आधी पत्रकारिता क्षेत्रात काम केल्यानंतर, त्यांनी फिटनेस क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला, जो पुढे यशस्वी ठरला. जाणून घेऊया फिटनेस क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व ईश्वर ठाकरे यांच्याविषयी...
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पाटोदा गावी जन्मलेल्या ईश्वर बाळासाहेब ठाकरे यांची आई लहान मुलांची शिकवणी घेत असे, तर वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. सुरुवातीला भाड्याच्या घरात राहिल्यानंतर ठाकरे कुटुंबाने हक्काचे घर घेतले. ईश्वर यांचे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण केबीएच विद्यालयातून पूर्ण झाले. शालेय वयात ईश्वर यांना अभ्यास आणि वाचनाची आवड होती. वृत्तपत्र व अन्य माध्यमांतून प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव ईश्वर यांच्यावर पडला. त्यामुळे इयत्ता नववीत असतानाच ईश्वर यांनी घरीच व्यायामाला सुरुवात केली. इयत्ता दहावीनंतर त्यांनी कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे महाविद्यालयात प्रवेश घेतला.
२०१३ साली इयत्ता बारावीत असताना गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ईश्वर यांनी हजेरी लावली. त्यावेळी माहितीपत्रक वितरित करण्यात आले, यावर सुहास खामकर यांचा संपर्क क्रमांक होता. हे माहितीपत्रक ईश्वर यांनी जपून ठेवले. याच कार्यक्रमात सुहास खामकर यांचा फोटो काढताना ईश्वर यांना मामाने दिलेला मोबाईल हातातून निसटून तुटला. या कारनाम्यामुळे आईने ईश्वरला झापले. इयत्ता बारावीनंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात पत्रकारितेसाठी प्रवेश घेतला. जवळपास अडीच वर्ष त्यांनी स्थानिक वृत्तवाहिन्यांमध्ये पटकथा लेखक आणि निवेदक म्हणूनदेखील काम केले.
२०१४ मध्ये नाशिकमध्येच एका दुकानाच्या उद्घाटनासाठी सुहास खामकर येणार होते. त्यावेळी खामकर यांना फोन करून ईश्वर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची परवानगी घेतली. यावेळी ईश्वर यांना खामकर यांची प्रत्यक्ष भेट घेण्याची संधी मिळाली. खामकर यांची अगदी जवळून भेट घेतल्यानंतर फिटनेस क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय ईश्वर यांनी घेतला. पुढे पर्सनल ट्रेनिंग कोचसाठीचे प्रशिक्षणही त्यांनी पूर्ण केले. यानंतर जवळच्याच नाशिक महानगरपालिकेच्या व्यायामशाळेत दीड हजार रुपये पगारावर त्यांनी नोकरी केली. त्यानंतर वावरे फिटनेस, राज मोंढे जिम, ओबी फिटनेस आणि जीएस फिटनेस या जिममध्ये त्यांनी ‘ट्रेनर’ म्हणून नोकरी केली. या क्षेत्रात पुढे काय भविष्य आहे, याचा काय फायदा, असे प्रश्न त्यांना विचारले जाऊ लागले. त्यामुळे ईश्वर यांनी स्वतःचे ‘फिटनेस स्पेशल’ युट्यूब चॅनल सुरू केले.
या चॅनलच्या माध्यमातून यशस्वी आणि प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटूंच्या मुलाखती घेतल्या जातात. त्यातून अनेक तरुणांना आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांची उत्तरे मिळतात. पत्रकारितेच्या शिक्षणाचा फायदा त्यांना युट्यूब चॅनलसाठी मुलाखती घेताना झाला. ईश्वर यांनी नोकरी सोडल्यानंतर त्यांच्यापासून प्रेरणा घेणारे अनेक तरूण ते जिथे जातील, तिथे जात असे. आपुलकी, जिव्हाळा यांमुळे हे अनेक तरूण ईश्वर यांना आपले प्रेरणास्थान मानत असे. त्यामुळे ईश्वर यांना स्वतःचे जिम सुरू करण्याची विनंती तरुणांनी केली. शेवटी निश्चय करून ईश्वर यांनी ‘ट्रान्सफर्म फिटनेस’ नावाने स्वतःचे जिम सुरू केले. या जिमच्या उद्घाटनालाही त्यांनी प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर यांनाच प्रमुख़ पाहुणे म्हणून बोलावले.
“विशेष बाब म्हणजे, ज्यांना मी शिकवले, त्यांनी स्वतःच्या जिम सुरू केल्या. त्या तुलनेत मी फार उशिरा, या क्षेत्रात पाऊल ठेवले. फिटनेस क्षेत्राविषयी अनेक अफवा पसरवल्या जातात. अनेक चुकीच्या माहितीमुळे लोक अनेक वाईट गोष्टींना बळी पडतात. जिममध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन, अशा बातम्या बघून अनेक जण जिमला यायला घाबरतात. पण, हे पूर्ण सत्य नाही. काळ फार बदलला आहे. लोक बाहेरील खानपानावर मोठा खर्च करतील, उघड्यावर जेवण करतीलच; मात्र जिमसाठी खर्च करणार नाही,” अशी खंत ईश्वर व्यक्त करतात.
शरीरसौष्ठव हा सर्वात महागडा खेळ आहे. चित्रपटातीस हिरोची शरीरयष्टी पाहून अनेक तरूण जिमला येतात. मात्र, काही महिन्यांतच ते गायब होतात. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी दिवसातील एक तास तरी देण्याचा प्रयत्न करावा. तंदुरुस्तीसाठी सातत्यदेखील खूप महत्त्वाचे. आजची तरूण पिढी भरकटली आहे. व्यसनांवर खर्च करण्याऐवजी शरीराच्या तंदुरुस्तीसाठी खर्च करा. सध्याची तरूण पीढी तंदुरुस्त व्हावी, यासाठी निरंतर प्रयत्न करणार असल्याचे ईश्वर सांगतात.
आई जयश्री, वडील बाळासाहेब यांसह रामदास साबळे, उद्योजक दीपक घुगे, अशोक निवडुंगे यांचे ईश्वर यांना वेळोवेळी सहकार्य लाभते. ईश्वर ठाकरे यांनी स्वतःची सुसज्ज अशी जिम सुरू करण्याआधी अनेक टीकाटिप्पण्यांचा सामना आणि मोठा संघर्ष करावा लागला; मात्र जिद्द आणि हिमतीच्या बळावर त्यांनी आपली फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आधी पत्रकारितेत काम केल्यानंतरफिटनेस क्षेत्रातही आपले नाव कोरणार्या ईश्वर यांना आगामी वाटचालीसाठी दै.‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा!
७०५८५८९७६७