‘आरे’मधून १०० वर्षांनी टाचणीचा पुनर्शोध

पश्चिम घाटातील पहिलीच नोंद

    20-Oct-2023   
Total Views |




dark striped spreadwing

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईच्या गोरेगाव उपनगराचा एक भाग म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या आरे कॉलनीमधुन १०० वर्षांनी एका टाचणीच्या पुनर्शोधाची नोंद करण्यात आली आहे. स्प्रेडविंग्स कुळातील ही टाचणीची प्रजात असुन हिचे ‘डार्क स्ट्रिप्ड स्प्रेडविंग’ म्हणजेच काळ्या पट्ट्यांची पसरपंखी असे नाव आहे. १०० वर्षांनी ही टाचणी पुन्हा एकदा दिसल्यामुळे संशोधक आनंदित असुन पश्चिम घाटातील ही पहिलीच नोंद आहे.


आपले पंख पसरुन बसण्याच्या सवयीमुळे यांना स्प्रेडविंग म्हंटले जाते. तसेच, छातीवरील काळ्या रंगाच्या पट्टयांवरून या टाचणीला ‘डार्क स्ट्रिप्ड स्प्रेडविंग’ असे नाव देण्यात आले आहे. १९२४ साली या टाचणीची बिहारमधुन नोंद करण्यात आली होती. भारतातुन ही प्रजात कुठे आढळते फारशी माहिती नसताना २०१९ साली ही प्रजात पुन्हा एकदा कंबोडियामधुन नोंदवली गेली होती. मात्र, कंबोडियामध्ये आढळलेली टाचणी आणि भारतात आढळणारी टाचणी यामध्ये फरक असल्यामुळे ही प्रजात वेगळी असल्याची शक्यता संशोधकांनी नोंदवली आहे. २०१९ मध्ये ही प्रजात सर्वप्रथम आरे कॉलनीमध्ये दिसली तेव्हा ही प्रजात दुर्मिळ आहे याबद्दल संशोधकांना माहीत नव्हते. संशोधन केल्यानंतर ही प्रजात Lestes nigriceps च्या जवळ जाणारी आहे असे लक्षात आले.




dark striped spreadwing
१९२४ नंतर या टाचणीची भारतातुन कोणतीही नोंद नाही. त्यामुळे या टाचणीच्या पुनर्शोधाचा रिसर्च पेपर संशोधकांनी प्रकाशित करण्याचे निश्चित केले. आरे कॉलनीनंतर रत्नागिरी, सिंधुदुर्गतील वेंगुर्ला, देवगड तालुक्यातुन या टाचण्यांची नोंद झाल्याचे समजले आहे. आकारशास्त्रानुसार या टाचण्यांचा अभ्यास केला गेला असुन शेपटीकडील भागाचा (Corpal Appendage) अभ्यास करून ही प्रजात लेस्टेस निग्रीसेप्स असल्याचे नक्की झाले. आरेच्या जंगलामधून या टाचण्यांची मोठी संख्या आढळुन आली आहे.

‘डार्क स्ट्रिप्ड स्प्रेडविंग'ची वैशिष्ट्ये

- संथ पाण्यामध्ये बहुतांशी या टाचण्या आढळतात.
- ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीतच दिसतात
- सिंधुदुर्गतील कातळ सड्यांवर ही प्रजात दिसते
- दलदलीच्या किंवा चिखलयुक्त प्रदेशात प्रजनन करतात
“१०० वर्षांनी भारतातील नोंद आणि पश्चिम घाटातील पहिली नोंद असली तरी महाराष्ट्राच्या इतर भागातील नोंदी पाहता ही प्रजात तितकी दुर्मिळ आहे असं वरकरणी वाटत नाही. कारण, भारतातील पुर्ण दख्खनचं पठार, कोकण पट्टा ते कर्नाटक पर्यंत ही पसरलेली असु शकते. लोकांना आता या टाचणीला ओळखता येणार असल्याने जसजशा नोंदी होतील तसे यावर शिक्कामोर्तब होईल.”

- डॉ. दत्तप्रसाद सावंत
संशोधक, इंडियन ओडोनेटा सिटीझन सायन्स पोर्टल 
“२०१९ मध्ये आम्हाला पहिल्यांदा आरे कॉलनीमध्ये ही प्रजात मिळाली. पण, त्यावर संशोधन करून प्रजात नक्की करायला बराच अवधी गेला. या संशोधनामुळे संशोधक आणि अभ्यासकांना केवळ दुर्गम जंगलांमध्येच नाही तर जैवविविधता असलेल्या ठिकाणांवरसुद्धा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळेल, अशी आशा वाटते.”

- शंतनु जोशी,
संशोधक



समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड. 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121