इंग्लंड किंवा ब्रिटन हे प्रोटेस्टंट राष्ट्र आहे. सेंट पॉल्स कॅथिड्रल हा लंडन शहराचा एक मानबिंदू आहे. हे सेंट पॉल्स आणि इतर एकूण ५४ चर्चेस ही ख्रिस्टोफर रेन या माणसाने उभारलेली आहेत.
शिवरायांनी इ. स. १६४६ साली तोरणा किल्ला ताब्यात घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं. मग तोरण्याची तर त्यांनी उत्तम बांधबंदिस्ती केलीय; पण जवळच्याच ‘मुरुंबदेवाचा डोंगर’ नावाच्या पहाडावर एक दणदणीत-खणखणीत किल्ला बांधून काढून, त्याचं नाव ठेवलं-राजगड! राजगडाची दुहेरी तटबांधणी, ज्याला ‘चिलखत’ असे म्हटले जातं, ती संकल्पना खुद्द शिवरायांचीच होती. पण, हे विलक्षण बांधकाम प्रत्यक्ष उभारलं कुणी? आजच्या भाषेत बोलायचं तर या कामाचे आर्किटेक्ट, इंजिनिअर, कॉन्ट्रॅक्टर कोण होते? माहीत नाही.
१६५६ मध्ये शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोर्यांचा कोकणातला आणि घाटावरचा बराच मोठा मुलुख स्वराज्यात जोडला. शिवरायांच्या चाणाक्ष नजरेनं हेरलं की पारघाट, आंबेनळी घाट आणि रडतोंडीचा घाट, या तीनही घाटवाटांवर नजर ठेवून एक डोंगर उभा आहे. म्हणजेच या डोंगरावर जर किल्ला बांधला, तर त्याच्या माथ्यावरल्या तोफांच्या आणि शिबंदीच्या मार्यात या तीनही घाटवाटा येतात. शिवरायांनी मोरोपंत पिंगळ्यांना फर्मावलं की, या ’भोरप्याच्या डोंगरावर’ किल्ला बांधा. दोन वर्षांच्या अवधीने मोरोपंतांनी भोरप्याच्या डोंगराला बुलंद नि बेलाग तटाबुरुजांचं शेलापागोटं चढवलं. शिवरायांनी या नव्या किल्ल्याला अस्सल मर्हाठी नाव ठेवलं-प्रतापगड! आता गंमत बघा हं. राजासाठी किंवा राज्यासाठी कुठे काय बांधकामं करावीत, हे बघणं, तसा प्रस्ताव देणं, रक्कम मंजूर करवून घेणं आणि प्रत्यक्ष काम करणं, ही सगळी कार्य सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे ‘पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट’ उर्फ ‘पीडब्ल्यूडी’ त्याचा सर्व्हेयर म्हणजे सर्वेक्षणकर्ता आणि मग आर्किटेक्ट, इंजिनिअर आणि कॉन्ट्रॅक्टर यांची आहेत.
शिवरायांच्या प्रशासनात विविध कामे पाहण्यासाठी एकूण १८ खाती किंवा १८ विभाग होते. त्यांनाच म्हणायचे १८ कारखाने. शिलेखाना म्हणजे शस्त्रागार, पीलखाना म्हणजे हत्तीशाळा, तसा इमारतखाना म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग. किल्ले, वाडे, तलाव, विहिरी, रस्ते असं कोणतंही बांधकाम हे इमारतखान्यातले अधिकारी करणार. कोण होते हे लोक? माहीत नाही. प्रतापगडापुरतंच नव्हे, तर पुढे कुरटे बेटावर सिंधुदुर्ग किल्ला बांधणं असो वा, रायरीच्या किल्ल्याला रामगड करून तिथे हिंदवी स्वराज्याची राजधानी करणं असो, सर्वेक्षणकर्ता किंवा सर्व्हेयर ही भूमिका खुद्द शिवरायांनीच पार पाडलेली दिसते. त्यांच्या व्यतिरिक्त बांधकामांच्या संदर्भात आपल्याला फक्त चारच संबंधित नावं आढळतात -(१) पंत दादोजी कोंडदेवांनी जिजाऊ साहेब आणि बाल शिवबाराजे यांच्याकरिता लालमहाल हा राहता वाडा आणि कसबा गणपतीचं देवालय उभारलं. (२) मोरोपंतांनी प्रतापगड उभारला. (३) बाजीप्रभू देशपांडे यांनी महाराजांच्या आज्ञेनुसार सिंहगडाची नव्याने बांधबंदिस्ती केली. (४) हिरोजी इंदुलकर यांनी सिंधुदुर्ग आणि राजधानी रायगडाची उभारणी केली.
