१२ वर्षीय मुलीची हमासकडून हत्या! दोन आठवड्यानंतर सापडला मृतदेह

    20-Oct-2023
Total Views |

Israel


मुंबई :
इस्त्रायल आणि हमासमध्ये अजूनही युद्ध सुरुच आहे. दरम्यान, इस्त्रायलनेही गाझा पट्टीवर हल्ले सुरु केले आहेत. तर हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलच्या असंख्य लोकांना ओलिस ठेवले आहे. यातच गुरुवारी एका १२ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला आहे.
 
नोया डॅन असे या इस्त्रायली मुलीचे नाव आहे. नोया आणि तिची ८० वर्षीय आजी कार्मेला या दोघींना हमासच्या दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले होते. त्यानंतर आता त्या दोघींचाही मृतदेह सापडला आहे. नोया डॅन ही हॅरी पॉटरची चाहती असल्याचे इस्त्रायलने ट्विट करत सांगितले होते.
 
हॅरी पॉटर या पुस्तकाच्या लेखिका जे.के. रोलिंग यांनी हे पोस्ट रिट्विट केली आहे. यात त्यांनी म्हटले की, "मुलांचे अपहरण करणे हे निंदनीय आणि पूर्णपणे अन्यायकारक आहे. नोया आणि हमासने घेतलेले सर्व ओलीस लवकरच सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांकडे परत यावेत," असे त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान, इस्त्रायली सेनेकडून हमासने ओलिस ठेवलेल्या इस्त्रायली नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे.