भूमिगत मेट्रोमध्ये विनाअडथळा मोबाईल नेटवर्कचा वापर करता येणार

    02-Oct-2023
Total Views |
Mobile Network Available In Underground Metro Lines

मुंबई :
आरे ते कफ परेड अर्थात कुलाबा-वांद्रे-सीप्झ भूमिगत मेट्रो मार्गिकेची प्रत्येक मुंबईकर आतुरतेने वाट पाहत असून या भूमिगत अर्थात अंडरग्राउंड मेट्रोतून प्रवास करताना मोबाईल नेटवर्कमध्ये अडथळा येण्याच्या मुंबईकरांच्या समस्येवर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अर्थात एमएमआरसीने उपाय शोधला आहे. भूमिगत मेट्रोमधून प्रवास करताना मोबाईल नेटवर्कमध्ये अडथळा येऊ नये यासाठी जमिनीखाली २० मीटर खोलपर्यंत अँटेना बसविले जाणार असल्याची माहिती 'एमएमआरसी'च्या अधिकाऱ्याने दिली आहे. तसेच आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता देखील येत आहे.

मेट्रो ३ ही राज्यातील पहिली भूमिगत मेट्रो मार्गिका असून आरे ते बीकेसी हा या मेट्रो मार्गिकेचा पहिला टप्पा असणार आहे. तसेच या मार्गिकेसाठी तिकीट खिडकी देखील जमिनीच्या खाली १०.१४ मीटर तर प्रत्यक्ष स्थानकांचे फलाट हे जमिनीच्या खाली १८ ते २० मीटर खोलीवर असणार आहेत. भूमिगत मेट्रोतील सर्वात महत्त्वाचे आवाहन म्हणजे प्रवाशांना विनाअडथळा मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून देणे. याकरिता एमएमआरसीकडून सौदी अरेबियाच्या कंपनीसोबत करार करण्यात आला आहे.

एमएमआरसीने सौदी अरेबियातील रियाध शहरातील ‘एसेस’ या कंपनीच्या एसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपनीला निविदा प्रक्रियाद्वारे कंत्राट दिले असून कंपनीने खासगी मोबाइल सेवा कंपन्यांकडून सेल्युलर कव्हरेज उपलब्ध करण्याची योजना आखली असल्याची माहिती समोर आली आहे. या खासगी कंपन्यांसाठी एसेस इंडिया ही कंपनी भुयारी मार्गातील स्थानके आणि बोगद्यांमध्ये अँटेना आणि रिपिटर्स बसविणार असून त्यामुळे मेट्रो ३ भुयारी मेट्रो मार्गिकेतुन प्रवास करताना प्रवाशांना मोबाइल आणि इंटरनेट सेवा विनाअडथळा वापरता येणार आहे.