले साम्राज्य निर्माण करते आणि त्या साम्राज्यात इतरांनाही सामावून घेत असते. एका इर्षेने पेटलेल्या या व्यक्ती यशोशिखर गाठतातच असेच एक नाव मेकअपच्या व्यावसायिक क्षेत्रात अलीकडेच उदयास आले आहे. ते म्हणजे प्रियांका दिवटे हिचे.

सामान्य मुलींसाठी मेकअप स्टुडिओची मुहूर्तमेढ रोवण्याआधी प्रियांकाने फार मोठा संघर्ष केला. मात्र, ध्यास आणि जिद्दीची शिदोरी तिच्यासोबत असल्यामुळे तिने अल्पावधीतच स्वत:चे साम्राज्य उभारले. मुंबईकर त्यातही मराठी मुलगी म्हटल्यावर आर्थिक पाठबळ नाही. तसेच, मानसिक आधारही नाही. त्यातही मदत करण्याऐवजी विरोध करणारे अनेक अशा प्रतिकूल परिस्थितीतही चिंचपोकळी येथे स्वत:चा ‘पीएसडी’ हा स्टुडिओ सुरू करून इतर मुलींनाही रोजगार देण्याचे कार्य प्रियांका हिने केले आहे.

प्रियांकाने फाईन आर्ट्समध्ये शिक्षण घेतले. कलेच्या क्षेत्रात स्वत:चे विश्व तयार करण्याचे स्वप्न बाळगणार्‍या प्रियांका समोर आर्थिक संकट होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी तिने नोकरी करायचे ठरवले. परंतु, कुणाच्या हाताखाली काम करण्याची तिची मानसिकता नसल्यामुळे तिने स्वत:चा व्यवसाय थाटण्याचे ध्येय बाळगले. त्यासाठी तिने आपली कला आणि कौशल्य पणाला लावले. फाईन आर्ट्समध्ये प्रियांका फेस पेंटिंग करत असल्यामुळे तिचा कल मेकअप या क्षेत्राकडे वळला त्यातून आवड निर्माण झाली आणि त्यातच आपले भविष्य असल्याची तिला जाणीवही झाली. तिने मेकअपचा कोर्स करण्याचा विचार केला. परंतु, आर्थिक संकट कायम होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी तिने चित्रकलेची शिकवणी घेतली, तिच्यातील विविध कलांचा उपयोग करून तिने आर्थिक ध्येय गाठत व्यावसायिक मेकअप कोर्स पूर्ण केला. मराठी मुली आणि मेकअप आर्टिस्ट हे समीकरण आजही अनेकांना पटत नाही. परंतु विरोधाला न जुमानता इर्षेने पेटून उठलेल्या प्रियांकाने चिंचपोकळी येथे पीएसडी हा मेकअप स्टुडिओ सुरू केला.

चित्रकलेचे क्लास, मेकअपच्या ऑर्डर्स यातून जमा झालेली पुंजी तिने स्टुडिओच्या उभारणीसाठी वापरली. मेकअप स्टुडिओ आकारला येत असताना वडिलांचं छत्र हरपले. त्यामुळे आई आणि भावाची जबाबदारी तिच्या खांद्यांवर होती. जिद्द कमी होऊ न देता प्रियांकाने संघर्ष सुरूच ठेवत आपल्या व्यवसायाला वाहून घेतले. चाकोरीबद्ध मराठी माणसाचे जीवन तिला नको होते, व्यवसायात यशस्वी होण्यासाठी तिने आपले संपूर्ण कसब वापरून यशोशिखर गाठले आहे. अल्पावधीतच तिच्या कलाकृतीची दखल मराठी सिनेसृष्टीने घेतली आणि ती लोकप्रियतेच्या शिखरावही पोहोचली.

आजघडीला प्रियांकाकडे राज्यातील विविध भागांतून महिला मुली शिकण्यासाठी येतात. त्यातील काहींना या क्षेत्राचा कोणताही गंधही नसतो. त्यांना घडविण्याचे कार्य प्रियांका मनापासून करते. समाज माध्यमावरील सक्रिय असलेल्या प्रियांकाच्या प्रोत्साहनपर व्हिडिओमुळे तिला अनेक तरुणी जोडल्या गेल्या. तिच्या शिकवणीमुळे अनेक जणी आज व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट म्हणून उदयास आल्या आहेत. काहींना चित्रपटांच्या मेकअप डिपार्टमेन्टमध्ये संधीही मिळाली आहे. सर्वसामान्य तरुणींना व्यवसायात उभे करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे सामाजिक कार्य प्रियांकाने केले, अशा ध्येयगंधेला मन:पूर्वक शुभेच्छा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121