मुंबई : राज्यांतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, तसेच ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्याचा उद्देश ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा आहे. त्यामुळे राज्यातील ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.१९ ऑक्टोबर रोजी दु.४ वाजता ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन झाले. “मन की बात” या कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात एकाचवेळी ५४ ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. म्हणूनच कौशल्य केंद्रातून युवकांना संधीशी जोडण्याचे काम केले जाईल , असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कौशलय विकास केंद्राची सुरुवात होणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. भारताला महाशक्ती बनायचे असेल तर गावखेड्यातील लोकांचा कौशल्य विकास होणे आवश्यक हे मोदींनी सांगितले होते. कौशल्य विकासातून काय साध्य होते हे आज आपण पाहतोय. आज जेव्हा भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनला आहे, तेव्हा रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी युवकांचे कौशल्य प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. मोदींजींच्या नेतृत्वात तिसरी अर्थव्यवस्था बनताना कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधन मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे गरजेचे आहे. युवकांना संधीही जोडण्याचे काम कौशल्य विकास केंद्र करतील हा मला विश्वास आहे. ग्रामीण व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या वर्गाला सन्मानित करणाऱ्या विश्वकर्मा योजना सुरु केल्याबद्दल मी पंतप्रधानांचे मनापासून आभार मानतो. कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून विश्वकर्मा योजनेला कसे पुढे घेऊन जात येईल यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला आणि ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न केले त्यासाठी लोढांचे अभिनंदन करतो. ५११ केंद्रांपासून सुरु झालेला प्रवास ५००० केंद्रांपर्यंत जाईल हा विश्वास देतो, असे ही फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी सन २०२३-२४ करिता सादर केलेल्या अर्थसंकल्पातील कौशल्य विकास विभागांतर्गत अर्थसंकल्पातील परिच्छेद क्र.११२ प्रमाणे ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी स्थानिक पातळीवरील रोजगार व स्वयंरोजगाराकरिता ग्रामीण भागात ५०० उद्योजकता कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्यास शासनाने मान्यता प्रदान केली आहे. यातून रोजगार निर्मितीला चालना मिळेल.