आधुनिक राज्यकारभारात प्रशासन आणि सेना हे दोन्ही विभाग पूर्णपणे स्वतंत्र असतात. शिवकाळात तसं नव्हतं. स्वतः महाराज, दादोजी पंत, मोरोपंत आणि बाजीप्रभू हे सगळेच प्रशासकही होते नि लढवय्येही होते. एकटे हिरोजी इंदुलकर हेच फक्त बांधकामाशी संबंधित दिसतात आणि आर्किटेक्ट, इंजिनिअर, कॉन्ट्रॅक्टर सबकुछ तेच होते, असं दिसतं. आता एकटा माणूस कामावर लक्ष ठेवू शकेल, काम करवून घेऊ शकेल. पण, प्रत्यक्ष ती काम करणारे लोक वेगळे असले पाहिजेत. ते कोण होते? माहीत नाही. संशोधनास प्रचंड वाव आहे.
आता या पार्श्वभूमीवर इंग्लंडकडे पाहूया. सर ख्रिस्टोफर रेन हा माणूस दि. २० ऑक्टोबर १६३२ यावर्षी जन्मला आणि ९१ वर्षांचं दीर्घायुष्य जगून दि. ८ मार्च १७२३ यावर्षी मरण पावला. ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या वॉडहॅम कॉलेजचा हा स्नातक गणितज्ज्ञ होता, भौतिक शास्त्रज्ञ होता, खगोल शास्त्रज्ञ होता आणि आर्किटेक्टही होता. १६६९ बाली इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याने त्याला ’सर्व्हेयर ऑफ द किंग्ज वर्क्स’ या पदावर नेमलं. १७१८ पर्यंत म्हणजे तब्बल ४९ वर्षं त्याने या पदावर काम केलं.
रोम शहरातलं व्हॅटिकन सिटीमधलं सेंट पीटर्स हे भव्य कॅथिड्रल संपूर्ण जगात अतिविख्यात आहे. जगभरातल्या सर्व कॅथलिक ख्रिश्चनांच्या मनात सेंट पीटर्स चर्चबद्दल अतीव श्रद्धा असते. अगदी तशीच श्रद्धा प्रोटेस्टंट ख्रिश्चनांच्या मनात लंडनच्या सेंट पॉल्स चर्चबद्दल असते. इंग्लंड किंवा ब्रिटन हे प्रोटेस्टंट राष्ट्र आहे. सेंट पॉल्स कॅथिड्रल हा लंडन शहराचा एक मानबिंदू आहे. हे सेंट पॉल्स आणि इतर एकूण ५४ चर्चेस ही ख्रिस्टोफर रेन या माणसाने उभारलेली आहेत.
ही झाली धार्मिक स्थळं. इतरही अनेक भव्य आणि सुंदर इमारती त्याने उभारल्या. इंग्लंड हे नाविक राष्ट्र आहे. नौकानयन म्हणजेच दर्यावर्दी व्यवसाय हेच त्यांचं जीवन होतं. इंग्रज लोक एका बाजूला अत्यंत क्रूर, शूर आणि लबाड असे चाचे (दर्यावरचे डाकू) पण होते आणि दुसर्या बाजूला अत्यंत उद्योगी, कल्पक, संशोधक असे पण होते. स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, हॉलंड ही अन्य युरोपीय राष्ट्रेसुद्धा इंग्लंडसारखीच होती. त्यामुळे यांच्यात स्पर्धा, लढाया यासारख्याच चालू असत. त्यात खलाशी, अधिकारी इत्यादी लोक नेहमीच आजारी पडायचे, जायबंदी व्हायचे, अपंग व्हायचे. ख्रिस्टोफर रेनने १६९२ साली ग्रिनिच या ठिकाणी ’रॉयल हॉस्पिटल फॉर सीमेन’ नावाची अत्यंत सुंदर वास्तू उभारली.
ग्रिनिच (स्पेलिंगनुसार ग्रिनविच; पण उच्चार करायचा ग्रिनिच) हे पूर्वी लंडन शहराचं एक उपनगर होतं. आता तो लंडन महानगराचाच एक भाग आहे. इंग्लंड हे दर्यावर्दी राष्ट्र असल्यामुळे त्याच्या व्यापार्यांना पृथ्वीवरची वेगवेगळी बंदरं, यांची रेखावृत्त आणि अक्षवृत्त यांच्या गणिताद्वारे मिळणारी अचूक अंतरं आणि त्यामुळे प्रवासास लागणारा वेळ, या सगळ्या भानगडीत फारच स्वारस्य होतं. यामुळे १६७५ मध्ये ख्रिस्टोफर रेनने आधीच ग्रिनिचमध्ये एक वेधशाळा उभारलेली होती. हीच ती पुढच्या काळात जगप्रसिद्ध बनलेली ग्रिनिच वेधशाळा आणि तिने गणित करून काढलेली प्रमाणवेळ म्हणजे ’ग्रिनिच मीन टाईम’ किंवा ’जीएमटी’ ग्रिनिचमध्ये टेम्स नदीच्या अगदी काठावर १६९२ मधलं ते रुग्णालय आणि मागे थोड्या उंच टप्प्यावर १६७५ सालची वेधशाळा, हे दृश्य आजही नितांतसुंदर दिसतं.
आता इथे एक वेगळीच गंमत कळते. द्वारकानाथ माधव पितळे हा गिरगावात ठाकूरद्वाराला राहणारा तरणाबांड युवक कुलाब्याला इंग्रज सरकारच्या गन कॅरेज फॅक्टरीत नोकरीला होता. १९०५ साली सिंहगडावर शिकारीला गेलेला असताना अपघात होऊन त्याचं कमरेखालचं शरीर लुळं पडलं. मग तो ‘नाथमाधव’ या टोपणनावाने कादंबर्या लिहू लागला. नाथमाधवांच्या लेखनावर वॉल्टर स्कॉट याच्या लेखनाचा खूप प्रभाव आहे. १९०९ साली नाथमाधवांनी ’सावळ्या तांडेल’ ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली. ती कमालीची लोकप्रिय ठरली. त्यात नाथमाधवांनी असं दाखवलंय की, मुंबईत कुलाब्याला शिवरायांनी, लढाईत जायबंदी झालेल्या आपल्या माणसांकरिता एक रुग्णालय उघडलेलं असतं. तुकोजी कडू हा माणूस तिथला प्रमुख असतो नि तोच सावळ्या तांडेलाचा गुरू असतो. सावळ्या लहान वयातच मोठा पराक्रम गाजवतो आणि खुद्द शिवरायांच्या हस्ते एका लढाऊ गलबताचा तांडेल हे पद मिळवतो इत्यादी. हे सगळं पूर्णपणे काल्पनिक आहे. पण, ग्रिनिचच्या खलाशी रुग्णालयावरून नाथमाधवांना ही कल्पना सूचली असावी, असे साहित्य अभ्यासकांना वाटतं.
असो. तर पुढे १८६९ मध्ये ग्रिनिचचं हे खलाशी रुग्णालय तिथून अन्यत्र हलवण्यात आलं. म्हणजे जवळपास पावणेदोनशे वर्षं या वास्तूमध्ये हजारो खलाशांवर उपचार करण्यात आले, नेमकं याच कालखंडात ब्रिटिश साम्राज्य जगभर पसरत होतं आणि प्रतिस्पर्धी देशांशी त्याच्या सतत लढाया चालू होत्या. यापैकी अमेरिकन क्रांतियुद्धात ब्रिटनचा दणकून पराभव झाला, अन्यत्र मात्र ब्रिटनच विजयी होत गेला. आणखी पाच वर्षांनी म्हणजे १८७३ मध्ये या वास्तूत ’रॉयल नेव्हल कॉलेज’ आलं, ते थेट १९९८ पर्यंत. म्हणजे सव्वाशे वर्षं या वास्तूने ब्रिटनसाठी आणि त्याच्या मित्रराष्ट्रांसाठी सागरी योद्धे तयार केले.
हे साधं नौदल कॉलेज नसून ’अॅडव्हान्स्ड नेव्हल वॉरफेअर’ शिकवणारं कॉलेज होतं. १८७३ ते १९९८ या काळात ब्रिटिश नौदलाला लढावी लागलेली मोठी युद्धं म्हणजे अर्थातच १९१४ ते १९१८चे पहिले महायुद्ध आणि १९३९ ते १९४५चे दुसरे महायुद्ध. पहिल्या महायुद्ध काळापासून ब्रिटिश नौदलात महिलांनाही अधिकारी पदं मिळू लागली. त्यामुळे इथे महिला आणि पुरूष दोघेही प्रशिक्षणार्थी येऊ लागले. १९९८ नंतर ब्रिटिश नौदलात खूप बदल, सुधारणा झाल्या. परिणामी, नौदल कॉलेजही अन्यत्र हलवण्यात आले.
आता या भव्य वास्तूत अत्यंत प्रेक्षणीय, असं नौकानयन वस्तुसंग्रहालय आहे. किमान २० लाख वस्तू तिथे मांडून ठेवलेल्या आहेत. अॅडमिरल होरेशियो नेल्सन हा दर्यावर्दी ब्रिटनचा सर्वाधिक लोकप्रिय सागरी महानायक. अटलांटिक महासागरात ट्रॅफल्गर नावाच्या भूशिरानजीक नेल्सनचं ब्रिटिश आरमार आणि फ्रेंच नि स्पॅनिश संयुक्त आरमार यांची दि. २१ ऑक्टोबर १८०५ या दिवशी जबरदस्त समुद्री लढाई झाली. त्यात ब्रिटनने फ्रेंचांचा साफ धुव्वा उडवला. या विजेत्या अॅडमिरल नेल्सनच्या स्मरणार्थ या संग्रहालयात एक खास कक्ष आहे. या सगळ्या भव्यदिव्य इमारती उभारणार्या सर ख्रिस्टोफर रेनला ९१ वर्षांचं दीर्घायुष्य लाभलं. त्याचा जन्म १६३२ सालचा. म्हणजे तो आपल्या शिवरायांपेक्षा दोनच वर्षांनी लहान. तो १७२३ साली मरण पावला, तेव्हा आपले शाहू छत्रपती आणि त्यांचा पेशवा बाजीराव हिंदवी स्वराज्याची घडी बसवण्यासाठी झगडत होते. म्हणजे शिवछत्रपती, शंभुछत्रपती, राजाराम महाराज, शाहू महाराजांचा पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या कारकिर्दी, आयुष्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नि टिकवण्यासाठी खर्ची पडून संपली, त्यांचे इमारत कारखाने यांची या विषयांतली तज्ज्ञ माणसं यांपैकी कसलीही नोंद नसताना, इंग्लंडला सर्व्हेयर जनरल सर ख्रिस्टोफर रेन असंख्य सुंदर-सुंदर इमारती उभ्या करत होता.
असं का व्हावं? कारण, इंग्लंड स्वतंत्र होतं आणि आम्ही सुलतानांच्या असह्य जुलमात पिचून निघत होतो आणि दुसरे कारण कमालीची अनास्था. आता बघा हं! पवई, विहार, तुळशी आणि तानसा हे मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव इंग्रजांनी बांधले. पण, या सगळ्यांपेक्षा मोठा वैतरणा हा तलाव १९५०-५२ साली आमच्या इंजिनिअर नानासाहेब मोडक यांनी बांधला. आम्हाला आज काय माहिती आहे त्यांच्याबद्दल? काहीही नाही. यांचं पूर्ण नावसुद्धा माहीत नाही.